||डॉ. माधवी वैद्य
कविवर्य वसंत बापट यांचे आज रोजी (२५ जुलै) जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे व्यक्तित्व आणि कवित्व याचे स्मरण..

वसंत बापट, मंगेश पाडगांवकर आणि विंदा करंदीकर यांनी मराठी मनांवर काव्यवाचनाचे संस्कार केले. त्यामुळे कविता घराघरांत पोहोचली आणि लोकप्रियही झाली. या तिघांच्या स्वरचित कवितांचा बाज एकमेकांपेक्षा खूप वेगळा होता. त्यांच्या कवितांचा रंगही वेगळा होता आणि सादरीकरणाचा ढंगही वेगळाच होता. कविवर्य वसंत बापट यांच्या मते, ‘कविता हा उद्गार असतो. कविता ही छापायची असते.. सोयीसाठी. शब्दोच्चारण, स्पष्ट उच्चार, टेम्पो, व्हॉल्युम याला खूप महत्त्व असते.’ म्हणूनच सर्व अस्तित्वानिशी कविता सादर करणे हा बापटांचा अत्यंत आवडीचा भाग होता. संस्कृत भाषेचे संस्कार झालेली त्यांची वाणी अतिशय शुद्ध होती. लयीच्या अंगाने जाणारे त्यांचे काव्यवाचन आजही अनेकांना स्मरत असेल. त्यांच्या तोंडून ‘मायकेलअँजेलो’, ‘येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’, ‘दख्खनची राणी’ इ. कविता आजही रसिकांच्या कानात रुंजी घालत असतील. पुण्यातील रविकिरण मंडळाच्या कवींच्या काव्यवाचनानंतर परत एकदा कवितेचा रंगमंचीय आविष्कार या कवींनी फार ताकदीने सादर केला. कवीची कविता त्याच्याच तोंडून ऐकताना काही वेगळाच अनुभव श्रोत्यांना देत असे.

Marathi dancer ashish patil will work with Sanjay Leela Bhansali
‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”

वसंत बापट यांचा काही काळ जरी मुंबईत गेला असला तरी ते खरे पुण्याचेच. कारण त्यांची जडणघडण पुण्यात झाली. पुणेरी संस्कृतीत त्यांचे व्यक्तित्व घडले. पुण्याच्या नू. म. वि. हायस्कूल आणि एस. पी. कॉलेजचे ते विद्यार्थी. साने गुरुजी, सेनापती बापट, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्या विचारधारेचा परिचय त्यांना पुण्यात झाला. पुण्याच्या समृद्ध वैचारिक परंपरेचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सुयोग्य असा परिणाम झाला आणि या शहराच्या वैचारिक घुसळणीतून त्यांचा पिंड घडला. ते स्वत: एके ठिकाणी म्हणतात, ‘अनुष्टुभ छंद फार जवळचा वाटत होता. तेराव्या-चौदाव्या वर्षी कविता म्हणजे काय याची अंधूक जाणीव व्हायला लागली. या अपरिपक्व अवस्थेतच एक कविता कागदावर उतरली आणि ती मास्तरांना दाखवल्यावर ‘ही कविता तूच लिहिलीस का?’ असा प्रश्न मास्तरांनी विचारला. पण या प्रसंगामुळे आपण कविता लिहू शकू असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. पुढे महाविद्यालयात गेल्यावर कविता ही काहीतरी चोरून करण्यासारखी गोष्ट आहे असे त्यांना वाटू लागले. आणि मग टोपणनावाने आपण कविता लिहू शकतो हेदेखील ध्यानी आले. त्यावेळच्या कवितांत अर्थात प्रेम आणि सौंदर्य हे विषय जिव्हाळ्याचे असावे यात काही नवल नाही. प्रेम आणि सौंदर्य ही बापटांच्या जगण्यातील प्रधान वृत्ती होती. त्याचवेळी त्यांच्या हेही लक्षात आले की, कविता ही कधीही कोणावर लिहिलेली नसते. शंभर ठिकाणचं तीळ तीळ सौंदर्य एकत्र केल्यावर जे शिल्प तयार होतं, त्याला कविता म्हणतात. याच वृत्तीतून त्यांची कविता साकारत गेली. कविवर्य बापट यांची कविता विविधरंगी, विविधढंगी आहे. निसर्गाची सुंदर रूपं तिच्यात आहेत. जीवनाच्या विविध अनुभूती तीत आहेत. प्रेमाचे विविध विलास, खटय़ाळ प्रीती, असफल प्रीती तिच्यात आहे. जीवनातील विविध रंगांनी ती विनटलेली आहे. कविवर्य बापटांची शब्द, वृत्त, छंद यांच्यावरील पकड विलक्षण होती.

