नारायण लाळे
‘तीन दगडांची चूल आणि चंद्र’ या अनोख्या नावाचा शोध घेतला असता संग्रहातील तीन दगडांची चूल/ पण तुझे होते थोडेच?/ रे दुसमाना/ वणवाच होता/ या कवितांमध्ये प्रत्येक चरण तीन ओळींचा आहे. तिपेडी वेणीसारखा या कवितांचा, अर्थगर्भ आकृतिबंध वाचकाच्या दृष्टीस पडतो.
‘पेपरवेट’ या कवितेत कवी वाहोकार लिहितात, ‘माझे अवखळ कागद सांभाळले त्यांनी/ आणि शब्दांनाही उडू दिले नाही वार्यावर/ हे ऋण मान्य केले पाहिजे ना!’ पेपरवेटसारख्या निर्जीव वस्तूवर सचेतनत्वाचे केलेले आरोपण काव्यसौंदर्यात वृद्धी आणतात. नावावर तीन कवितासंग्रह असतानाही कवी, लेखक वसंत वाहोकार यांचा गद्य लेखनाकडील कल सर्वज्ञात आहे. याचा उल्लेख करण्याचे कारण वाहोकार यांच्या बहुतांश कवितेतील ओळी लांब पल्ल्याच्या दिसून येतात. ‘तुमच्यातलाच मी एक आहे. विश्वास ठेवा. सांगा कशी पटवून देऊ खात्री’ किंवा ‘नाहीच आले ध्यानात कधी, ओवी-अभंगाचे गार्हाणे वा गाणे, ते रातभर तुणतुणे’ कवितेमधील अशा ओळी वाचताना लय मात्र कुठे बिघडल्याचे जाणवत नाही, हे महत्त्वाचे.
विषय, आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने या संग्रहातील बहुतांश कविता परिपूर्ण आहेत. संग्रहात, कवी आणि कवितेसंबंधीच्या कविताही उल्लेखनीय आहेत. संग्रहातील कवितांची शीर्षकं हा एक वेगळा विषय होऊ शकतो. वाहोकारांच्या कवितांची शीर्षकं हटके असली, तरी ती सार्थ असल्याचे वाचकाच्या लक्षात येते.
या कवितासंग्रहात कवी वाहोकार यांच्या कवितांनी विविध विषयांना स्पर्श केला आहे. त्यात भंगारवाला, पेपर टाकणारा, सायकल, कवी कविता, संगीत, नाट्य, देश, अशा अनेक विषयांच्या कवितांमध्ये कवीने सामान्य जनतेच्या भावभावनांना सहजगत प्राधान्य दिल्याचे दिसून येते. वाहोकारांच्या कवितेत ओढूनताणून आणलेले किंवा कोंबून भरलेले शब्द आढळत नाहीत. तारेवर पाखरे येऊन बसावीत, तसे शब्द ओळीवर येऊन बसलेले दिसतात! सहज. ‘तुमचे ते शब्द पणत्यांसारखे तेवत होते’ किंवा ‘कविता असणारी कुणी एक म्हातारी कण्हत असते दिवस-रात्र’ अशा सहजगत शब्दसमूहांच्या ओळी वाहोकार लिहून जातात आणि कवितेचे भाषासौंदर्य वाढवतात. संग्रहाच्या ब्लर्बमध्ये लिहिल्याप्रमाणे, वाहोकार यांची कविता प्रतिमा प्रतीकांच्या आराशीत बेमालूम वावरते. आशय अभिव्यक्तीचे अद्वैत सिद्ध करते.
संग्रहातील ‘खिडकीतून, सायकल’ या कवितेचा आवर्जून उल्लेख करायला हवा. खिडकी १ ते खिडकी ५ असा हा पाच कवितांचा समूह आहे. या कविता घटना प्रधान असल्या तरी कवितांमधून अभिव्यक्त झालेल्या भावना वाचकाच्या डोळ्यांसमोर दृश्यमान होतात. नीलकमल, नूरजहां, अनारकली, पारू, मेलडी ही केवळ कवितागत सायकलींची नावं नाहीत, तर वर्तमानातले कष्टमय जगणे कथन करणार्या आणि शिकवणार्या व्यक्तिरेखा आहेत!
या कवितासंग्रहात कवी वाहोकारांनी बोली भाषेतील संवाद, भौगोलिक स्थानोल्लेख यांचे सढळ आणि सयुक्तिक उपयोजन केले आहे. त्याचबरोबर, आंधळ्या विहिरी, गळफास घेणारे शेत, उनाड धुसफूस, जहराची तहान, धीट होतील ससे, अक्षरांचे मुजोर थवे, शब्दांचे सरडे, म्हातार्या ओळी, उनाड पाण्यात अशा अनेक अनोख्या प्रतिमांमधून वाहोकारांची कविता समृद्ध झाली आहे.
‘ तीन दगडांची चूल आणि चंद्र’
वसंत वाहोकार, ‘शब्दालय’ प्रकाशन, पाने- १२०, किंमत- २५० रुपये
