डोंगरदर्यांत फिरणं, उभा सुळका चढून जाणं, नदी ओलांडणं यातून जितकं आव्हान शारीरिक-मानसिक क्षमतांना मिळतं, तितकंच व्हेनिस बिएनालेसारख्या बहुसांस्कृतिक महाप्रदर्शनामुळे विचारक्षमतेला का मिळतं? तर इतिहास आणि वर्तमानाशी सूचकपणे भिडणारे तिथले कलादालनांतील अनुभव ठरतात. वैचारिकदृष्ट्या न मळलेल्या वाटांचा शोध मग आपसूकच लागतो…

कला म्हणजे केवळ कारागिरी नसून प्रत्येक कलाकृती- किंवा कलाकृतींमधलं त्या त्या कलावंताचं सातत्य ही ‘अभिव्यक्ती’ असते, याचं भान अख्ख्या जगाला १८९५ च्या सुमारास नक्कीच येऊ लागलं होतं. व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारांचं वारं वाहात होतंच आणि मराठीत विशीतले केशवसुत मोरोपंती आख्यानकाव्यांची वाट सोडून ‘एक तुतारी द्या मज आणुन’ म्हणत होते; युरोपातल्या चित्रकलेत १८९३ सालीच एडवर्ड मुंक या चित्रकाराची ‘किंकाळी’ घुमली होती आणि तिनं चित्रकलेतल्या पुढल्या ‘अभिव्यक्तीवादी शैली’ वाट रुंद केली होती… अशा १८९५ सालापासून व्हेनिसची बिएनाले भरत असल्यानं तिच्यावर अभिव्यक्ती, विचारस्वातंत्र्य, वैचारिक मतभेद सहन करणं, बहुसांस्कृतिकता हे सारे- आजच्या काळातल्या कोणत्याही विचारी कलावंतावर होणारे- संस्कार या व्हेनिस बिएनालेच्या आयोजन-यंत्रणांवरही झाले.

आज व्हेनिसमध्ये या सार्या खुणा दिसतात. अगदी गेल्या दहापंधरा वर्षांपर्यंत ‘डॉक्युमेण्टा’ हे जर्मनीच्या कासेल शहरात १९५५ पासून भरणारं पंचवार्षिक महाप्रदर्शन ‘सामाजिक- राजकीय आशयाच्या कलेसाठी जरूर पाहावंच’ या प्रकारचं असायचं… पण आता (विशेषत: २०१५ नंतर) व्हेनिस बिएनालेतला ‘मध्यवर्ती प्रदर्शना’चा भाग- आणि काही देशांची दालनंसुद्धा- विचारप्रवर्तक असतात- आपण कलेबद्दल जो काही विचार करतो, त्यालाच थेट आव्हान देणारी असतात आणि मग कलेचं सामाजिक स्थान काय, कलेचं राजकारण कुठल्या दिशेचं हवं… यांसारखे प्रश्न आपल्याला नव्यानं पडत राहातात.

हेही वाचा

अर्थात देशांची दालनंही अनेकदा कमी नसतात. अमेरिकेच्या दालनात युद्धखोरीच्या विरुद्ध थेटपणे बोलणारी कलाकृती ओबामांच्या काळात होती (आता सगळंच बदललं)… किंवा स्पेननं २०२४ च्या बिएनालेत, स्पॅनिश वसाहतवाद्यांनी ज्या-ज्या लोकसंस्कृतींवर वरवंटा फिरवला, त्या संस्कृतींतल्या लोक-चित्रं वा दृश्यप्रतीकांना आपल्या दालनात स्थान दिलं होतं! नायजेरिया, अझरबैजान अशाही देशांच्या दालनांमुळे बहुसांस्कृतिकता दिसतेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं ठरतं इथलं मध्यवर्ती प्रदर्शन. व्हेनिसमध्ये बिएनालेचा मुख्य ऐवज म्हणून १९८०च्या दशकापासून दर दोन वर्षांनी भरू लागलेलं हे मध्यवर्ती प्रदर्शन कलाक्षेत्रात विचारवंत म्हणून ओळखल्या जाणार्या व्यक्तीनं खास गुंफलेलं असतं. यंदा गुंफणकार म्हणून पहिल्यांदाच आफ्रिकी महिलेला- कोयो कुओ यांना- व्हेनिसनं संधी दिली; पण त्या अकाली वारल्या. मग गेल्या वर्षभरात, कोयो यांनी निवडलेल्या पाच जणांच्या पथकानं यंदाच्या मध्यवर्ती प्रदर्शनाचं बाळंतपण केलं. कोयो जगल्या असत्या तर कदाचित, प्रदर्शन आणखी चांगलं झालं असतं अशी हळहळ असूनही यंदाच्या मध्यवर्ती प्रदर्शनानं वैचारिक आव्हानं दिलीच.

