‘‘मी आत्मचरित्र लिहित्येय. तुझी मदत लागेल,’’ असा बाईंचा फोन आला. बाहेर सपासप पाऊस पडत होता. साल : २०११. बुधवारी बाई गेल्याची बातमी आली. रात्री उशिरा. मी बाईंचं  obit लिहायला बसलो. आयपॅडच्या स्क्रीनवरची अक्षरं धुरकट दिसू लागली. बाहेर पावसाचा राडा सुरू होता. एक वर्तुळ पूर्ण झालं असं वाटलं. वर्तुळ. झिम्मा. ‘झिम्मा’मुळे बाईंचा स्नेह मिळाला. पंधरा वर्षं. ‘झिम्मा’चं लिखाण वर्षभर चाललं. कदाचित जास्त. ते सगळे दिवस आनंदाचे होते. डेरेदार झाडाच्या सावलीत बसलो आहोत असं वाटायचं.

पुस्तकाचं कसं काय करायचं हे ठरवण्यासाठी ‘राजहंस’चे दिलीप माजगावकर आणि मी विजयाबाईंना भेटलो. बाईंनी पुस्तकाचा एक कच्चा आराखडा लिहून काढला होता. तो आमच्यासमोर ठेवला. शब्दांकनाची कल्पना त्यांनी फेटाळून लावली. त्या म्हणाल्या, ‘‘सगळा मजकूर मी लिहिणार. पुढचं तू बघायचं.’’ म्हणजे प्रेस कॉपी तयार करणं, प्रुफं तपासणं, वगैरे…

बाई विलक्षण शिस्तीच्या. सगळं काम चोख नि काटेकोर. दर आठवड्याला एक प्रकरण मला कुरियरनं पाठवायच्या. ते वाचून मी त्यावर छोटंसं टिपण लिहायचो. अशी तीनेक प्रकरणं झाली की, बाईंच्या घरी आम्ही एकत्र बसून ती वाचायचो, चर्चा करायचो.

प्रेससाठी फायनल कॉपी झाली की बाई सगळा मजकूर पुन्हा बारकाईनं वाचायच्या. पुन्हा चर्चा नि दुरुस्त्या, खाडाखोड, पुनर्लेखन. बरंच मोठं लचांड आपण मागे लावून घेतलंय असं एकेकदा वाटायचं. एकीकडे ‘टाइम्स’मधली रोजची बातमीदारी. दुसरीकडे हा बडा खयाल.

सुरुवातीचे काही दिवस मी बर्‍यापैकी नर्व्हस होतो. पण जो जो काम पुढं सरकू लागलं तो तो माझ्या लक्षात आलं की, बाईंच्या पुस्तकामुळे मला निवांतपणा मिळतोय. रोजच्या राजकारणाच्या, भ्रष्टाचाराच्या बातम्यांपेक्षा हे लिखाण मनाला भावणारं.

बाईंचं बोट धरून मी एका वेगळ्याच जगात जायचो. देश नि काळाची बंधनं गळून पडायची. बाईंच्या जगात शितू होती, बॅरिस्टर आणि मावशी होते, निरागस हौसा होती. कालिदास, शेक्सपियर, तेंडुलकर, ब्रेख्त, खानोलकर, दळवी आणि एलकुंचवार होते. आणि माणसं होती : भ्याड आणि भाबडी… क्रूर आणि कणखर… जगण्याच्या शुद्ध वासनेनं उजळून नि पोळून निघालेली माणसं.

मी बातमीदार. फॅक्ट ही आमची कच्ची सामग्री. बाईंनी मला वास्तव आणि कल्पनेला जोडणारा कला नामक धुक्याचा पूल दाखवला. एकदा बाईंनी पिकासोचं एक वाक्य सांगितलं : ‘सगळ्याच कला खोट्या असतात; परंतु त्या तुम्हाला अंतिम नि शाश्वत सत्याकडे घेऊन जातात.’

एकदा म्हणाल्या, ‘‘हे पाहा, मी रंगभूमीवर काम केलंय. तू लिखाण-संपादन करणारा. आपण पुस्तक करतो आहोत. हे सगळं मला नवीन आहे. लिखाणाच्या अनुभूती वेगळ्या असतात. त्या मला समजून घ्याव्या लागतील. ते झालं की काम पुढे जाईल. मला थोडा वेळ दे.’’

