बिज्जी मूळचे मौखिक परंपरेतले अस्सल कथाकार. राजस्थानीला साहित्य अकादमीत भाषेची मान्यता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा. स्वत:च त्यांच्या लोककथेतल्या एखाद्या खेड्यातून आलेल्या रांगड्या पात्रासारखे ते दिसायचे. देशीवादातलं सौंदर्यशास्त्र व्यवस्थित सांभाळणारे… विजयदान देठा ऊर्फ बिज्जी हे नाव उत्तरेत सुपरिचित असलं तरी महाराष्ट्रात तसं फारसं ओळखीचं नसावं. पण त्यांच्या कथांवर आधारित हबीब तन्वीर यांनी लिहून बसवलेली ‘चरणदास चोर’सारखी नाटकं, ज्याच्यावर श्याम बेनेगल यांनी नंतर फिल्मही बनवली होती. मणी कौल यांनी बनवलेली ‘दुविधा’, प्रकाश झा निर्मित ‘परिणती’ आणि २००५ मध्ये आलेली अमोल पालेकरांची ‘पहेली’ ही फिल्मही त्यांच्या लोककथांवरच्या कामाची मनोरंजनात्मक ओळख काहींना असण्याची शक्यता आहे.
मला बिज्जींआधी त्यांचं एक प्रकाशनार्थ तयार केलेलं हस्तलिखित मिळालं. राजस्थानी मिट्टीचा गहिरा गंध असलेली श्रीमंत बोलीभाषा, नाट्यपूर्ण शैली, अतिशय सुरेख हस्ताक्षर. व्यवस्थितपणे कागदाच्या दोन्ही बाजूला जागा सोडून लिहिलेलं… या आधी इतकं व्यवस्थित हस्तलिखित वसंत देवांनी केलेल्या कुठल्याशा अनुवादाचं पाहिलं होतं आणि मनोमन दाद दिली होती. बिज्जी नामक शब्दशिल्पी वल्ली भेटल्यावर आमचं संभाषण ‘कथा कशा वाटल्या?’ वगैरेंकडे येण्याआधी लेखक आणि हस्तलिखितांवर रंगलं. ही भेट झाली तेव्हा संगणक नवीन होते, बहुतेक ज्येष्ठ लेखक टाइप करून घेत वा हस्तलिखित पाठवत. बिज्जींच्या स्वभावात औपचारिकता फारशी नसे. एकदा माणूस आवडला की ते लगेच एकेरीवर येत, त्याचं गुणगान पाच-पन्नास जणांकडे करत. पहिल्याच भेटीत कळलं की त्यांच्याजवळ हजारो लोककथांचं भांडार होतं, त्यातल्या निवडून ‘बातां री फुलवारी’चे चौदा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केले होते.
बिज्जी म्हणजे अस्सल राजस्थानी माणूस. स्वत:च त्यांच्या कथेतल्या एखाद्या खेड्यातून आलेल्या रांगड्या पात्रासारखे दिसायचे. देशीवादातलं सौंदर्यशास्त्र व्यवस्थित सांभाळणारे… खादीचे धोतर, पूर्ण बाह्यांचा कुडता आणि बंडी, खांद्यावर सुंदरसा झोला लटकवलेला. जाड्याभरड्या, रंगीबेरंगी बंड्या आणि शालींची साठवण होती त्यांच्याकडे. महिन्यात एखादी चक्कर असायचीच दिल्लीत, काही ना काही कामानिमित्त. कधी पुस्तक छापायचं असे. साहित्य आणि संगीत नाटक दोन्ही अकादमींशी जोडलेले असल्याने बैठकी, कधीमधी एनएसडीमध्ये त्यांच्या कुठल्यातरी कथेवर ‘माई री मै कासे कहूँ’सारखं नाटक बसत असायचं आणि त्याच्या रंगीत तालमीला अकादमीची लायब्रेरियन मैत्रीण विजयालक्ष्मी तसेच मला आग्रहाने ओढून नेलं जायचं.
आमचं मत ताबडतोब अपेक्षित असे. तालीम पाहताना, ते स्वत:ही नेहमी बरोबर असलेल्या सुंदरशा चोपडीत नोंदी करीत असत. मुळात लोककथा, फँटसी वगैरेंमध्ये मला फार गम्य नसल्याने माझ्याकडून त्यांना कधी उपयुक्त सूचना मिळाली असेल असं वाटत नाही. विजया मात्र ‘इसको यूं मोडें, उसको वैसे पेश करे तो कैसा होगा?’ सारखे प्रश्न विचारी. बिज्जींबरोबर कधी कधी कलासमीक्षक कोमल कोठारीही असत. आम्ही मल्लिका साराभाई आणि अलारमेल वल्ली यांचे नृत्याचे कार्यक्रम एकत्र पाहिले, कारण राजस्थानातल्या बोरुंदातून आलेल्या कलाग्राही बिज्जींना दिल्लीतल्या मुक्कामाचा प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे. दुसरं म्हणजे राजस्थान संगीत नाटक अकादमीचे भूतपूर्व सचिव कोमलजी बरोबर असले की पास-बिस कोणी विचारत नसे. सरळ पहिल्या रांगेत प्रतिष्ठापना होई.
