भारतात ब्रिटिश राजवट असताना काही ब्रिटिश अधिकारी नजराणे व लाच म्हणून मोठय़ा रकमा घेऊन कसे काम करीत याचे दाखले उपलब्ध आहेत. आपल्याकडील मोगल बादशहा, शहाजादा आणि त्यांचे दरबारी अधिकारीही लाचखोरीत ब्रिटिशांहून चार पावले कसे पुढे होते, हे कथन करणारा लेख..

लंडनमध्ये इ.स. १६०० मध्ये पूर्वेकडील बेटे व भारतीय द्वीपकल्प यांच्याबरोबर केवळ व्यापार करण्याच्या हेतूने इंग्लंडमधील काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. भारत व इतर पूर्वेकडील देशांबरोबर मसाल्याचे पदार्थ, तलम कापड व मोती आणि चीनबरोबर रेशमी कापडाचा व्यापार युरोपियन देशांना मोठा किफायतशीर होत असे. त्यामुळे हॉलंड, ऑस्ट्रिया, स्कॉटलंड, डेन्मार्क, स्पेन वगरे देशांनीही अशाच प्रकारच्या ईस्ट इंडिया कंपन्या इंग्लंडच्या व्यापाऱ्यांच्या पूर्वीच स्थापन केल्या होत्या. परंतु त्या सर्व थोडय़ा अवधीतच बंद पडल्या. परंतु इ. स. १६०० मध्ये स्थापन झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मात्र या सर्वाहून अधिक काळ कार्यरत होती. या कंपनीचा अस्त सन १८५८ मध्ये झाला. या कंपनीने संपूर्ण भारतात व्यापार तर केलाच; शिवाय राज्य कमावून भारतीय द्वीपकल्पावर सत्ताही गाजवली. ब्रिटिश साम्राज्यातील भारत हा सर्वात महत्त्वाचा प्रदेश होता. भारताला ‘ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी’ असे संबोधले जात असे. त्यामुळे भारतातील ब्रिटिश साम्राज्याची जनक असलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिचे भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. सुरुवातीला काही व्यक्तींच्या वर्गणीतून उभी राहिलेली ही व्यापारी संस्था काही वर्षांतच एक सामथ्र्यवान व्यापारी संस्था म्हणून कधीही अपेक्षित नसताना भारतासारख्या मोठय़ा प्रदेशावर अडीच शतके सार्वभौम सत्ता बनून राहिली.
१८५८ साली ही ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करून ब्रिटिश राजवटीत भारतीय प्रदेश सामील केला गेला. पुढे १९४७ सालापर्यंत भारत हा ब्रिटिश साम्राज्यातला एक प्रदेश बनून राहिला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये प्रथम आपला व्यापार व नंतर राजकीय सत्ता स्थापन करून बस्तान बसवताना हरेक प्रकारचे डावपेच खेळावे लागले. परंतु त्या काळातील सर्वात मोठे सत्ताधारी मोगल बादशहा, शाहजादा (राजपुत्र) व अन्य अधिकाऱ्यांना सदैव खूश ठेवून निरनिराळे परवाने, व्यापारी सवलती मिळवाव्या लागत. त्यांना नियमितपणे अमूल्य वस्तू, रोख पसे यांचे मोठमोठे नजराणे द्यावे लागत. शिवाय बादशहाच्या वैद्यकीय गरजा पुऱ्या कराव्या लागतात. अशाच प्रकारचे नजराणे, मोठय़ा रकमा ब्रिटिश अधिकारीही लाच म्हणून घेऊन काम करीत असत. अशा अनेक घटना चकित करणाऱ्या आहेत.
कंपनीच्या सुरत येथील वखारीत सर्जन बाऊटन हा त्याच्या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेला होता. मोगल राजघराण्यातील जहाँअरा ही स्त्री आग्रा येथे गंभीररीत्या भाजल्यामुळे तिच्यावर उपचार करण्याकरिता १६४४ साली बाऊटनला बोलाविण्यात आले. त्याने जहाँअरावर यशस्वी उपचार केल्यामुळे बादशहाने त्याला आग्य्रास आपल्या नोकरीत ठेवले. पुढे बादशहाचा मुलगा शुजा हा बंगालचा सुभेदार झाल्यावर त्याने बाऊटनला आपल्याबरोबर नेले. बाऊटनने राजाची मर्जी सांभाळून व संधीचा फायदा घेत कंपनीसाठी बंगालमध्ये व्यापाराचा परवाना मिळविला.
१६५१ साली कंपनीने हुगळी येथे छोटीशी वखार उघडली. नंतर कालीघाट या दलदलीच्या ओसाड भागात कलकत्ता ही छोटीशी वस्ती निर्माण केली. पुढे कंपनी सरकारने त्यांच्या भारतातील प्रशासनाची कलकत्ता हीच राजधानी केली. सन १७१५ मध्ये फारुखसियार हा बादशहा आजारी पडला. त्या वेळी कंपनीकडे सर्जन हॅमिल्टन हा शल्यचिकित्सक होता. त्याने बादशहावर शस्त्रक्रिया करून त्याला ठणठणीत बरे केले. बादशहाने खूश होऊन कंपनीला बऱ्याच व्यापारी सवलती देऊन कलकत्त्याजवळील ३८ गावे इनाम दिली. कंपनीला स्वतची नाणी पाडण्यास परवानगी दिली.
