प्रा. विजय तापस
२०२२ साल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव आणि नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या ‘दुसरा पेशवा’ या नाटकाचाही अमृतमहोत्सव! हे नाटक आज वाचलं तरी या नाटकाचा वर्तमानाशी असलेला जिवंत अनुबंध लक्षात येतो. शिरवाडकरांच्या नाटय़दृष्टीचा जो खास विशेष म्हणजे उच्चतम आदर्श मूल्यांची पाठराखण करणं, तो इथेही आहे. एक मनाजोगी तेजारती या आदर्श रूपांना अर्पित करण्याचं काम या नाटकात तात्यासाहेब करतातच; त्याचबरोबर नाटकातल्या सर्व महत्त्वाच्या पात्रांचा जो जो आत्मभाव- त्याच्याशीही ते तद्रूप होतात. मात्र, ही तद्रूपता नाटककाराच्या आत्मलोपाचा नव्हे, तर आत्मस्फुल्लिंगाचा अनुभव देणारी आहे. दोनशे-सव्वादोनशे वर्षांची समज-अपसमजांची, अतिरेकी स्तुती/ अवहेलनेची धूळ झटकून नाटककार ज्या मोकळेपणाने बाजीराव, मस्तानी, काशीबाई, चिमाजी आणि तत्कालीन समाजाला सामोरा गेला आहे, त्याला दाद द्यायलाच हवी. इतिहास निर्माण करणाऱ्या माणसांकडे शरणागत भक्तांच्या मानसिकतेतून बघून चालत नाही. त्यांच्याकडे ज्या समजुतीने पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची आणि त्यांचा पिंड जाणण्याची जी वृत्ती असावी लागते, ती अगदी नेमकेपणाने ‘दुसरा पेशवा’ साकारणाऱ्या शिरवाडकरांमध्ये आपल्याला लख्ख दिसते. अशी दृष्टी नसते तेव्हा जब्बार पटेलांचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, केतन मेहता यांचा ‘सरदार’ किंवा अभिजीत पानसेंचा ‘ठाकरे’असे माहितीपट निर्माण होण्याचं आणि ते पाहावे लागण्याचं टळत नाही, हे खरं! असो.
तात्यासाहेब शिरवाडकर आज हवे होते असं वाटणारे बरेच लोक तुमच्या-माझ्या अवतीभवती आहेत, हे नक्की. कोणत्याही सत्तेचा धाक न बाळगता संबंधितांचे कान उपटण्याचं नैतिक बळ तात्यासाहेब, दुर्गाबाई भागवत आणि विंदा करंदीकर यांच्याकडे होतं. कारण या माणसांचं कर्तृत्वही तेवढंच मोठं होतं. या माणसांचं सर्वागीण मोठेपण ‘ते आज हवे होते’ असं अनेकांना वाटत राहण्यात सामावलेलं आहे.