नृत्य बघावं तर असं! तेही दोन जाणकार पद्मश्रींबरोबर. बिज्जी सपाटून वाचत. त्यामुळे जेएनयूच्या प्रा. नामवर सिंगांसारखीच विजयाशी खास दोस्ती बनवून ठेवलेली. बोरुंदाला परत जाताना तिच्याकडून थैलीभर पुस्तकं घेऊन जायची आणि पुढल्यावेळी परत आणून द्यायची. आवडलेल्या पुस्तकांची तोंडभर स्तुती आणि न आवडलेल्या पुस्तकाला, ‘‘याचं लायब्ररीत काय काम? इसे तो कूडे में डाल दो की, किसी और का समय बरबाद न हो.’’ असं म्हणून बाजूला ढकललं जायचं. ‘सेल्फ डाउट’ किंवा ‘मताची व्यक्तिनिष्ठता’सारख्या छोट्यामोठ्या गोष्टी बिज्जींच्या आसपास फिरकत नसत.
बिज्जी मूळचे मौखिक परंपरेतले कथाकार. आपल्या गोष्टींचं वाचन त्यांना छानच करता यायचं. आम्ही संपादकीय विभागातली तिघं-चौघं आणि कोणी एखाद् दुसरे त्यांच्याबरोबर आलेले- पुरेसे असायचो. आम्हाला ते त्यांचा साऊंडिंग बोर्ड म्हणायचे. त्यांना त्यांच्या पुस्तकांच्या कव्हर डिझायनिंगसाठी सल्लामसलत हवी असायची. माझं हस्ताक्षर पसंत म्हणून माझ्या हातून एखाद्या कव्हरवर लेटरिंग व्हावं अशी त्यांची इच्छा, पण ते करणं म्हणजे एक झेंगट ठरेल हे लक्षात आल्याने तो अव्यवहारी आग्रह बारगळला. त्यांना माझी थोडीफार मदत झाली असेल तर ती त्यांच्या The Dilemma या कथासंग्रहासाठी कथा निवडण्यात आणि राजस्थानीतले काही शब्द आणि संदर्भ इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात. अनुवाद रूथ वनिता यांनी उत्कृष्ट केलाच होता.
राजस्थानीला साहित्य अकादमीत भाषेची मान्यता मिळवून देण्यात बिज्जींचा सिंहाचा वाटा होता. राजस्थानीचं पहिलं पारितोषिकही त्यांना मिळालं होतं ‘बातां री फुलवारी’साठी. त्यांच्यासारखाच दिसणारा त्यांचा कवी मुलगा कैलाश कबीर त्यांच्या लेखनाचे हिंदी अनुवाद करत असे. बिज्जीच्या कथांवर संशोधन करण्यासाठी परदेशी अभ्यासक येत, कुठल्या तरी अमेरिकन युनिव्हर्सिटी प्रेसने त्यांचा कथासंग्रह इंग्रजीमध्ये छापल्यानंतर त्यांचं नाव सर्वदूर झालं. बिज्जींचं मात्र ‘अंग्रेझी’शी कधी जमलं नाही. आपलं सगळं कुटुंबच लिहिणारं, आजोबा आणि वडीलही कवी होते असं ते म्हणत. मुलीचं लग्नही पुढल्या पिढीतल्या राजस्थानी कवी, अनुवादक चंद्रप्रकाश देवल यांच्याशी झाल्यानं कुटुंबात तीन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते असल्याचा योग आला- जो राजस्थानी भाषेतच शक्य होता.
माझ्या स्कोलॅस्टिकच्या अवतारांत आम्ही मुलांसाठी अमेरिकन पुस्तकांबरोबर भारतीय पुस्तकं प्रसिद्ध करतो असं कानावर येताच बिज्जी कोणाबरोबर तरी आमच्या गुडगांवच्या कार्यालयात आले. आम्ही प्रकाशित केलेली काही पुस्तकं त्यांनी बसल्याजागी वाचून संपवली. त्यातली दोन-तीन चित्रपुस्तकं त्यांना खूपच आवडली. एक होतं विनीता कृष्णा लिखित ‘नीना की नानी’ : एका विस्मृतीच्या उंबरठ्यावर उभ्या आजी आणि नातीच्या नात्याची संवेदनशील गोष्ट आणि दुसरं मिनी सुकुमारन नायरचं ‘चिमनी दा ढाबा’. अनाथ झालेल्या भाऊ बहिणींनी एका महामार्गावरच्या ढाब्यात घेतलेला आश्रय आणि त्यातलं वाया जाणारं अन्न पक्ष्यांना घालून आसपास निर्माण केलेली पक्ष्यांची सुंदर बाग. बिज्जी बेहद्द खूश झाले.