महत्त्वाचा प्रश्न- टोकदार उत्तरं!

भिंतीवर बायबल वगैरेंतले प्रसंग चितारणं हे पाश्चात्त्य संस्कृतीत होतं… हळूहळू कॅनव्हासवर तैलरंगानं चित्रं काढणं सुरू झालं आणि पुढे व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याच्या काळात त्याच तैलचित्र-तंत्रात फेरफार करून आधी पाश्चात्त्य, मग जगभरच्याही चित्रकारांची अभिव्यक्ती होत राहिली. हे ठीक; पण आमच्या संस्कृतीत मिरवणुका होत्या, कर्मकांडं होती, मांत्रिकसुद्धा होते/ असतात… मग आम्ही, आमच्या विचारस्वातंत्र्यवादी हेतूंनी केलेल्या अभिव्यक्तीसाठी या गोष्टींचा केवळ रूपनिष्ठ किंवा आकृतिक (फॉर्मल) आधार घ्यायला कुणी कशाला बरं आडकाठी करावी? – हा महत्त्वाचा प्रश्नच जणू यंदाच्या बिएनालेतल्या मध्यवर्ती प्रदर्शनानं उपस्थित केला.

‘बायबलप्रसंग ते मुंकची किंकाळी हा प्रवास युरोपात झाला तो आम्ही पाहिला, अंगिकारला… आता आम्ही आमच्या संस्कृतीचं आजच्या अभिव्यक्तीकडे संक्रमण करतोय, ते न बघण्याइतके मूर्ख/ संकुचित/ स्वार्थी नाहियात ना तुम्ही?’ हा याच प्रश्नाचा उपप्रश्न. कोयो कुओ यांनी आक्रमकपणे प्रश्न न विचारता, ‘सगळ्याच सांस्कृतिक संक्रमणांना स्थान हवे’ यासारखी संयत भाषा वापरली होती. प्रत्यक्ष बिएनालेत या प्रश्नाच्या अनुषंगानं बरंच काही पाहाता आलं. ‘पोएट्री कारवाँ’ ही मिरवणूक आजच्या कविता लोकांपुढे सादर करत बिएनालेच्या ‘जार्दीनी’ परिसरात फिरली, इथं चित्रकारांनी आवडत्या कविता वाचल्या. त्यात दलित कविता वाचणार्या राजश्री गुडी यांचाही सहभाग होता.

हेही वाचा

चित्रकार-प्रणीत काव्यजागराची ही मिरवणूक काही काळापुरतीच; पण प्रदर्शनातही ‘नव्या मिरवणुकी’चं साहित्य ठरणार्या काही कलाकृती होत्या. याआधी २०२४ सालच्या व्हेनिस बिएनालेत ग्यूनेश् तेर्कोल या तुर्की चित्रकर्तीनं भरतकाम आणि ‘ॲप्लीक’ तंत्रानं, व्हेनिसमधल्या महिलांच्या मदतीनं साकारलेलं ‘अ साँग टू द वर्ल्ड’ हे मोठं कापडी चित्र मिरवणुकीनं, मानवमुक्तीची गाणी गात प्रदर्शनात आणलं होतं… पण मिरवणूक हीदेखील आमची अभिव्यक्तीच, हे ठासून सांगण्याचं काम २०२६ च्या बिएनालेनं केलं. मोठे कापडी बॅनर हे आजकालच्या मिरवणुकांचं वैशिष्ट्य असतं, तशी कापडावरली चित्रं तर इथं अनेक होती. त्यात केनियाचा कालोकी न्यमाई, तर जन्म पॅरिसचा असूनही फ्रेंच गयाना या परतंत्र देशात राहणारी तबिता रेझैरे हे चित्रकार लक्षणीय ठरत होते. खुद्द या बिएनालेत इस्रायल आणि रशियासारख्या युद्धखोर देशांचा समावेश असल्याबद्दल निषेध मोर्चेच व्हेनिसमध्ये ८ मे रोजी निघाले, तेव्हा तबिता यांनी आपल्या चित्रांवर पॅलेस्टाइनचा झेंडा लावला होता!