एकदा काम संपता संपता बराच उशीर झाला. ‘‘जेवून जा आता,’’ बाई म्हणाल्या. मी ‘नको’ म्हणालो. त्यांनी माझ्या हातात खाऊचा डबा ठेवला. कप केक, ढोकळे, बर्फी, बदाम-चॉकलेट नि काय काय. म्हणाल्या, ‘‘आईला ढोकळे दे. मऊ आहेत.’’

बाई हमखास सकाळी सकाळी फोन करायच्या. आठ वगैरे वाजता. ती माझी पाणी भरण्याची वेळ. ‘‘काय रे, तू फोन का घेत नाहीस?’’ बाई एकदा वैतागल्या.

‘‘बाई, सकाळी पाणी भरायचं असतं,’’ मी म्हणालो.

तर बाई खो खो हसल्या.

‘‘बरं, दहा वाजता करते फोन.’’

भेटायचं ठरलं असेल तर बाई आदल्या दिवशी महत्त्वाचे मुद्दे फोनवर सांगायच्या. ट्रेनच्या प्रवासात मी त्यांवर विचार करायचो. रात्री घरी आल्यावर उशिरापर्यंत लिखाण करायचो. ना बाईंनी कधी डेडलाइन चुकवली, ना मी. माजगावकरांचं पुस्तकावर बारीक लक्ष होतं.

बाईंनी अख्खं पुस्तक स्वत: रीतसर लिहून काढलं हे मला थोर वाटतं. एक तरबेज लेखनिक ठेवणं त्यांना सहज शक्य होतं. नको म्हणाल्या. ‘‘मला माझं लिहू दे.’’ त्यांची अक्षरं लपेटदार. मजकूर ओघवता. एक वांधा आला. ‘‘केले, सांगितले’ असं बाईंचं मराठी. मी म्हणालो, ‘‘बाई, ‘केलं, सांगितलं, विचारलं’ असं लिहा.’’ बाई नाही म्हणाल्या. ‘‘नाटकातल्या जुन्या गोष्टी तुम्ही बाद करून टाकल्याहेत. मग लिखाणात नवं करा ना!’’ तर हसल्या. म्हणाल्या, ‘‘करीन रे. पुढच्या खेपेला.’’ बाई मला ‘आंबरीश’ म्हणायच्या.

बाईंना भेटण्याची वेळ दुपारी तीन वाजता. म्हणायच्या, ‘‘उशीर करू नकोस रे.’’ मी पावणेतीनलाच ‘अशोका अपार्टमेंट’च्या फाटकापाशी उभा असायचो. बैठकीच्या खोलीत प्रफुल्ला डहाणूकरांचं एक सुरेख पेंटिंग होतं. प्रफुल्लाबाय बाईंच्या एकदम खास. बाई, प्रफुल्लाबाय आणि किशोरीताई (आमोणकर) असं एक त्रिकूट होतं. एकदा आम्ही काम करत असताना प्रफुल्लाबायचा फोन आला : रात्री आईस्क्रीम ओरपायला जायचं का, असं विचारत होत्या.

बाईंचं एक खास टेबल होतं. शिसवी नि मजबूत. मर्ढेकरांच्या ‘दणकट दंड स्नायू जैसे…’ची आठवण करून देणारं. टेबलापाशी बसून बाई लिहू लागल्या की डिट्टो लक्ष्मीबाई टिळकांसारख्या दिसायच्या.

चर्चेला बसताना बाई आपली फाईल उघडायच्या. ठिकठिकाणी भोकं पडलेल्या पोत्यातून गव्हाचे दाणे पटापट बाहेर पडावेत तशी बाईंनी लिहिलेली टिपणं-टाचणं सरसर टेबलावर सांडायची. मी बुचकळ्यात पडायचो. बाई सगळी कागदं क्रमवार लावायच्या. प्रत्येक प्रकरण त्यांनी बारकाईनं वाचलेलं असायचं. नि त्यावर एक छोटंसं टिपण लिहून तयार असायचं.

रंगभूमीशी संबंधित एका-दोघांनी मला विचारलं, ‘‘बाई सगळं खरं खरं सांगणारेत काय?’’ बाईंचं खरं बाईंना ठाऊक. व्यक्तिगत आयुष्यात वादळं येतातच. त्यावर किती लिहावं हे चरित्रनायकावर (नायिकेवर) सोडून दिलं पाहिजे. आत्मचरित्र म्हणजे चुकांचा कबुलीनामा असा एक नियम आपण तयार केलाय. नि तो आपण ्त्रिरयांच्या आत्मचरित्राला (खासकरून कला क्षेत्रातल्या ्त्रिरयांना) बिनदिक्कत लावतो. बाईंनी रंगभूमीवर काय प्रयोग केले ते महत्त्वाचं. कागदावर लिहिलेलं नाटक प्रत्यक्षात रंगभूमीवर सादर करणं ही एक गुंतागुंतीची नि छिन्नी-हातोड्याची प्रक्रिया आहे. बरीचशी फिजिकल. ती बाईंनी ‘झिम्मा’त विस्तारानं सांगितली याचं मला समाधान आहे.

