समीर गायकवाड

गावाकडून येणाऱ्या एसटी बसच्या खिडकीला दुधाचे कॅन, जेवणाचे डबे लावलेले असत. दुधाचे वाटप करताना गावातल्या पोरांना डबे पोहोच करण्याचे काम होई. शहरातल्या खाणावळीतलं अन्न गोड लागत नसायचं अशातली गोष्ट नव्हती; मात्र त्यात मायेचा तो ओलावा नसायचा- जो गावाकडून येणाऱ्या डब्यात असायचा. पहाटे उठून आईने करून दिलेल्या भाकऱ्या दुपारी फडकं सोडेपर्यंत वाळून खडंग झालेल्या असत, पण त्या भाकऱ्यांना तिचा मुलायम हात लागल्याच्या मखमली जाणिवेपुढे ते काहीच नव्हतं. त्या भाकरीचा घास अमृतानुभवी व्हायचा. जठराग्नी तृप्त व्हायचा. जेवण आटोपताना बोटे चाखून झाल्यावर फडकं झटकून पुन्हा डब्यात ठेवून दिलं जायचं तेव्हा दंड घातलेली आईची साडी नजरेसमोर तरळून जायची. डबा धुताना तिचा सुरकुतलेला हात आपल्या हातावरून फिरत असल्याचा भास व्हायचा. धुऊन स्वच्छ केलेला रिकामा डबा दिवस मावळण्याआधी एसटी स्टॅन्डवर पोहोच केला जायचा. रोजच्या जीवनातली अनेक कामे कंटाळवाणी वाटत, पण त्या डब्याची ओढ कधी कमी झाली नाही.. ते कधी काम वाटलं नाही. कारण त्या डब्यासोबत आईचा स्पर्श यायचा. गावाकडच्या मातीचा गंध यायचा. डबा घेऊन येणाऱ्या निरोप्यासोबत तिथल्या माणसांचा दरवळ यायचा. त्या अन्नात तिथल्या कंच अंकुरांचा अंश यायचा. गावकुसाच्या खुशालीचा नि:शब्द सांगावा कानी पडायचा! या डब्याची ओढ केवळ अन्नासाठी कधीच नसायची. ही ओढ असण्याचं मुख्य कारण म्हणजे गावाची ओढ.. आपल्या माणसांची आणि मातीची ओढ! जी माणसं गावाकडच्या मातीत केवळ काही दिवस, काही महिने जगतात त्यांना ही ओढ केवळ बेचन करते असे नव्हे, तर ती जगण्याच्या लढाईत सतत साथसोबतदेखील करते. वेळप्रसंगी हिंमत देते. बदलत्या जीवनशैलीत आणि भौतिक सुखांच्या परिघात आक्रसत चाललेल्या जीवनात या ओढीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘गवाक्ष’ने अनेकांची ही ओढ अधिक तीव्र केली.. टोकदार केली. आज या जाणिवेचा समारोप करताना भारावून गेलोय.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

आजचा लेख हा निरोपाचा लेख! वर्षभर या सदरातून ‘गवाक्ष’च्या नावाखाली आपल्या सगळ्यांचं गाव आपल्यासमोर येत राहिलं. या गावाला ‘लोकसत्ता’च्या विविध स्तरांतील वाचकांनी भरभरून प्रेम दिलं. साता समुद्रापार गेलेल्या माणसांनीदेखील दाद दिली. कोकणच्या लाल मातीतल्या झावळ्यांनी शाकारलेल्या झोपडीतूनही मायेचे हात पुढे आले. कौलारू घरांतून प्रेमाचा वर्षांव झाला. मराठवाडय़ातील वाचकांनी विशेष प्रेम दिलं. कारण इथली माणसं सर्वाधिक विस्थापित झालेली. या लोकांनी आपल्या डोळ्यासमोर आपली गावं आकसत जाताना पाहिली आणि पोटाची भ्रांत मिटवण्यासाठी गावकूस सोडून विविध शहरांची वाट धरली. अशा कित्येक लोकांसाठी ‘गवाक्ष’ ही अंतरंगातली आर्त आठवण ठरली. विदर्भातून आलेल्या प्रतिक्रिया अचंबित करणाऱ्या होत्या. राज्य तोडून हवंय असं काही राजकारणी आणि त्यांचे समर्थक म्हणत असतील, पण मला तर तिथल्या वाचकांच्या काळजातही तोच गाव दिसला; जो सह्यद्रीच्या कुशीतल्या माणसांच्या डोळ्यांत वसला होता. खान्देशी, माणदेशी वाचकांनी त्यांच्या ग्रामीण साधनसामग्रीचा ऱ्हास अस होत असल्याचं सांगितलं तेव्हा गावकुसाची ही ओढ सर्वत्र समांतर असल्याचं अधोरेखित झालं. गडचिरोलीतूनदेखील अभिप्राय कळवताना एका वाचकाने लिहिलं की, ‘गवाक्ष’ने मला माझी माणसं परत मिळवून दिली. त्यांच्या काळजातला वणवा थंड करण्याचं काम यातून झालं! कित्येकांनी पाणावल्या डोळ्यांनी आपल्या मनातलं आभाळ रितं केलं. प्रत्येक लेखाची वाट पाहणाऱ्या अनेक वाचकांनी न चुकता आपले अभिप्राय कळवले. काहींनी तर रविवार येण्याआधीच पुढच्या लेखाविषयी औत्सुक्यपूर्ण गप्पा मारल्या. यात कुणाला आपलं गाव दिसलं, आपली माणसं दिसली. काहींच्या विस्मृतीच्या कुपीत बंदिस्त झालेल्या कडू-गोड आठवणी पुनरुज्जीवित झाल्या. ज्यांना विसरावं वाटत होतं अशा काही कडवट नात्यांच्या तुरट स्मृतींनी काहींचा कंठ दाटून आला. काळाच्या पडद्याआड गेलेल्या आपल्या आप्तेष्टांची अनेकांना आठवण झाली. डोळ्यांची दृष्टी कमी झाल्याने वाचायला, लिहायला अडथळे येऊ लागल्याने काही पिकल्या पानांनी त्यांच्या घरातल्या कोवळ्या कोंबांना हाताशी धरून ऑडिओ मेसेज पाठवले तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले! वाचकांचे हे प्रेम माझ्यासाठी न संपणारी शिदोरी बनून सोबत राहील. याहीपलीकडे जाऊन ज्यांनी उभ्या आयुष्यात गावजीवन अनुभवलं नव्हतं अशा वाचकांनीही भरघोस प्रतिसाद दिला- जो खूप सुखावून गेला.