त्या मानानं मांत्रिक, कर्मकांडं हा जरा विचित्र विषय… त्याचं समर्थन विवेकीजनांनी कसं करावं? पण विशेषत: आफ्रिकी चित्रकारांनीच याचं उत्तर दिलेलं दिसलं. अंधश्रद्धेचा भाग काढून टाकून, मिथकांचा नवा अर्थ लावून चित्रांतून किंवा मांडणशिल्पांतून केलेली अभिव्यक्ती इथं दिसत होती. एम्माकागाबो (हेलेन) सेबिदी यांची पेस्टल चित्रं हे याचं उत्तम उदाहरण ठरलं. ही वाट सध्या निसरडीच आहे; पण ‘पुरुषाचं कापलेलं मुंडकं हाती घेतलेली स्त्री’ असं दिसताच बर्याच जणांना ज्युडिथ आठवते, तसं आफ्रिकी कलेबाबतही बर्याच जणांचं व्हायला हवं, हे कर्मकांडाचा अगदी सूचकच संदर्भ घेणार्या कलाकृतींतून कळत होतं. ‘आम्हीही आमचा इतिहास पाहणार’ हे या सार्यातून दिसणारं उत्तर टोकदार ठरतं!

तोडायचं की जोडायचं?

पण ‘आमचा इतिहास, तुमचा इतिहास’ हे सवतेसुभे कशाला असायला हवेत, हा प्रश्नही त्या उत्तराच्या टोकावर असतो! गेल्या खेपेचा (व्हेनिस बिएनाले- २०२४) सूर काहीसा समरसतावादी वाटावा, इतक्या ठाशीवपणे विशेषत: आफ्रिकी कलेचं दर्शन यंदाच्या (२०२६) खेपेला घडलं, त्यामुळे ‘यातून नेमकं काय साधायचंय’ असाही प्रश्न पडणारच. त्याची उत्तरं अनेक असू शकतात, ती अनेकांच्या कामातून अनेकपरींनी मिळाली.