मी अकादमी सोडून मुलांसाठी अशी पुस्तकं काढत असेन तर ते नेहमी माझ्या पाठीशी उभे असतील हे माझ्याच टेबलावरचा फोन उचलून तिथल्या तिथे दहा जणांना सांगितलं. एक फोन लेखिकेलाही केला. अचानक बिज्जींचा फोन तोही प्रशंसेचा! विनीताला आयुष्यभर ती आठवण पुरणारी होती. ते यावरच थांबले नाहीत, त्यांनी पुस्तकाच्या २० प्रती विकत घेऊन लोकांना वाटल्या आणि आमच्या कोणा साहाय्यकाला जवळच्या पोस्टात पाठवून ५० पोस्ट कार्डस् मागवली आणि नंतर ती लोकांना पुस्तकाबद्दल सांगण्यासाठी पाठवली. ही बिज्जींची पुस्तकवेडाची रीत! त्यांच्या मासलेवाईक, उतावळ्या स्वभावाचे किस्से-कहाण्या आहेत; त्यापैकी एक म्हणजे त्यांची मावशी म्हणायची हा इतका चळवळ्या की आईच्या पोटात तरी नऊ महिने एके ठिकाणी कसा राहिला हे आश्चर्य आहे.
लेखनाच्या बाबतीतही असंच, एकदा स्वत:च्या डेस्कवर लिहायला बसले की मनातलं कागदावर उतरवून टाकल्याशिवाय थांबायचं नाही. रात्रीचा कुठलाही प्रहर उलटो. त्यांच्या राजस्थानी सांस्कृतिक वारशाचे जतन करून ठेवण्यासाठी स्थापित केलेल्या ‘रूपायन संस्थान’च्या बैठकी /चर्चा कधी-कधी मध्यरात्रीपलीकडे चालत. एक वेळ बैठकीला पोहोचायला उशीर झाला तरी चालेल, पण ती संपल्याशिवाय हलायचं नाही हा दंडक.
एकदा मात्र फार विचित्र प्रसंग ओढवला होता. बिज्जी कुठल्याशा प्रसंगी ‘माध्यमांतून बदलणारी कथा’ यावर बोलणार होते. आम्ही त्या भाषणाला यावं असं आग्रहाने सुचवलं होतं. होता होता ते व्याख्यान इतकं लांबलं की तेव्हा वक्तशीर अरविंदचा त्यासाठी ठेवलेला वेळ आणि पेशन्स दोन्ही संपले. असं मधूनच उठून जाणं माझ्या स्वभावात मुळीच नव्हतं, पण आणखी एकाला कामासंबंधी भेटीसाठी वेळ दिली होती तिथे उशीर झाला असता. गुपचुप सटकावं आणि नंतर कारण सांगून बिज्जींची माफी मागावी, असं ठरवलं. पण मी निघतेय हे लक्षात येताच मंचावरून भाषण थांबवून ‘अरुंधती, रुक जा, रुक तो सही’ अशी बिज्जींची हाकाटी सुरू झाली.
शेवटी मला हात जोडून ‘मी येतेय परत’ असं भरल्या सभागृहात सांगून निघावं लागलं. नंतर त्यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आणि माफीही मागितली. मला त्यांनी माफ केलंय हे कळायला २००५ उजाडलं. ‘पहेली’ पाहून आल्यावर मी त्यांना एक छानसं पत्रं लिहिलं आणि ते खूश झाले. त्यांच्या पुढल्या फिल्मबद्दल सांगू लागले. आम्हाला आग्रहाने जोधपूरला ‘रूपायन’चं काम बघायला आमंत्रण दिलं आणि दिल्लीत आलो की तुमची नवी पुस्तकं बघायला येतो म्हणाले.
आयुष्याच्या पुढल्या अध्यायात कॉर्पोरेट आयुष्य सोडून हिमालयाच्या सान्निध्यात उत्तराखंडच्या शीतला या खेड्यात आम्ही आमचा ‘गिव्ह बॅक टाइम’ (समाजाचं ऋण फेडण्याचा काल) ठरवला होता. तिथे मुलांसाठी वाचनालय आणि मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं हे बिज्जीना छायाचित्रं पाठवून कळवलं. ते पाहून त्यांना अगदी ताबडतोब तिकडे यावंसं वाटलं. ‘‘मला आता प्रवासात सोबत लागते, आम्हाला तीन-चार दिवस ठेवून घेशील का? रोज मुलांना एक गोष्ट सांगेन.’’ लवकरच तारीख कळवणार होते, पण त्यांची प्रकृती पाहून घरच्यांनी थांबवलं असावं. एरवी ते कुणी थांबवलं म्हणून थांबण्यातले नव्हते. आले असते तर गावात उत्साह संचारला असता. आमच्या पोरांना राजस्थानी संस्कृतीची चालती बोलती, नाट्यपूर्ण झलक अनुभवायला मिळाली असती. आले असते तर एकदा येऊन थांबले नसते, हेही मला पक्कं माहीत आहे.