बापटांची कविता सामाजिक भान फार समर्थपणे व्यक्त करीत होती. १९४२ च्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. देशकर्तव्य आणि देशप्रेमाचा वसा त्यांनी घेतला आणि तो जीवनभर प्रेमाने जपला. त्यांच्यावर झालेले राष्ट्रसेवा दलाचे संस्कार फार महत्त्वाचे होते. साने गुरुजींसारख्या संवेदनशील व्यक्तीचा प्रभाव त्यांच्यावर खोल ठसा उमटवून गेला. त्यांना एकदा एस. एम. जोशींचे पत्र आले. त्यांनी त्यात बारा गाण्यांची मागणी त्यांच्याकडे केली होती. तिथून बापटांच्या कवितेने सामाजिक सामीलकीने आपल्या लेखनास प्रारंभ केला. त्यातून त्यांचं सोळा गाण्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं; ज्याला गोपीनाथ तळवलकरांची प्रस्तावना होती.

‘सेवादल नित भारत हितरत

म्हणुनि धरू अभिमान

सेवादल नच जातिस जाणित

म्हणुनि करू वर मान’

‘सेवादलातील बापट’ हा स्वतंत्र लेखनाचा विषय व्हावा इतके त्यांचे काम मोठे आहे. वसंत बापट आणि लीलाधर हेगडे यांची जोडी तेव्हा गाजली होती. त्याचवेळी त्यांचा ‘शिंग फुंकिले रणी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळी वसंत दाते यांच्यावर लिहिलेला बापटांचा पोवाडा खूप गाजला आणि त्यांना ‘राष्ट्रकवी’ हा किताब प्राप्त झाला. इथून बापटांच्या कवितेत ‘पोवाडा युग’ सुरू झाले. १९४८ साली त्यांनी महात्मा गांधींवरही पोवाडा लिहिला. ही वाटचाल भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘काश्मीरच्या पोवाडय़ा’पर्यंत चालू होती. त्यावेळी सेवादलाच्या बैठकाही बापटांच्या गाण्यांनी सुरू होत असत.

‘या हो रसिक जरा

द्या कान जरा लावा नजरा

शाहिराचा घ्या मुजरा..’ म्हणत डफावर थाप पडली. ९ ऑगस्ट १९८८ ला ‘शूर मर्दाचा पोवाडा’ हे त्यांचे पोवाडय़ांवरील पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्यांच्या अत्यंत ओजस्वी आणि जोशपूर्ण कविता अनुभवता येतात. ज्या ज्या वेळी देश संकटात आला, चळवळी झाल्या, त्या त्या वेळी बापटांची कविता तेज:पुंज होऊन प्रगटलेली दिसते. ‘ब्रीद तुझे विस्मरुनीया सैनिका भागेल का? क्रांति येता पाऊल मागे घेऊनी चालेल का?’ असा प्रश्न बापट विचारतात. त्यांची कविता एका काळात समूहाची उद्गाती बनली होती. ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू’ किंवा ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती पुन्हा कधी फिरायचे’ यांसारखी गीते अनेकांनी लहानपणी म्हटलेली आठवत असतील. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, वसंत बापटांनी एक नवी ‘सामूहिकगीत संस्कृती’ निर्माण केली. त्यांच्या कवितेने शाहिरी परंपरा जपली. संस्कृत साहित्याचं ऋण त्यांच्या कवितेने मनोमन जपलं. त्यांच्या कवितेची जातकुळी पंडिती कवितेची आहे. १९४२ साली त्यांनी भूमिगत आकाशवाणी केंद्र सुरू केले होते. ट्रंकेत बसवलेल्या ट्रान्समीटरवरून ते प्रसारित होत असे. ‘ऐका ऐका स्वदेश हितरत, नभोवाणी ही स्वतंत्र भारत..’ मधुमालती आपटे यांचे हे गीत तेव्हा फार गाजले होते. सेवादलात असताना शिस्त आणि सेवा या दोन्हीचे बाळकडू त्यांना मिळाले आणि मग ‘लोकरंजनातून जागृती’ ही विचारधारा सुरू झाली आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ कलापथकाची सुरुवात झाली- ज्याचे नेतृत्व वसंत बापट करीत होते.

