महाराष्ट्रातील तथाकथित साक्षर आणि सुज्ञ वाचकांना नेहमीच ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबर्या खूप आवडतात हा आजवरचा ज्ञात इतिहास. असं म्हणतात की, मराठी माणूस इतिहासात खूप रमतो आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल त्याला अतीव श्रद्धा असते. बहुतांश लोकांना आणि मराठी वाचकांना खोट्या खोट्या इतिहासात रमायला आवडतं, त्यांना बखरीसुद्धा इतिहास वाटायला लागतात, त्यावरून रचलेल्या खर्या इतिहास नायकावरील लेखकाच्या कल्पनेतील कादंबर्या इतिहास वाटू लागतात आणि मग फावते ते वाचकांनी मोठ्या केलेल्या ‘अ’विश्वाशी लेखकांचे!
‘संभाजी’ कादंबरीच्या प्रचारार्थ जेव्हा लेखक फिरत होते तेव्हा ते म्हणत होते की, ‘‘खरा संभाजी फक्त मला कळलेला आहे!’’ तेव्हा महाराष्ट्रातील एकाही वाचकाला, पत्रकारांना त्यांना हा प्रश्न विचारावासा वाटला नाही की, ‘‘जर तुम्हाला खरा संभाजी कळला असेल, तर मग तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांवर कादंबरी लिहिण्याऐवजी त्यांचा तटस्थ इतिहास का लिहिला नाही?’’ इतिहास किंवा चरित्र लिहायचे असेल तर त्यात संदर्भ द्यावे लागतात, तटस्थता सांभाळावी लागते, नवे संदर्भ सापडले तर इतिहासात बदल करण्याचा मोठेपणा दाखवावा लागतो. तिथे कल्पनेच्या वावड्या उडवायची संधी नसते.
छत्रपती संभाजी महाराजांवर ‘ऐतिहासिक’ कादंबरी लिहिल्याची शेखी मिळवणारा वाचकप्रिय लेखक जेव्हा स्वत: होऊन आयोगासमोर ‘‘‘संभाजी’ ही कादंबरी भूभाग आणि काही तथ्य यावर आधारित कल्पनाविलास आहे.’’ अशी कबुली देतो, तेव्हा तो लेखक आपल्या लेखनातून सामाजिक तेढ वाढविण्याचे कामही करीत होता, याचीही कबुली देत असतो! इतकं होऊनही महाराष्ट्रातील वाचक यातून काही धडा घेतीलच याची शाश्वती नाही! – शाहू पाटोळे, खामगाव, धाराशिव
इतिहासातून चांगले तेच घ्या
या लेखात लेखकाने अनेक संदर्भ देत सप्रमाण निर्हेतुक आणि पोटतिडकीने मांडलेले मुद्दे पटणारेच आहेत. आणि तशी कबुली दस्तुरखुद्द विश्वास पाटील यांनी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर दिली आहे. ‘संभाजी’ या त्यांच्या कादंबरीतील काही भाग कल्पनाविलास असल्याचे त्यांनी स्वत:हून मान्य केले आहे. विश्वास पाटील हे माझे एक आवडते लेखक आहेत. लेखकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असते, हे खरे. लेखक आपली कलाकृती सर्वांगसुंदर आणि अधिकाधिक वाचनीय व्हावी यासाठी त्यात जणू आपले प्राण ओतत असतो, हेही खरे. पण जेव्हा तो इतिहासावर भाष्य करतो किंवा एखाद्या महापुरुषाचे चरित्र लिहितो, तेव्हा ते लिहिताना काही गोष्टींचे भान राखावे लागते आणि मर्यादा पाळाव्या लागतात. कारण तिथे लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो. इतिहासातून चांगले तेवढेच घ्या आणि जे घेतले ते आपल्या भरकटलेल्या नौकेला दीपस्तंभासारखे दिशादर्शक राहील असेच घ्या अशी माझी सर्व विचारवंतांना विनंती. – डॉ. संजय जानवळे, बीड
वाचक संभ्रमित
मी विश्वास पाटील यांची ‘संभाजी’ कादंबरी अद्याप वाचलेली नाही; मात्र छावा वाचली आहे. छावा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर विश्वास पाटील यांची एक मुलाखत ऐकली होती. त्यामुळे छावा चित्रपट आणि संभाजी कादंबरी वाचण्याची इच्छा निर्माण झाली होती; पण आजतागायत ते दोन्हीही राहून गेले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड झाल्याचे पाहून आनंद झाला. परंतु काही दिवसांतच त्यांच्या ‘संभाजी’ कादंबरीबाबत ‘काल्पनिक’ असल्यासंदर्भातील न्यायालयीन साक्ष वाचली आणि तेव्हापासून इतिहास वाचनाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमके काय वाचावे? कोणावर विश्वास ठेवावा? आणि इतिहासाचा अभ्यास कसा करावा? या लेखात लेखकाने या