नाटककार म्हणून शिरवाडकरांच्या नाटकांचा एक विशेष म्हणजे एकाच वेळेला त्यांची नाटय़-कथानकं, त्यातले पेच, त्यातली पात्रं आणि त्यांचं जीवन स्थल-कालाशी आणि समाज-संस्कृतीशी विशिष्ट असं नातं सांगत असतानाच ती सार्वकालिक, सार्वत्रिकतेशी असलेला आपला संबंध व्यक्त करत असतात. त्यांची नाटय़प्रतिभा पौराणिक काळ, ऐतिहासिक काळ आणि वर्तमानकाळाशी सहज संबंध जोडताना दिसते. तीच गोष्ट पात्रांची आणि त्यांच्या जगण्याची. व्यक्तीचा काळ, देश, त्याचा सांस्कृतिक-सामाजिक- आर्थिक वर्ग कोणताही असो; त्याच्या ‘असतेपणा’तल्या मानवी वृत्तीचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाटककार सातत्याने करत आहे हे कळतं. मूळची म्हणा वा कमावलेली म्हणा, त्यांची शोधक वृत्ती आणि चिकित्सक स्वभाव यांनी त्यांना कधीही धर्म, धार्मिकता, रूढी-परंपरा आणि ईश्वरी सत्ता या भूलभुलैयात अडकून पडू दिलं नाही. उलट, त्यांनी त्यांना माणसाच्या अधिकाधिक जवळ जायला प्रवृत्त केलं. तुम्ही त्यांची २२ नाटकं हवी तर पुन्हा एकदा काढून बघा.. तुम्हाला हाच अनुभव येईल. याचा अर्थ असा नाही की, त्यांची सगळी नाटकं ‘नाटक’ म्हणून निर्दोष, श्रेष्ठ दर्जाची आहेत. (उदा. ‘नाटक बसते आहे’, ‘देवाचे घर’, ‘विदूषक’ आणि अगदी ‘नटसम्राट’सुद्धा!) तशी ती नाहीत, आणि तशी ती असण्याची सक्तीही नाही. पण त्यातला त्यांचा माणसाला भिडण्याचा प्रयत्न खोटा वा कृतक आहे असं तुम्ही खात्रीने म्हणू शकणार नाही. एक प्रकारची बंडखोरी हा शिरवाडकरांचा स्थायीभाव होता. ‘‘प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशा वेळी रूढ नीतीचे उल्लंघन करावेच लागते,’’ हे त्यांचं एक वाक्य जितकं खतरनाक आहे, तेवढंच सत्य आहे. माणसाला माणुसकी देणाऱ्या शुद्ध सनातन नीतीचा जणू त्यांना ध्यास होता. समीक्षक डॉ. द. दि. पुंडे म्हणतात, ‘‘कुसुमाग्रज नीतीची उभारणी मध्ययुगीन पाप-पुण्यादी कल्पनांच्या आधारे न करता माणुसकीच्या तत्त्वावर, न्याय-अन्यायाच्या मूलगामी विचारांवर करतात.’’ हे अगदी खरं आहे. माणसाचा तरलस्पर्शी शोध घेत राहणं त्यांच्या नाटकांच्या ‘डीएनए’मध्येच आहे. याचाच अनुभव त्यांचं ‘दुसरा पेशवा’ हे नाटक देतं.
हे नाटक आहे चार अंकी आणि बारा प्रवेशी. प्रत्येक प्रवेशात साधारणपणे दोन-चार पात्रं. फार पसारा नाही. चारही अंकांतली पात्रसंख्या २२ असली तरी कुठेही गर्दीच्या जागा नाहीत. नाटकाचं कथानक महाराष्ट्राला.. मराठी मनाला अगदी परिचित असं आहे. पहिला बाजीराव पेशवा म्हणजे मराठी माणसाच्या कर्तृत्वशक्तीचा महामेरू! जगाच्या युद्धेतिहासात ज्या योद्धय़ाची, त्याच्या युद्धकौशल्याची आणि नायकत्वाची मोठय़ा गौरवाने नोंद झाली आणि ‘या सम हा’ अशी कीर्ती ज्याला त्याच्या हयातीतच प्राप्त झाली असा हा बाजीराव पेशवा! मराठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय आणि मराठी साम्राज्याचा विस्तारकर्ता बाजीराव पेशवा यांच्या मनोधारणा या जणू एकाच मुशीतून घडल्या