उदाहरणार्थ – (१) इतिहास व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा असला तरी तो जगानं घडवलेला असतो आणि आपण तो तसा का आहे हे समजून घेऊन स्वत:ला बदलणं महत्त्वाचं असतं (कोलकात्याचा सोहराब हुडा); (२) इतिहास क्षणोक्षणी घडत असतो… एकाच वेळी अनेकांचा इतिहास कसा घडत असेल, हे समजण्यासाठी भावना आणि तर्क दोन्ही हवं (मूळचा म्यानमारचा पण आता थायलंड आणि जर्मनीत राहाणारा सवांगवांग्से याँगव्हे); (३) साधी कामं करतानाही मानवतावादी दृष्टी ठेवलीत, तर इतिहासाचं ओझं वाटणार नाही (ब्रिटिश दालनानं निवडलेल्या चित्रकर्ती लुबैना हिमीद); (४) इतिहासाचं मिथकीकरण झाल्यास हिंसेत आणि संहारातही सौंदर्य दिसतं ( फ्रेंच दालनातल्या दृश्यकलावंत यटो बरादा); (५) ‘इतिहासाचं सोडा हो, हॉलिवुडपटांतूनही ‘काळे वाईट’ अशी प्रतिमा तयार केली गेलीच ना? ती तरी दुरुस्त करूया की!’ (‘हेल्टर स्केल्टर’ या प्रादा फाउंडेनशनं भरवलेल्या प्रदर्शनात आर्थर जाफा)! – ही अनेकांगी उत्तरं दृश्यातून जाणवत होती, त्या दृश्यांसोबतचा लेखी ऐवज या जाणवण्याचं समर्थनच करत होता. याखेरीज स्पेनच्या दालनानं यंदा पुन्हा सहअस्तित्ववादी धोरण ठेवून, अख्ख्या जगभरची ‘पिक्चर पोस्टकार्डं’ आपल्या प्रचंड बांधीव दालनाच्या सर्व भिंतीवर लावली होती. दुरून टाइल्ससारखीच वाटणार्या या पोस्टकार्डांवर देशोदेशींच्या, प्रांतोप्रांतींच्या प्रतिमा होत्या ‘इतरां’ना या प्रतिमा हव्यात, म्हणून तर ही पोस्टकार्डं तयार झाली… त्यातली काही आता ‘हे इथं उरलं नाही’ याची साक्ष देणारी ठरलीत… चित्रांचं सांगणं हे असंच असतं, असा भाव या दालनात फिरताना दाटून आला.

एरवी बिएनाले म्हटलं की मोठमोठी मांडणशिल्पं, चकाचक व्हिडिओकला आणि तिचं अवाक करणार्या प्रकारानं (उदाहरणार्थ, प्रेक्षकांनी सर्पिलाकार स्क्रीनच्या आत फिरायचं) प्रदर्शन, इतरांपेक्षा ‘हटके’ करण्याचा सोस हे सारं असतंच. यंदा ऑ्ट्रिरयाचं दालन हे तसं होतं. यांना सांगायचं होतं पाण्याबद्दल, नैसर्गिक संसाधनांच्या नासाडीबद्दल… पण त्यासाठी नग्न मानवी शरीरांच्या कसरती, घंटेच्या लंबकाऐवजी नग्न स्त्रीदेह… असे नेत्रदीपक (नेत्रोद्दीपक असं वाचू नये!) मार्ग वापरण्यात आले होते.

एकंदर, दृश्यकलेचं व्हेनिस बिएनालेसारखं बहुसांस्कृतिक महाप्रदर्शन हे डोंगरदर्यांत फिरणं, उभा सुळका चढून जाणं, नदी ओलांडणं यातून जितकं आव्हान शारीरिक-मानसिक क्षमातांना मिळतं, तितकंच आव्हान विचारक्षमतेला देणारं ठरू शकतं. ‘बिएनाले किंवा तत्सम इव्हेन्ट हे आता ॲम्यूझमेंट पार्कसारखे झालेत’ अशी नाकं मुरडणारे ‘ऑ्ट्रिरया दालन’च पाहात असतात… त्याऐवजी वैचारिकदृष्ट्या न मळलेल्या वाटा कोणत्या आहेत, याचा शोध व्हेनिसमध्ये किंवा डॉक्युमेण्टात घ्यायचा असतो… त्यातून मिळणारा आनंद वैचारिक साहसपर्यटनापेक्षा कमी नसतो!
जागतिक दर्जा इथेही दिसतोच…