लंडनमधील कंपनीचा अध्यक्ष व इतर संचालकांना कंपनीचा व्यापार फायदेशीर कसा होईल हे पाहून शिवाय राजाची मर्जी राखावी लागे. कंपनीच्या सनेदवर सहीसाठी राजाची मर्जी राखणे, मुदत संपल्यावर परवान्याचे नूतनीकरण राजाकडून करून घेणे इत्यादी कामांसाठी कंपनीकडून मोठमोठय़ा रकमांच्या स्वरूपात राजालाच घेत असे. होता होता राजा कंपनीकडे सतत पसे मागू लागला आणि मोठमोठय़ा रकमांचे कर्ज घेऊ लागला. कंपनीला ही लाच देण्याशिवाय गत्यंतर नव्हते. चार्ल्स हा राजा नेहमीच आíथक अडचणीत असे. त्याने तर कंपनीकडून अशी लाचलुचपत उकळण्यात सर्व भिडभाड सोडूनच दिली होती. १६२८ साली चार्ल्सने कंपनीकडे एक लाख रुपये देणगी म्हणून मागितले. हे पसे कंपनीकडे नसल्याने राजाला ते मिळाले नाहीत तर राजाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिस्पर्धी डच ईस्ट इंडिया कंपनीकडून तीन लाख रुपये घेऊन त्या कंपनीला इंग्लंडमध्ये व्यापार करण्याचे अधिकार व सवलती दिल्या. १६४० साली त्याने कंपनीकडे परत पशाची मागणी केली. यावेळी कंपनीकडे रोख रक्कम शिल्लक नव्हती, पण साडेसहा लाख रुपये किमतीचे हिरे होते. हे हिरे राजाने दीड लाखांस कंपनीकडून विकत घेऊन डच कंपनीस तीन लाख रुपयांस विकले. कंपनीच्या उत्कर्षांविषयी राजा नेहमीच आपलेपणाने बोलत असे, पण त्याची अंतस्थ कृत्ये मात्र कंपनीच्या विरोधातच असत. राणी एलिझाबेथ व राजा जेम्स यांनी कंपनीस दिलेल्या सनदांमध्ये भारतात व्यापार करण्याचा मक्ता दिला होता. याचा अर्थ कंपनीशिवाय कोणत्याही ब्रिटिश व्यक्तीला अगर संस्थेला हा व्यापार करण्यावर र्निबध होता. परंतु राजा चार्ल्सने लंडनमधील मोठे धनवान व्यापारी िपडर, पोर्टर यांनाही मोठय़ारकमांची लाच घेऊन भारतातील व्यापाराचा परवाना दिला होता.
१७५७ साली झालेल्या प्लासी येथील लढाईनंतर नवाब सिराज उद्दौलाचा खून करण्यात आला. प्लासीच्या विजयानंतर बंगालमधील राजकारणाची सूत्रे प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह व इतर अधिकारी यांच्या हातात गेली. दिल्लीचा मोगल बादशहा हा केवळ नाममात्र होता. बंगालमधील नवाबपदी कोणास ठेवायचे हेसुद्धा क्लाइव्हच ठरवू लागला. कंपनीची तनाती फौज नवाब व त्याच्या क्षेत्रातील लोकांच्या संरक्षणासाठी ठेवण्याची पद्धत क्लाइव्हने सुरुवात केली आणि त्या खर्चासाठी कंपनी दरमहा पाच लाख रुपये प्रत्येक नवाबाकडून घेई. परंतु पुढे पुढे ही रक्कम नियमित मिळेनासी झाल्यावर क्लाइव्हने मोगल बादशहाकडून वाटाघाटी करून संपूर्ण बंगालच्या सुभ्याचे दिवाणीचे हक्क व अधिकार कंपनीच्या नावावर मिळविले. या अधिकारामुळे बंगालमधून मोठय़ा प्रमाणात महसुली उत्पन्न कंपनीला मिळू लागले. यामुळे कंपनीचा गव्हर्नर क्लाइव्ह व इतर अधिकारी बंगालच्या सर्व नवाबांवर वर्चस्व गाजवू लागले. हे अधिकारी लोकांकडे कुठलेही सरकारी काम करण्यासाठी मोठमोठय़ा रकमा भेट म्हणून मागू लागले. क्लाइव्ह कुठलेही सरकारी काम नवाबांकडून अमूल्य नजराणे व मोठी रक्कम घेतल्याशिवाय करीत नसे. रॉबर्ट क्लाइव्ह हा १७४३ साली वयाच्या अठराव्या वर्षी इंग्लंडमधून मद्रासला कंपनीच्या नोकरीसाठी आला. १७६७  साली तो भारतातील कंपनीची नोकरी सोडून परत मायदेशी गेला. या चोवीस वर्षांत त्याने असंख्य ‘नजराणे’ मिळवून चांगला गब्बर झाला होता. तो परत लंडनला पोहोचला तेव्हा त्याच्याकडे चार लाख पौंडाहून अधिक माया जमली होती. इंग्लंडमध्ये क्लाइव्हच्या या अमाप संपत्तीविषयी चर्चा चालू होतीच. तिथल्या पार्लमेंटने या संपत्तीविषयी चौकशी करण्यासाठी १७७२ साली खास समिती नेमली. तिथेही काही पशांची देवाण-घेवाण करून त्या चौकशीतून क्लाइव्ह कसाबसा निसटला, पण त्यातून झालेल्या नाचक्कीमुळे १७७४  साली त्याने आत्महत्या केली.