असाव्यात. दोघांच्यात एक आंतरिक साम्य आहे यात संशय नाही. निग्रह आणि विजिगीषु वृत्ती, अफाट आत्मविश्वास, जातीपातीची उतरंड-जात्याभिमान- धार्मिक अवडंबर यांना दिलेली तिलांजली दोघांतही सारखीच आहे. मात्र, बाजीरावाच्या आयुष्यात मस्तानीचा प्रवेश झाल्याने आणि तिला बाजीरावाच्या घरातून विरोध झाल्याने त्याच्या आयुष्याला जे ग्रहण लागलं तो छत्रपती आणि बाजीराव यांच्यातला दोन ध्रुवांइतका भेद! ‘दुसरा पेशवा’च्या निर्मितीमागे शिरवाडकरांचा हेतू बाजीराव-मस्तानीची विव्हळ प्रेमकहाणी रंगवण्याचा नाही. त्यांचा विषय बाजीराव पेशवा हाही खरं पाहता नाही. मला वाटतं, तात्यासाहेबांना बाजीराव विरुद्ध बुरसटलेली ब्राह्मणशाही, धर्म- धर्मशाही- धर्मातिरेक विरुद्ध एक माणूस किंवा धार्मिक द्वेष विरुद्ध धर्मातीतता, विकृत ब्राह्मणी मानसिकता कर्तृत्वशाली बाजीरावाचा करत असलेला तेजोभंग ही नाटय़सूत्रं नाटक रचताना खुणावत असणार. कदाचित म्हणूनच त्यांच्या नाटकात बराचसा भाग ब्राह्मणवर्गाचा आर्थिक स्वार्थ, सत्तागाभाऱ्यात राहण्याची त्यांची लोचट धडपड, त्यांच्यातील एकाची प्रातिनिधिक ठरावी अशी कामपिपासा, त्या काळातल्या ब्रह्मवृंदाची धर्माच्या वा जातीच्या आधाराने सत्ता स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याची किळसवाणी लालसा, त्यांचा बहुजन समाजाविषयी असलेला तुच्छताभाव या नाटकात नेमकेपणाने चित्रित झाला आहे. ‘दुसरा पेशवा’ हे अठराव्या शतकातल्या महाराष्ट्रातल्या मस्तवाल ब्राह्मणशाहीचं अघोषित, पण अतिशय यथार्थ असं मीनिएचर आहे असं वाटतं. इथे अपवाद आहे तो विसाजी या कामलोलुप ब्राह्मणाच्या बायकोचा- म्हणजेच कावेरीचा. या स्त्रीचा नाटकातला वावर ‘एकच प्याला’तल्या अत्यंत परखड बोलणाऱ्या गीताशी साधम्र्य सांगणारा आहे, हे नक्की! या नाटकातला बाजीराव आणि इतिहासातला खराखुरा बाजीराव यांचं आंतरिक साम्य आणि त्यातले भेद तपासण्यासारखे आहेत. बंडखोरी हा त्यांचा समान गाभा आहे. दोघेही रणधुरंधर असले तरी ते कौटुंबिक चौकटीत पराभूत म्हणून सामोरे येतात.
या नाटकातली काही वाक्यं ही जणू तत्कालीन सामाजिक-धार्मिक स्थितीगतीचा पुरावा ठरणारी आहेत. त्यात देशस्थ-कोकणस्थ ब्राह्मणांमधील जीवघेणा, निर्थक वर्चस्ववाद असला तरी ‘आपण परस्परांना साहाय्य केलं पाहिजे’ हा धूर्तभावही आहे. १. ‘‘आपण ब्राह्मणांनी असं परस्परांशी भांडणं चांगलं का? मग ब्राह्मणेतरांशी कोण भांडेल?’’ २. ‘‘अहो, राज्य छत्रपतींचं आहे आणि चलती खरी कुणब्याधुणब्यांची आहे! हे शूद्र आणि अतिशूद्र असे काही मातले आहेत, की साऱ्या पृथ्वीवर त्यांचंच राज्य जणू सुरू झालं आहे!’’ ३. ‘‘खुद्द पेशव्यांना आपल्या ब्रह्मधर्माची, ब्रह्मकर्तव्याची जाणीव आहे का? बाजीरावाने हाती धरलेली माणसं पाहा. कोणी धनगर, कोणी गुराखी, कोणी सुतार, कोणी लोहार, कोणी महार! छे: छे:! कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ते काही खोटं नाही!’’ ४. ‘‘पुण्याला जडला आहे एक रोग. या रोगाचं नाव विभूतिपूजा!’’ ५. ‘‘अहो, बाजीरावाच्या धर्मद्रोही धोरणामुळे ही शूद्र लोकं असेच सर्वत्र मातून गेले आहेत! आपल्याला भूमीही अनुकूल आहे. अनेक प्रतिष्ठित ब्राह्मणांशी माझं बोलणं झालं आहे. पेशव्यांचं हे शूद्राचरण सर्वानाच अमान्य आहे. पुढील कार्याची रूपरेषा आपल्याला आखायला पाहिजे!’’ ६. ‘‘ज्याचं स्वत:चं वर्तन धर्मशुद्ध नाही, तो काय देशातल्या धर्माचं रक्षण करणार! हे म्हणे स्वराज्य..! ज्या स्वराज्यात आमच्या धर्माचं रक्षण होत नाही ते स्वराज्य आम्हाला नको! त्यापेक्षा दिल्लीची अिवध बादशाही फार उत्तम!’’ ही सहाही उद्धृतं स्वत:च इतकी बोलकी आहेत की त्यावर काही भाष्य करण्याची गरजच नाही. त्याला ‘आत्मघाती दुर्दैव’ म्हणण्याखेरीज पर्याय नाही. हेच पोटार्थी ब्राह्मण बाजीरावाचा निषेध करण्यासाठी शनिवार वाडय़ासमोर शेकडोंनी गोळा होतात तेव्हा त्यांना बघून बाजीराव तीव्र संतापाने ‘‘बाहेर जाऊन या क्षुद्र कीटकांना ठेचून, चिरडून टाकू का?’’ हे जे शब्द उच्चारतो, ते एका अर्थाने त्याच्या सामर्थ्यांचे वाहक आहेत. आणि चिमाजीने त्याच्यावर धर्मशस्त्रांचा वापर करून जे पांगळेपण लादलं आहे त्यातून निर्माण झालेल्या हतबलतेचेही ते वाहक आहेत. नाटकाच्या अखेरच्या भागात बाजीराव आणि चिमाजी यांचा अत्यंत तीक्ष्ण स्वरूपाचा संवाद आहे. त्यात बाजीराव म्हणतो, ‘‘देशाला नीतिमत्तेचे पाठ देणारा मी नेता नाही. देशाच्या राजकारणाचा मी नेता आहे. त्यात माझ्याकडून काही अपराध घडला तर आणि तरच मला शासन करण्याचा लोकांना अधिकार आहे!’’ यावरच चिमाजी म्हणतो, ‘‘देशाचा नेता हा केवळ राजकारणाचा नेता नसतो, तर देशातील सामुदायिक जीवनाचा नेता असतो. भट कुळाच्या प्रतिष्ठेसाठी आणि मराठी दौलतीच्या अभिवृद्धीसाठी तुम्हाला आपलं वर्तन सुधारलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मस्तानीबाईसाहेबांना दूर ठेवलं पाहिजे.’’
इथून पुढे नाटकात बाजीरावाचा मृत्यू आणि नंतर त्याच्या वियोगाचं दु:ख अस होऊन मस्तानीने विष घेऊन जीवन संपविण्याचा प्रसंग घडतो आणि नाटक संपतं.
बाजीरावाच्या मृत्यूला आज जवळपास २८० वर्ष झाली आहेत. त्याच्या अकाली मृत्यूला जबाबदार कोण, याचं नेमकं उत्तर कोण देऊ शकेल? कोणाला जबाबदार धरायचं यासाठी? बाजीरावाने ‘धार्मिक अनाचार’ केल्याचा डंका पिटून त्याला अवमानित आणि दंडित करणारी ब्राह्मणशाही आणि चिमाजी यांना या अपराधासाठी जबाबदार धरावं, की त्यांना अक्कलशून्य करणाऱ्या धर्म नावाच्या अफूच्या गोळीला? एक मात्र खरं, बाजीरावाच्या अकाली मरणाने मराठी साम्राज्याचं किती नुकसान झालं याचा हिशेब आजवर कुणीच सडेतोडपणे मांडलेला नाही! अगदी धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या इतिहासकारांनीसुद्धा!
vijaytapas@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victim brahmanism second peshwa amritmahotsav playwright vishnu vaman shirwadkar drama amy
First published on: 29-05-2022 at 00:02 IST