हायनर गोबेल्स हे संगीत आणि नाट्यकलेचे जर्मन अभ्यासक. या दोन्ही कलांच्या दृश्यरूपावर त्यांनी भर दिला आणि त्यांच्या कलाकृतींचे व्हिडीओ कलादालनांत दाखवले जाऊ लागले. ही काही दृश्यरूपं मुंबईत पाहण्याची संधी ३१ मे पर्यंत भायखळ्याच्या जिजामाता उद्यान प्रांगणातल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात मिळते आहे. ‘लॅण्डस्केप प्लेज’/ ‘परिदृश्यातले प्रयोग’ नावाच्या या प्रदर्शनात कष्टानं काहीतरी करणार्या मानवी समूहाचं दर्शन पहिल्याच कलाकृतीत होतं. हे सारेजण खांब हलवताहेत, जणू नाटकाचं नेपथ्य उभारताहेत… पण त्यांच्या न संपणार्या हालचाली मानवी प्रयत्नांचा अंतहीनपणा दाखवतात, तर या हालचाली करताना प्रत्येक पात्राच्या निराळेपणातून मनुष्यस्वभावही दिसतो. दुसऱ्या कलाकृतीत आधी निसर्गरूपं, मग विजेच्या साह्यानं दुरून वाजवला जाणारा पारंपरिक वाद्यमेळ हळूहळू धुरामध्ये त्या संगीताची निव्वळ लय दिसू लागते. वाद्य वाजताना दिसणं हे त्यातून येणार्या ध्वनीइतकंच महत्त्वाचं असतं का, हा प्रश्न पडतो.

तिसरी कलाकृती ही जणू पहिल्या कलाकृतीवरचं भाष्य आहे. इथं माणसांऐवजी मेंढरांचा कळप आहे आणि वर घोंघावणार्या प्रकाशमान बलूनच्या हालचालींना हा कळप यथामती प्रतिसाद देतो आहे. माणसं आणि मेंढरं यांची क्रयशक्ती, बुद्धी यांतल्या साम्यभेदाचे, राजकीय व्यवस्थांकडे पाहायला लावणारे प्रश्नही या दोन कलाकृतींतून पडतील. अर्थाचे विविध पापुद्रे नसलेली, सहज पाहून हरखून जावे अशी ‘ईगल्स’ ही खास मुंबईच्या घारींबद्दल तयार करण्यात आलेली कलाकृतीही या प्रदर्शनात आहे.

मुंबईचं अधिक प्रसिद्ध संग्रहालय म्हणजे काळा घोडा भागातलं छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम), इथल्या दुसर्या मजल्यावर दडलेलं ‘जहांगीर निकल्सन आर्ट फाउंडेशन’ (जेएनएफ)चं दालन हे आधुनिक आणि समकालीन कलेची उत्तम प्रदर्शनं भरवतं. सध्या (१० जूनपर्यंत) इथं ज्येष्ठ दृश्यकलावंत नवजोत यांच्या नव्या कलाकृ़ती पाहाता येतात. कचरा, औद्योगिक टाकाऊ माल, राबिट, त्यातूनही दिसत राहाणारा निसर्ग यांचे फोटोकोलाज भिंतींवर असले तरी खरी आकर्षणं आहेत ती एक मांडणशिल्प आणि एक फिल्म! या मांडणशिल्पात ‘लेगो’चे तुकडे वरून कचर्यात पडल्यासारखे पडत राहातात- ‘बांधकाम’ आणि नामशेष होणं यांचा विरोधाभास दिसतो. तर फिल्ममध्ये आपल्या देशातले विरोधाभास सरळ नजरेनं पाहण्याचा प्रयत्न करणारे चार तरुण आहेत. ते जे बोलताहेत, त्याची दृश्यंही दिसत असल्यानं हा निव्वळ चर्चापट होत नाही. नवजोत बस्तरमधल्या कलावंतांना बळ देण्याचं काम कैक वर्षं करतात. यंदा त्यांनी तिथून काही बिया घेऊन, मातीच्या गोळ्यांत बिया ठेवून या गोळ्यांना सोन्याचा वर्ख लावून विकायला काढला आणि ‘कलेक्टिंग आर्ट’- कलाकृतीचा संग्रह करणं- हीच परमावधी न मानता या बिया पेरा, असं आव्हानवजा आवाहन केलं… त्या सोनवर्खी मातीतल्या बियाही इथं आहेत!

आंतरराष्ट्रीय महाप्रदर्शनांतल्या अनेक कलाकृती ज्या प्रकारे विचारप्रवर्तन करतात, त्या दर्जाचा अनुभव महाराष्ट्राबाहेर न जाता मराठीजनांना या दोन प्रदर्शनांतून मिळू शकतो, म्हणून ही दखल.
abhijit.tamhane@expressindia.com