उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी कधीकाळी आपल्या देशाची मानसिकता होती. त्या वेळी शेतकरी हा खर्या अर्थाने बळीराजा होता. पण बदललेल्या आधुनिक जगात शेती करणं कनिष्ठ दर्जाचं मानलं जाऊ लागलं. विकासाच्या नावाखाली शेती व्यवसायात झालेले बदल हे शेतकर्यांसाठी त्रासदायक तर ठरलेच, त्याचबरोबर ते त्यांच्या शिवारासाठी जास्त हानीकारक ठरले. आधुनिक पद्धतीने शेती करताना शिवाराचं होणारं शोषण आणि त्यामुळे सुपीक जमिनीचं रूप बदलून नापीक, क्षारपड जमीन होण्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास त्या शिवारासाठी जसा वेदनादायी ठरला, तसाच तो शिवाराच्या शेतकरी मालकासाठीही वेदनादायी झाला. असं शिवाराचं आणि त्यासाठी कष्ट करणार्या शेतकर्याचं दु:ख विजय जाधव यांनी आपल्या ‘शिवार’ या कादंबरीत मांडलेलं आहे.

गेल्या तीस-चाळीस वर्षांत महाराष्ट्रातील शेतकर्याने शेती करण्यासाठी आधुनिक पर्यायांचा जास्त वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे पारंपरिक पिकं घेणं मागे पडून नगद पैसा देणारी पिकं घेण्याकडे कल वाढू लागला आहे. शाळूसारखं पारंपरिक पीक मागे पडून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आहे. त्यामुळे गावगाड्यात ऊसशेतीने निर्माण झालेले प्रश्न व त्यामुळे नाडल्या जाणार्या शेतकर्याचं जीवन कादंबरीत वाचायला मिळतं. शेतात भरमसाट कीटकनाशकं, रासायनिक खतं व पाण्याचा बेसुमार वापर केल्यामुळे जमिनीचा कस कसा लयाला जातो, पाण्याच्या स्कीम सुरू करताना शासकीय योजनेत शेतकर्याला कसं फसवलं जातं, कारखानदारांचे हितसंबंधाचे राजकारण कसं चालतं, गावातल्या गरीब शेतकर्यांच्या पैशावर गावातील पुढारी कसे श्रीमंत होतात व क्षारपड झालेल्या जमिनीमुळे बॅंकांच्या कर्जात शेतकरी कसा पोळून निघतो याचं वर्णन कादंबरीत वाचून वाचक अंतर्मुख होतो.

शेतकरी शेती करून फक्त माणसाचं पोट भरत नसतो, तर तो सर्व पशू, पक्षी, कीटक इत्यादी सजीवांची अन्नसाखळी चालविण्यास मदत करत असतो. शेतात पीक तयार झालं की दाणे टिपण्यासाठी पाखरांची झुम्मड उडते. पाखरांनी शेतातले दाणे खाल्ल्याने शेतकर्याचे थोडे नुकसान जरी झाले तरी पाखरांमुळेच शिवाराचा अणि मातीचा तोल सांभाळला जात असतो. जैवविविधता टिकविण्यासाठी शाळूसारख्या पिकांचा जास्त उपयोग होत असतो. पण वाढत्या उसाच्या लागवडीमुळे पाखरांच्या अस्तित्वावरच घाला पडल्याचं चित्र आसपास दिसायला लागल्याची खंत कादंबरीत व्यक्त केली आहे.

हे सांगताना कादंबरीचा नायक म्हणतो, ‘‘किती तरी पाखरांनी आपणाला जीव लावला. त्यांच्या करामती बघण्यात दिवस कसा गेला हे समजायचं न्हाई; पण म्होरच्या वरसी ह्य शिवारात सगळीकडं ऊस झाल्यावर हे रानातलं मुकं जीव कुठं जात्याली? माणसापरास ह्यस्नी जीव लावला तर ती आपणाबरोबर कधी कपटानं वागणार न्हायती. पिकाचं कमीजास्त नुकसान हुतयं; पण ह्येंच्यामुळंच शिवाराचा आणि मातीचा तोल सांभाळला जातूय.’’ शाश्वत शेतीची संकल्पना समजावून घेऊन सेंद्रिय पद्धतीने शेती शेतकर्यांनी आता केलीच पाहिजे, तरच भविष्यात शिवार फुलेल, त्याच्यावर अवलंबून असणारा प्रत्येक जीव जगेल. ऊसशेतीमुळे शेतकर्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी प्रत्येकाने व विशेषत: शेतकरी वर्गाने ‘शिवार’ ही कादंबरी वाचायलाच हवी.

‘शिवार’ – विजय धोंडीराम जाधव, मनोविकास प्रकाशन,
पाने- २०३, किंमत- २९० रुपये

umukatkar@gmail.com