scorecardresearch

स्त्रीवादी भूमिकेतून विभावरी शिरुरकर यांची चिकित्सा

डॉ. जास्वंदी वांबूरकर लिखित ‘इतिहास, स्त्रीवाद आणि विभावरी शिरुरकर’ हा महत्त्वाचा शोधग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे.

स्त्रीवादी भूमिकेतून विभावरी शिरुरकर यांची चिकित्सा

अंजली कुलकर्णी

डॉ. जास्वंदी वांबूरकर लिखित ‘इतिहास, स्त्रीवाद आणि विभावरी शिरुरकर’ हा महत्त्वाचा शोधग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. या ग्रंथात महाराष्ट्रातील १८१८ पासून १९४७ पर्यंत आणि १९४७ ते १९७५ पर्यंतच्या स्त्रीविषयक वास्तवाचा इतिहास, विविध स्त्रीवादी विचारप्रणाली आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून विभावरी शिरुरकर यांचे साहित्य यांच्यातील परस्पर नात्याचा एक विस्तृत प्रगल्भपट मांडला आहे. समीक्षेत आंतरशाखीय संशोधनाचे अशा प्रकारचे प्रयोग मराठीत दुर्मीळ आहेत; परंतु हे मोठे आव्हान डॉ. जास्वंदी यांनी समर्थपणे पेलले आहे. त्यासाठी या तिन्ही विषयांचा सांगोपांग आणि सखोल अभ्यास त्यांनी केला आहे, असे या ग्रंथातून दिसून येते.

महाराष्ट्रातील स्त्रीविषयक इतिहासाचा धांडोळा घेताना जास्वंदी यांनी या इतिहासातील स्त्री संदर्भातील अनिष्ट प्रथा, स्त्री शिक्षणाची चळवळ , कायद्यांची चळवळ इत्यादी घटनांचा वेध घेतला आहेच; याशिवाय महाराष्ट्रातील स्त्री सुधारकांच्या कार्याचाही नेटका परामर्श घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये असलेल्या स्त्रियांच्या सहभागाविषयी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दलित स्त्रियांच्या चळवळीविषयी नेमकेपणाने लिहिले आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील स्त्रियांच्या कामगिरीचाही चांगला वेध घेतला आहे. विशेष म्हणजे हे करताना त्यांनी स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या प्रकाशात स्त्रीविषयक वास्तवाचा शोध घेतला आहे.

जास्वंदी यांच्या या ग्रंथाचे वैशिष्टय़ असे आहे की, त्यांनी आधुनिक महाराष्ट्रातील स्त्रीविषयक वास्तवाचे अचूक आकलन मांडण्यासाठी मागच्या पिढीतील ज्येष्ठ लेखिका विभावरी शिरुरकर यांच्या साहित्याची स्त्रीवादी बैठकीतून मीमांसा केली आहे. त्यासाठी त्यांनी केलेले संशोधन महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाला एक वेगळे आयाम देणारे, अधिक परिपूर्ण आकलन मांडणारे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात ज्या काही रिकाम्या जागा राहून गेल्या होत्या त्या भरून काढण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे संशोधन कार्य उभारावे ही त्यांची कृतीच फार विलोभनीय आणि अनोखी आहे.

मुळात इतिहास साहित्य आणि समाज यांच्यातील संबंध अन्योन्य असतो. जास्वंदी यांनी या ग्रंथात साहित्य ही एक सामाजिक (खरे तर राजकीयही) कृती असते हे अधोरेखित केले आहे. जसा साहित्य आणि समाजाचा एक निरंतर असा अनुबंध असतो तसाच इतिहास आणि साहित्य हादेखील एक महत्त्वपूर्ण बंध असतो; कारण साहित्यातून तत्कालीन समाजमानस, व्यक्तिमानस प्रकट होत असते. इतिहासात घडून गेलेल्या घटनांच्या मागे उभे असलेले हे मानस जाणून घेणे हा इतिहासकारांचा आस्थेचा विषय असतो. साहित्यामधून स्थलकालसंबद्ध संस्कृती, जीवनमूल्य, विचार, राजकारण, समाजकारण इत्यादींचे दर्शन घडते. या दर्शनातील अंत:प्रवाह समजून घेतले तर तत्कालीन इतिहासावर नेमका प्रकाश टाकता येतो, हेच या ग्रंथाचे सारभूत प्रतिपादन आहे. या सिद्धांताच्या विचारांतून त्यांनी विभावरी यांच्या साहित्याची तपासणी केली आहे. अर्थात त्यामागे साहित्य, संस्कृती आणि लिंगभाव यामधील परस्परसंबंधांचा संदर्भ आहे. म्हणजे विशिष्ट स्थळकाळाच्या इतिहासाची लिंगभाव दृष्टिकोनातून पुनर्माडणी करताना साहित्य हे प्रमुख साधन ठरू शकते, हा या संशोधनापाठीमागचा मुद्दा आहे.