लेखातून त्या कादंबरीचे सखोल विश्लेषण करून अनेक त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे सामान्य इतिहासप्रेमी वाचक म्हणून गोंधळ अधिकच वाढतो. शैक्षणिक पातळीवरही इतिहास विषयाकडे तुलनेने दुर्लक्ष होत असल्याची भावना आहे. ठोस पुराव्यांवर आधारित, निकषबद्ध लेखन कमी भासते. पाश्चात्त्य लेखनशैली वास्तववादी असते. त्या तुलनेत आपल्या ‘मसालेदार’ पद्धतीमुळे प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यामुळे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांच्यातील समज काही प्रमाणात ढासळते असे वाटते. अशा परिस्थितीत ‘पानिपत’सारखी कादंबरी कितपत वास्तव मानायची, हा प्रश्नही पडतो. कारण सर्वसामान्य वाचक अशा साहित्याच्या आधारे त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन, मानवी स्वभाव, युद्धनीती इत्यादींची कल्पना करून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु जर त्या पायाचाच विश्वास डळमळीत झाला, तर वाचक पूर्णपणे संभ्रमित होतो. – राजा जंगम
वाचकांच्या डोळ्यात अंजन
सदर लेख प्रदीर्घ असला तरी मुद्देसूद मांडणीमुळे वाचनीय झाला आहे. हा लेख वाचकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार यात शंका नाही. -दत्ता म्हसकर, वाकड, पुणे</strong>
अशा लिखाणाबाबत खेद
छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक इतिहासकारांनी लेखन केले आहे. त्यात काही लेखकांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा विडाच उचललेला दिसतो. अशा परिस्थितीत इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या लेखकांनी त्यांच्याबद्दल ज्या काही बदनामकारक काल्पनिक गोष्टी होत्या, त्या पूर्ण नाकारलेल्या आहेत. तरीही ‘संभाजी’ कादंबरी लिहिणारे विश्वास पाटील यांचा स्वत:चा विश्वास इतका डळमळीत निघावा की त्यांनी पुन्हा इतरांप्रमाणे संभाजींबद्दल संभ्रम निर्माण करणारे लेखन करावे? यामागे काही षड्यंत्र तर नाही ना? लोक चर्चा करत आहेत की, विश्वास पाटील यांना अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करताना असे विकृत लेखन करण्याची अट घातली असेल का? विश्वास पाटील यांनी स्वत:च्या लेखनाला प्रसिद्धी मिळावी, कादंबरीचा खप वाढावा, म्हणून तर असे अविश्वासू लेखन केले नसेल ना? अशी शंका सुरेश पाटील यांनी जे कादंबरीतले चुकीचे संदर्भ नजरेसमोर आणले, त्यावरून वाटते. विश्वास पाटील यांनी असे का करावे, याचा खेद वाटतो. – प्रा. बी. ए. पाटील, धुळे</strong>
लेखक महाशयांनी माफी मागावी
लेख वाचून खरोखरच अत्यंत शरम वाटली की विश्वास पाटील, ज्यांना आम्ही लहानपणापासून अतिशय थोर लेखक मानत होतो आणि त्यांच्या अनेक कादंबर्या वाचल्या होत्या, त्यांनी छत्रपतींबद्दल असे कसे लिहिले? त्यांच्या कादंबर्यांमुळे मराठीशाही इतिहासाबद्दलचा मोठा आदर निर्माण झाला होता. अशा लेखकाची लेखणी आता का घसरावी? कादंबरी खपावी म्हणून?
‘संभाजी’ कादंबरीत अत्यंत चुकीचे, प्रतिमा मलिन करणारे आणि अतिशय हीन प्रकारे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे जे संदर्भ लिहिले आहेेत ते अक्षम्य आहेत. आणि अशा या लेखकाला मानाच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करण्याची घोडचूक आपण मराठी माणसांनी कशी काय केली? या लेखक महाशयांनी सार्वजनिकपणे सर्व मराठी बांधवांची आणि महाराजांची ताबडतोब माफी मागावी. – यशश्री मोरे
सप्रमाण मुद्देसूद मांडणी
इतिहासाचे असे आणि इतक्या खालच्या पातळीवर विकृतीकरण करणारी व्यक्ती साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकते, ही शोकांतिकाच म्हणायला हवी. लेखकाने अगदी प्रत्येक मुद्दा साधार खोडून काढला आहे. – केतन जाधव, सातारा
विश्वास पाटील पायउतार होतील का?