एकेकदा फारोख मेहता चेष्टेनं विचारायचे, ‘‘कधी पुरा होणार हा तुमचा महाग्रंथ? नि कोण वाचणार तो?’’

‘‘सध्या आम्ही दोघं वाचतोय,’’ बाई म्हणायच्या.

पती-पत्नींची विनोदबुद्धी तल्लख. खास करून त्यांचा  self deprecating humour. बाई स्वत:ची मस्त खिल्ली उडवायच्या. एकदा म्हणाल्या, ‘‘अंब्या, मला जोक सांगता येत नाही. विनोद संगतवार सांगायचा असतो नि त्यातला पंच शेवटी यायला हवा. माझं गणितच सगळं फसतं बघ. मी आधीच पंच सांगून टाकते नि तोसुद्धा धडपणे सांगणं जमत नाही मला. मंग्या, (मंगेश कुलकर्णी) नाना (पाटेकर) माझी थट्टा करतात.’’

बाई एकदम काही तरी चित्रमय लिहायच्या नि मजकूर उजळून निघायचा. पारशी-इंग्रजी रंगभूमीचे थोर दिग्दर्शक अदी मर्झबान यांच्या स्कूटरवर बसून बाई तालमीला जायच्या तेव्हा त्या वीसेक वर्षांच्या होत्या. माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य उभं राहिलं. चाळिशीचे नि जाडजूड, गब्दुल अदी मर्झबान स्कूटर चालवताहेत नि शिडशिडीत, पोरसवदा विजया जयवंत मागे बसलीए. नाटकांतही बाई छान व्हिज्युअल्स पेरायच्या. ‘वाडा चिरेबंदी’, ‘बॅरिस्टर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’ वगैरे.

चिं. त्र्यं. खानोलकर, माधव वाटवे, महेश एलकुंचवार, अशोक शहाणे, वृंदावन दंडवते वगैरे मंडळींबद्दल बाईंना विशेष प्रेम होतं. वा. ल. कुलकर्णी, श्री. पु.भागवत, दुर्गाबाई भागवत, डॉ. कुमुद मेहता यांच्याविषयी त्यांना आदर होता.

विजयाबाई बर्‍याच इंग्रजाळलेल्या आहेत असा एक समज तयार झाला होता. तो अर्थातच निराधार होता. बाई अस्सल मराठी होत्या. महाराष्ट्राच्या विधायक सांस्कृतिक संचिताविषयी त्यांना खोल आस्था होती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाईंच्या दोन भूमिका : एक, ‘बॅरिस्टर’मधली मावशी आणि ‘वाडा चिरेबंदी’तली आई. दोघी मर्‍हाटमोळ्या परंपरेतल्या.

दुसरं, तेंडुलकर, खानोलकर, दळवी, एलकुंचवार असे मातब्बर मराठी नाटककार आपल्या संहिता त्यांच्या हाती सुपूर्द करत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. संवादफेक, शब्दांचं वजन, लहजा यांकडे बाईंचं बारीक लक्ष असायचं.

विजयाबाई मूळच्या रॅडिकल ह्यूमनिस्ट. रॉयवाद आणि प्रजा समाजवादी पक्षाबद्दल त्यांना आपुलकी होती. पण त्यांनी ‘रंगायन’ला प्रजा समाजवादी पक्षाचा कला विभाग             

असं स्वरूप दिलं नाही. बाईंनी आगरकरी विचारपरंपरा आपली मानली नि तेवढं त्यांना पुरेसं होतं. विजय तेंडुलकरही त्याच स्कूलचे.

बाई-तेंडुलकरांनी मराठी रंगभूमीचा साचा बदलून टाकला. अशुभाशी डोळा भिडवायचा असतो हे सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेक्षकांना ‘रंगायन’नं सांगितलं. पवित्र नि मंगल मूल्यं आकाशातून खाली पडत नसतात. त्यासाठी जीविताचं अंत:स्थ, खोल नि चौरस भान असावं लागतं हे सूत्र धरून बाईंनी काम केलं. त्यासाठी रंगभूमीच्या सगळ्या शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या.