१९३० ते १९७० एवढय़ा दीर्घकाळामध्ये विभावरी लिहित्या होत्या आणि तो संपूर्ण काळ स्त्री सुधारणांच्या संदर्भात महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा काळ होता; त्यामुळे विभावरींच्या लेखनात त्या काळाने सोडलेल्या खुणा शोधणे महत्त्वाचे ठरते. या सगळय़ा काळात विभावरी यांनी कथा, कादंबऱ्या, नाटके असे ललित लेखन तसेच वैचारिक स्वरूपाचे लेखन केले. १९३३ साली त्यांचा ‘कळय़ांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला तेव्हा त्या कथासंग्रहाने समाजात खळबळ माजवली होती. विभावरी शिरुरकर हे टोपणनाव धारण करून बाळूताई खरे यांनी हे लेखन केले होते. या कथासंग्रहात त्यांनी अतिशय धीटपणाने प्रौढ कुमारिकांचे प्रश्न मांडलेले होते. या कथांच्या रूपाने नवकथेच्या खुणा मराठीत उमटल्या, असे त्यांच्या कथालेखनाचे ऐतिहासिक वाङ्मयीन महत्त्व त्या काळातील समीक्षकांनी अधोरेखित केले होते. साहित्य हे समाज सुधारण्याचे प्रभावी साधन आहे अशी लेखनापाठीमागची विभावरी यांची भूमिका होती.

विभावरी यांचे एकूण लेखन स्त्रीकेंद्री होते. जवळपास अर्धशतकाइतका त्यांचा लेखनप्रवास हा स्त्री प्रश्नांच्या आकलनाच्या संदर्भात अधिकाधिक प्रगल्भ होत गेलेला दिसतो. त्यांनी स्त्री जीवनातील स्थित्यंतरांचा मागोवा आपल्या लेखनातून घेतला. समाजात सुरू असलेल्या नव्या घडामोडींची नोंद यांच्या लेखनात दिसते. स्त्री प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी तत्कालीन समस्या मांडल्या ; परंतु त्या अनुषंगाने काही शाश्वत स्वरूपाची वैचारिक मांडणीदेखील केली, याची योग्य नोंद जास्वंदी यांनी घेतली आहे. स्वतंत्र भारतात स्त्री-पुरुष सहजीवन कसे असावे याचा वेध त्यांनी घेतला. शिकून अर्थार्जन करणाऱ्या आणि त्याद्वारे मुक्त होऊ बघणाऱ्या स्त्रिया आणि पारंपरिक सरंजामशाही मानसिकतेत अडकलेले पुरुष यांच्यातील ताणतणावांचे वास्तव चित्र त्यांनी रेखाटले. स्त्री सुधारणा चळवळीमुळे स्त्री जीवनात होणाऱ्या बदलांचा ठाव घेताना पुरुषांनी हे सामाजिक संक्रमण समंजसपणे समजून घेऊन परिवर्तनाला तयार झाले पाहिजे, असे मत त्यांनी आपल्या लेखनात मांडले.

अर्थात विभावरी यांच्या लेखनाला मर्यादा होत्या, परंतु तरीही त्यांनी त्या काळात मांडलेला स्त्रीवादी विचार मोलाचा होता. जास्वंदी यांनी विभावरी यांच्या साहित्याचे असे योग्य मूल्यमापन करून त्यांच्या लेखनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले आहे. १९७५ नंतर भारतात स्त्रीमुक्ती चळवळ जोरकसपणे आली. एक प्रकारे एकोणिसाव्या शतकापासून भारतात महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्त्री सुधारणा चळवळीने स्त्रीमुक्ती चळवळीसाठी योग्य अशी भूमी अगोदरच तयार करून ठेवली. या अंगाने स्त्रियांनी लेखन करून स्त्री चळवळीला बळ पुरवले होते. या दृष्टिकोनातून विभावरी यांच्या लेखनाचे महत्त्व स्पष्टपणे जाणवते. त्यांच्या चिंतनातून १९७५ पूर्वीच्या स्त्रियांच्या अंत:करणातली कोंडी प्रकटली, असे जास्वंदी यांनी म्हटले आहे ते अगदी यथार्थ आहे.
ही सगळी मांडणी करण्यासाठी जास्वंदी यांनी स्त्रीवादाच्या अभ्यासात निर्माण झालेले मार्क्सवादी, अस्तित्ववादी, पर्यावरणवादी इत्यादी विविध विचारप्रवाह, स्त्रीवादाचा इतिहास, महाराष्ट्रातल्या स्त्रीविषयक वास्तवाचा विस्तृत पट मांडला आहे. एका फार मोठय़ा व्यापक विषयाला हात घालून इतिहास, स्त्रीवाद आणि विभावरी यांचे साहित्य असा अनोखा त्रिबंध त्यांनी फार मोठय़ा ताकदीने मांडला आहे. डॉ. राजा दीक्षित यांची मौल्यवान प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. विषयाची संगतवार योग्य मांडणी, स्वत:चे स्वतंत्र विश्लेषण, योग्य संदर्भ आणि टिपा, निवडक संदर्भ – साहित्य – सूची यामुळे हा ग्रंथ परिपूर्ण पदाला निश्चितपणे पोहोचला आहे.

‘इतिहास, स्त्रीवाद आणि विभावरी शिरुरकर’- जास्वंदी वांबूरकर
सुनिधी पब्लिशर्स,
पाने- ३८३, किंमत- ६५० रुपये. ६

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 01:48 IST

संबंधित बातम्या