मुळात ‘गवाक्ष’ हे केवळ गावजीवन जगलेल्या लोकांसाठी लिहिलं नव्हतंच. कित्येक शतकांपूर्वी नगरे स्थापन होण्याआधी आपण सगळेजण गावजीवनाचे साक्षीदार होतो. काळाच्या ओघात अनेकांनी गावांची साथ सोडली, तर काही गावांचे नगरात रूपांतर झाले. काही नगरांचे महानगर झाले. असं असलं तरी इथली सर्व माणसं याच भूमीतली नव्हती. त्यांची पाळंमुळं शोधत गेलं तर ती कुठल्या तरी वेशीपाशी जाऊन पोहोचतात. मग ही कथित शहरी माणसं आपल्या दिवाणखान्यात गप्पांचा फड रंगला की अभिमानाने सांगतात, ‘‘आमची कुठली शेतीवाडी बाबा? आम्ही शहरी मंडळी! मात्र, कधीकाळी आमच्या बापजाद्यांचा अमक्या गावात इतका जमीनजुमला होता. वाडे होते. चाकर होते. वावरात विहिरी होत्या. विहिरींवर मोटा होत्या. मोट हाकणारी सर्जा-राजाची जोडी होती. धान्याची कणगी होती. गायी-म्हशींनी भरलेले गोठे होते. बक्कळ दूधदुभतं होतं. काळ्या आईच्या कुशीतून सोनं पिकत होतं. जुंधळ्यात लगडलेलं चांदणं आजी-पणजीच्या डोळ्यांतून तुळसी वृंदावनातल्या दिव्याच्या ज्योतीत उतरायचं आणि तिथून ते आभाळात जायचं!’’ असं काही सांगताना त्या पोक्त चेहऱ्यावर अद्भुत समाधान विलसतं. जोडीनेच नकळत भरून आलेले डोळे पुसण्यासाठी चष्म्याच्या काचा साफ करण्याचा बहाणा कामाला येतो. या अशा सगळ्या गाववेडय़ा माणसांना ‘गवाक्ष’मधलं गाव हवंहवंसं वाटणं साहजिकच होतं. माणूस शहरातला असो वा महानगरातला; कुणी कितीही नाकारलं वा नाकं मुरडली तरी आपल्या प्रत्येकाच्या मनात गावजीवनाबद्दलची एक आस्था, अनामिक ओढ ही असतेच. अंतर्मनातल्या या विझलेल्या ज्योतींना पुन्हा सचेत करता येतं, याचा प्रत्यय ‘गवाक्ष’मुळे आला. याच अनुषंगाने अनेकांनी विचारलं की, ही सगळी माणसं, या घटना खऱ्या की कल्पित?