लेख छान, मुद्देसूद, विस्तृत लिहिलेला आहे. आता विश्वास पाटील काय करतील? खेद व्यक्त करतील? दिलगिरी व्यक्त करतील? ही कादंबरी प्रकाशित होऊन साधारण १५ वर्षे तरी झाली असतील. एवढ्या वर्षांत हजारो जणांनी ही कादंबरी वाचली असणार. एकाही गृहस्थाला याबद्दल आक्षेप घ्यावा असे आढळले नसेल? की सर्वांचे वाचन एवढे कृत्रिम झाले? इतर वेळी संभाजी ब्रिगेड, छावा किंवा तत्सम संघटना बर्यापैकी आक्रमक असतात. त्यांनादेखील त्यांची आक्रमकता जागवण्यासाठी दुसर्या कोणी तरी परीक्षण लिहून प्रॉ्प्टिटंग करावे लागते का? की अशाच प्रकारची विधाने जर कोणी गोर्या व्यक्तीने केली असती तर धिंगाणा घातला असता? याचाच अर्थ असा की, ज्या संघटनांची नावे मी आत्ताच घेतली त्यांचे हे संभाजी राजांबद्दलचे प्रेम बेगडीच असणार, नाही तर त्यांच्यापैकी कोणी तरी कादंबरी वाचण्याचे कष्ट घेतले असते. जेवढी कादंबरी सनसनाटी किंवा आक्षेपार्ह गोष्टींनी भरलेली तेवढा तिचा खप जास्त. आणि तेवढी रॉयल्टी अधिक हे ओघाने आलेच… विश्वास पाटलांनी काही चांगला पायंडा पाडलेला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर असे आरोप होणे हे काही चांगले लक्षण नव्हे. जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदावरून ते पायउतार होतील काय? – मोरेश्वर शंकर गुणाजी, मुंबई
ऐतिहासिकतेचा शिक्का मारण्यापूर्वी विचार व्हावा
हा लेख वाचला आणि सेतू माधवराव पगडी यांच्या ‘इतिहास आणि कल्पित’ या पुस्तकाची आठवण झाली. आता ते पुस्तक उपलब्ध नाही. सदर पुस्तक ऐतिहासिक व्यक्तींबाबत असणार्या समज, गैरसमजांसंबंधी भाष्य करते.
एखादा चित्रपट, कादंबरी, नाटक वास्तव वाटावे म्हणून लेखक काही नाट्यपूर्ण प्रसंगांची पेरणी करतो. मध्यंतरी, निवडणूक काळात काल्पनिक फाइल्स दाखवून तेच वास्तव असल्याचे मोठमोठे नेते सांगत होते. जाहिराती व माध्यमांच्या मदतीने चित्रपटातील प्रसंग खरे असल्याचा आभास निर्माण झाला. आजही फाइलीत मजकूर खरा असल्याचे मानणारा एक वर्ग समाजात दिसतो. पुढे, प्रकरण न्यायालयात गेल्यावर त्यामागचे पितळ उघडे पडले आणि मग निर्मात्यांना डिस्क्लेमर जोडावा लागला होता. आणखी काही वर्षांनी, कदाचित दशकांनी या कादंबरीचा ‘एक ऐतिहासिक दस्तऐवज’ म्हणून दाखला दिल्यास वेगळाच इतिहास सत्य म्हणून मानला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐतिहासिक लिखाणातील प्रसंग काल्पनिक असल्यास कादंबरीवर ऐतिहासिकतेचा शिक्का मारण्यापूर्वीच त्याबाबत विचार व्हावा. – शैलेश न. पुरोहित, मुलुंड, मुंबई
लेखकाचा तीव्र निषेध
‘संभाजी’ ही कादंबरी जरी ललित साहित्यात मोडत असली, लेखकाला कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य असले; तरी कादंबरी ऐतिहासिक महापुरुषाच्या जीवनावर आधारित असेल त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन होईल असे प्रसंग कल्पनाविलास म्हणून रंगविणे निषेधार्हच आहे. विश्वास पाटील यांच्यासारख्या लेखकाकडून ही अपेक्षा नव्हती. छ. संभाजीमहाराज हे स्वधर्माभिमानी होते आणि त्यांनी स्वधर्मासाठी अत्यंत कष्टदायक मृत्यूचे हसत हसत स्वागत केले होते हा त्यांचा खरा इतिहास आहे. अशा महापुरुषाच्या जीवनात हंसा आणि कमळा प्रकरण घुसडवून त्यांचे चारित्र्यहनन करणे गर्हणीयच म्हणावे लागेल. ललित साहित्याचे अनुवाद इतर भाषांमध्ये, अगदी पाश्चात्त्य भाषांतही होत असते. त्यामुळे असे त्यांच्या जीवनात न घडलेले प्रसंग लालित्य निर्माण करण्यासाठी घुसडणे अयोग्यच आहे. कारण ज्या लोकांना खरा इतिहास माहीत नसतो, अशा लोकांच्या वाचनात असे साहित्य आले तर त्या महापुरुषाचेच चारित्र्यहनन नाही, तर शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या इतिहासालाही काळिमा लागण्यास वेळ लागणार नाही. अशा लेखकाचा तीव्र निषेध करणे गरजेचे आहे. – रमेश नारायण वेदक, पाली, सुधागड, जि. रायगड