काव्यलेखनाचा समृद्ध अनुभव घेतल्यानंतर लय कशी पकडायची हे तंत्र त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. मग अतिशय लयदार कविता आणि त्याचे लयदार सादरीकरण ही गोष्ट अपरिहार्यच होती. त्याकाळी बापटांची ‘दख्खनची राणी’ ही कविता लोकांना भुरळ घालून गेली होती. त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह बऱ्याच वेळा केला जात असे. बापट एक आठवण सांगत असत की, ही कविता ऐकून खुद्द साने गुरुजीही कैक वर्षांनी मनापासून हसले होते. प्रेमतत्त्व, लयतत्त्व हाती आल्यावर मग बापटांची कविता जीवनानुभवांत रंगू लागली. बापट म्हणतात, ‘कविता जीवनानुभवांतून आली की तिला एक वेगळे परिमाण मिळते. त्यासाठी लोककलांचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतात. तुरुंगात असण्याचा उपयोग यासाठी आपल्याला फार झाला. त्या काळात भरपूर वाचन झाले. ‘रेड स्टार ओव्हर चायना’ हे पुस्तक हातात आले आणि चिनी विद्यार्थी लोकांत घुसून कसा प्रचार करतात ते समजलं आणि लोककला डोळ्यासमोर ठेवून काही लेखन झालं.’ मग ‘रसिया’ काव्यसंग्रहात अनेक गौळणी, लावण्यांचे लेखन झाले. बापटांनी जीवन आसुसून भोगले. त्याचाच एक भाग म्हणजे ‘पुढारी पाहिजे’, ‘गल्ली ते दिल्ली’ या वगनाटय़ांतून त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग.

खूप भ्रमंती केलेला हा कवी होता. ‘ज्या ज्या बाजूला जिकडे जिकडे जावं वाटलं, तिकडे मी गेलो. देश हिंडलो. देश उघडय़ा डोळ्यांनी बघितला. उघडय़ा कानांनी सर्व ऐकले. मनात साठवले,’ असे ते म्हणतात. त्यातून त्यांच्या कवितेत नाना छंद, वृत्ते आली. महाराष्ट्राच्या जन्माच्या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्र दर्शन’ हा कार्यक्रम केला आणि यशवंतरावांनी तो कार्यक्रम देशभर नेला. मग ‘भारत दर्शन’, ‘गोमंतक दर्शन’, ‘आजादी की जंग’असे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यावेळी त्यांच्या संघटनकौशल्याची आणि योजकतेची प्रचीती आली. ‘तेजसी’ या कवितासंग्रहानंतर १९५७ साली त्यांचा ‘सेतू’ हा कवितासंग्रह आला.  त्यांची कविता चोहोबाजूंनी विस्तारायला लागली. ती लक्षणीय झाली. अनेक लहान लहान गोष्टी कवितेचा विषय बनल्या. १९७७ साली त्यांचा ‘मानसी’ हा मालिका कवितासंग्रह आला आणि असे जाणवले की, हा कवी अतिशय तरल संवेदनाही समर्थपणे मांडत आहे. त्यांनी लहान मुलांसाठीही कवितालेखन केले. अनेक वर्षे ‘साधना’चे कुशल संपादनही त्यांनी केले. त्यांनी लिहिलेली ‘विसाजीपंतांची बखर’ हे फार महत्त्वपूर्ण लिखाण आहे. त्यामुळेच एस. एम. जोशी यांनी म्हटले होते, ‘आमचं व्यक्तिमत्त्व माडांसारखं आहे. वसंताचं व्यक्तित्व अनेक बाजूंनी फुटलेल्या डेरेदार वृक्षासारखं आहे.’ पण बापट स्वत: असे म्हणत की, ‘मी संपूर्ण कवी आहे. माझ्या डोक्यावर जर कोणी झोपेत पाणी ओतले तर मी म्हणेन, मी ‘कवी’ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कविता मला सोडून जाणार नाही.’ असा विश्वास असणारा हा कवी आपल्यासाठी ‘निरोपाची लावणी’ मागे ठेवून गेला..

‘मैतरहो! खातरजमा करू मी कशी

आमी जाणारच की कवातरी पटदिशी..

तुमी जीव लावला मैत्र आपुले जुने

केलेत माफ तुम्ही शंभर माझे गुन्हे

हे एकच आता अखेरचे मागणे

रे मैफल तुमची अखंड राहो अशी

आमी जाणारच की कवातरी पटदिशी..’

madhavivaidya@gmail.co