‘गवाक्ष’मधल्या गोष्टीतली माणसं वेगवेगळ्या ठिकाणी मला भेटत गेली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे माझं गाव. या गावाच्या पंचक्रोशीतली माणसं, त्यांच्याकडून ऐकलेल्या काही गावगोष्टी, वेगवेगळ्या प्रवासांत विविध टप्प्यांवर घडलेल्या काही घटना हे सगळं मनाच्या कप्प्यात साठत राहिलं होतं. शेतशिवारात सोसाटय़ाचं वारं येतं, झाडांना गदागदा हलवून जातं. झाडे पडत नाहीत, पण हिरवी-पिवळी पानेही पिकल्या पानासोबत पडून जातात. त्या पानांचं खत होतं. झाडांच्या मुळाशी जातं आणि झाडाच्या शेंडय़ाला नव्या पानाच्या रूपाने पुन्हा दिमाखात फडफडू लागतं. तसंच ‘गवाक्ष’मधल्या माणसांचं आहे, यातल्या घटनांचं आहे. काळाच्या माऱ्याने हे सगळं वाहून गेलं, पण आठवणींच्या, गप्पाष्टकांच्या रूपाने ते पुन: पुन्हा तजेलदार होत राहिलं. ही प्रक्रिया हरेक गावकुसात घडलेली आहे. त्यामुळे ‘गवाक्ष’मधली माणसं, घटना, स्थळं.. सगळं परिचयाचं वाटतं. ‘खपली’मधली शांताबाई, ‘गुलमोहर’मधले कामिनी आणि दत्तू, ‘नाळ’मधले नारायणकाका,‘फेरा’मधली गंगूबाई, ‘वर्तुळ’मधले अंबादास गवळी, अंधारमधला वसूनाना, ‘हक्क’मधल्या सिंधू- सुगंधा, ‘ऋण’मधले मारुतीबाप्पा घुले, ‘ओलावा’मधले दौलत भोसले, ‘पश्चात्ताप’मधील गोदूबाई, ‘गहिवर’मधील लक्ष्मणआबा, ‘भास’मधली सरूबाई, ‘धग’मधला सायबू राठोड ही सगळी माणसं हाडामांसाची वाटतात. यांच्याशिवाय अक्काबाई, अन्याबा, भाऊसाहेब, गोकुळनाथ, ज्ञानू सुतार, सर्जा, मालनबाई, दत्तू पाणक्या, मकबूलचाचा, नाग्याचा सुदामा, तान्हीबाई, धडे मास्तर, जगन्नाथ वाणी, इरण्णा, कलावती, गुलाबबाई, भानातात्या ही सगळी मंडळी आणि त्यांच्या जीवनाचा परीघ आपल्याला जगण्याची नवी व्याख्या देतो. ही माणसं भोळीभाबडी होती. यांनी फारसा नावलौकिक मिळवला नाही की संपत्ती कमावली नाही. मात्र, आयुष्य भरभरून जगताना त्यांनी त्याचा अर्थ जाणून घेतला. ‘गवाक्ष’मधून हा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचता करायचा होता.

‘गवाक्ष’ म्हणजे खिडकी. या गवाक्षातून कुणीही बाहेर डोकावून पाहिलं तर या लिखाणातली कोणतीही माणसं, स्थळं कुठंच दिसणार नाहीत; कारण ती नामशेष व्हायच्या बेतात आलीत. मात्र, कुठेही राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने यातून आत डोकावलं तर एक अख्खं गाव दिसेल. गजबजलेल्या वेशी, पोराबाळांनी भरलेल्या गल्ल्या, म्हाताऱ्याकोताऱ्यांनी व्यापलेली देवळं, गप्पांत बुडालेला पार, आशाळभूत चावडी दिसेल. साधीसुधी माणसं दिसतील. त्यांच्या जुन्या परंपरा, त्यांचे हेवेदावे, रुसवेफुगवे दिसतील. हिरवीगार शेते दिसतील. भिरभिरणारी पाखरं दिसतील. घराघरातले सुरकुतलेले चेहरे दिसतील. भेगाळलेले हात दिसतील. कष्टाने व्यापलेलं गावजीवन दिसेल. आणि तरीही त्या लोकांच्या डोळ्यांत चमक दिसेल. यामुळेच ‘गवाक्ष’ला एक करुण, दु:खद झालर लाभलीय. मात्र हे केवळ आठवणींचे रुदन नाही, हे केवळ लोप पावलेल्या गावजीवनाचे ललित वर्णन नाही. ही एक गावसंस्कृती आहे; जी आपल्या गतपिढीने अनुभवली आहे. त्या गावसंस्कृतीचं अक्षरलेणं पुढच्या पिढीस कळायला हवं, त्याशिवाय नव्या पिढीला आपल्या गतपिढीने सोसलेल्या घावांची वेदना कळणार नाही. आजचं जीवन जरी भौतिक सुखांनी काठोकाठ भरलेलं असलं तरी गावसंस्कृतीच्या दरवळाने नव्या पिढीला खुणावलं पाहिजे यासाठी ‘गवाक्ष’ लिहिलं आणि नव्या पिढीने दिलेली दाद पाहून ही धडपड सार्थ ठरली. या सफरीमध्ये मला साथसोबत देणाऱ्या सर्व वाचकांचा ऋणी राहीन. ‘गवाक्ष’मधलं गावसंस्कृतीचं अक्षरलेणं तुमच्या हाती सोपवून भरल्या डोळ्यांनी आणि तृप्त मनाने तुम्हा सर्वाची रजा घेतो.

(समाप्त)

sameerbapu@gmail.com