कलावंत हा मूळचा विध्वंसकच असतो. Subversive असतो. अन्याय्य व्यवस्थेविषयी तो / ती लोकांना सतत डिवचत असतात ही बाईंची मूळ प्रेरणा होती.

हलकीफुलकी सुखांतिका हा बाईंचा प्रांत नव्हता. ‘‘मृणालताईंसारख्या (मृणाल गोरे) बंडखोर स्त्रीची भूमिका करायला मिळाली नाही याची चुटपुट लागते,’’ असं एकदा बोलता बोलता म्हणाल्या. यात सगळं आलं.

त्याच काळात हुसेन, सूझा नि गायतोंडे चित्रकलेत, पं. रविशंकर, कुमार गंधर्व, किशोरीताई अभिजात संगीतात तर नेमाडे-अशोक शहाणे-नामदेव ढसाळ साहित्यात नवे, डोळस प्रयोग करत होते. आज हे सगळं अविश्वसनीय वाटतं किंवा नकोसं. दुसरी शक्यता जास्त- कदाचित.

बाईंची एक मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी मराठी नाटकवाल्यांना नियोजन, व्यवस्थापन, व्यावसायिक शिस्त, वक्तशीरपणा, कार्यकौशल्य वगैरे आधुनिक मूल्यं शिकवली. आधुनिक म्हणजे इंग्रजाळलेलं असं नाही हेच त्या सांगत होत्या. एनसीपीए, संगीत नाटक ॲकेडेमी, एनएसडी वगैरे प्रशासकीय जबाबदार्‍या त्यांनी उत्तम पार पाडल्या. मराठी नाटक परदेशी घेऊन गेल्या. कलावंत-नाटककारांच्या नंतरच्या पिढीला जागतिक रंगभूमीचं भान आलं ते बाईंमुळे.

दुसरं, बाईंनी दमदार कलावंतांची एक तगडी फौज रंगभूमीवर उभी केली. नाना पाटेकर, अशोक सराफ, विक्रम गोखले, रीमा लागू, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, उदय म्हैसकर, भारती आचरेकर, मंगेश कुलकर्णी… सगळेच गुणी. संगीतात घराणी असतात. रंगभूमीवर विजयाबाईंचं घराणं होतं.

बाईंना आपल्या सह-कलाकारांचा अभिमान होता. आपल्या नाटकांचा प्रवास सांगताना ‘आमची गॅंग, भिडू’ असं म्हणायच्या. पण बाईंनी गुरू-शिष्य परंपरेची चिक्कट दलदल केली नाही. आपला  regal aloofness अखेरपर्यंत सांभाळला. बाईंत एक vanity होती. ती त्यांना शोभून दिसली. जशी क्लिओपात्राला किंवा द्रौपदीला!

बाईंनी काळाला केंद्रस्थानी कल्पून डोळ्यांसमोर सामाजिक-सांस्कृतिक पट ठेवला असता तर पुस्तकाला व्यापक बैठक मिळाली असती, पण तसं झालं नाही. त्यांच्या कारकीर्दीचा जमाखर्च फार मोठा. तोच लिहिता लिहिता मजकूर वाढला. माजगावकरांनी पुस्तक प्रेमानं छापलं. सुभाष अवचटांच्या मुखपृष्ठामुळे ‘झिम्मा’चं देखणंपण अधिक देखणं झालं. पुस्तक आवडल्याचं अनेकांनी सांगितलं, आजही सांगतात. त्यांत नाटकातले लोक फारसे नसतात.

पुस्तक झालं. बाईंनी अर्पणपत्रिका लिहून पाठवली : श्री. पु. भागवत आणि एनसीपीएचे डॉ. जमशेद जहांगीर भाभा. फारोख मेहता आणि मुलांचा उल्लेख नाही.

मी बाईंना विचारलं. म्हणाल्या, ‘‘फारोख आणि मुलं मला प्रिय आहेतच, पण डॉ. भाभा आणि श्री. पु. भेटले नसते तर मला लिहावंसं वाटलं नसतं.’’

महाराष्ट्रानं देवल-गडकरी युग पाहिलं. दोघं रंगभूमीचे मास्तर. विजयाबाई या मराठी रंगभूमीच्या एकमेव स्त्री मास्तर.

बाई गेल्या. कळ्या देऊन गेल्याहेत. त्याची फुलं आपल्याला करायचीएत.

uambarish.mishra@icloud.com