नजराणे आणि लाच घेण्यात आपल्याकडील मोगल बादशहा, शहाजादा व इतर अधिकारी हे ब्रिटिशांहून चार पावले पुढेच होते. टॉमस रो हा कंपनीचा वकील मोगल दरबारात होता. त्याने कंपनीच्या व्यापारासाठी काही सवलती व सुरतच्या बंदरात येणाऱ्या कंपनीच्या मालावरील जकात माफीचा प्रस्ताव बादशहा जहांगीर पुढे ठेवला होता. बादशहाने तो प्रस्ताव बराच काळ रेंगाळत ठेवून शेवटी तो प्रश्न गुजरातचा सुभेदार खूर्रम म्हणजेच शाहजहानकडे सोपविला. शहाजादा शाहजहानने रोला सांगितले की, सुरतच्या बंदरात येणाऱ्या तुमच्या प्रत्येक गलबतावरील सर्व चीजवस्तू तुम्ही आम्हाला दाखवाव्यात. त्यापकी हव्या त्या वस्तू आम्ही स्वतसाठी ठेवून उरलेल्या वस्तू तुमच्या व्यापारासाठी बाहेर न्याव्यात. टॉमस रोने हे कबूल केल्यावर कंपनीचा सुरत येथील व्यापार सुरू झाला. बादशहा व अधिकारी यांना या नजराण्याचा मोठा हव्यास होता. इंग्लंडहून येणाऱ्या कंपनीच्या प्रत्येक अधिकाऱ्याने किती आणि काय नजराणा आणला आहे, त्याची बादशहा व शाहजादा यांना मोठी उत्सुकता असे व त्याची ते वाट पाहत असत. एकदा बादशहाचा मुक्काम मांडवगडास असताना एडवर्ड टेरी हा टॉमस रोचा सहकारी इंग्लंडहून नजराणे घेऊन आल्याचे कळताच बादशहाने त्यास मांडवगडास त्या वस्तूंच्या पेटय़ा घेऊन बोलावले. तिकडे त्या पेटय़ा घेऊन जाताना टेरीची गाठ प्रथम शाहजादा शाहजहानशी पडली. शाहजहान त्यापकी काही नजराणे स्वतस मागू लागला. परंतु बादशहाचा सक्त हुकूम होता की, त्या सर्व पेटय़ा प्रथम त्याच्याकडेच याव्यात. त्यावरून शाहजहान व टेरी यांच्यात बरीच वादावादी होऊन त्या पेटय़ा जहांगीर बादशहाकडे पोहोचल्या. जहांगीरने उताविळपणे टेरी मांडवगडास पोहोचण्यापूर्वीच त्या पेटय़ा उघडून सर्व नजराणे स्वतसाठीच घेऊन टाकले. त्यातील काही वस्तू इतर अधिकारी व शहाजाद्यासाठीही होते. १६१७ साली बादशहाची स्वारी अहमदाबादेस मुक्कामास होती. सुरतच्या बंदरात विलायतेहून काही नजराणे आले असल्याचे कळताच शहाजहानने बंदरात जाऊन सर्व पेटय़ांवर आपला शिक्का (सील) मारला. पेटय़ा अहमदाबादेस पोहोचल्यावर २० दिवस झाले तरी बादशहाकडून पेटय़ा उघडण्यात आल्या नाहीत म्हणून टॉमस रोने स्वतच त्या उघडल्या. हे कळल्यावर शहाजहान बादशहा जहांगीरकडे रोच्या विरोधात फिर्याद केली. त्यावर बादशहाने संतापून रोला नजरकैदेत टाकले. रोने माफी मागितल्यावर हे प्रकरण मिटले.
ज्या इंग्रज लोकांची निवड भारतामध्ये नोकरीसाठी होत असे, त्यांना भारताचे भौगोलिक व सांस्कृतिक ज्ञान, तसेच भारतीय भाषांची जुजबी माहिती देण्यासाठी लंडनमध्ये कंपनीने एक कॉलेज सुरू केले होते. कंपनीच्या शासनामध्ये दोन विभाग होते. लष्करी सेवा व नागरी प्रशासकीय सेवा. दोन्ही विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन बऱ्यापकी होते. परंतु नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रकारे पसे खाण्याची संधी मिळे, त्यामुळे लष्करी अधिकारी आपली बदली त्या विभागात करण्याच्या खटपटीत असत. अर्थात या बदलीसाठीही त्यांना वरच्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतच!

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला