पराग कुलकर्णी

तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का? की एखादं काम करताना आपण त्यातच हरवून जातो. वेळेचं, तहानभुकेचं, आजूबाजूच्या गोष्टींचं, इतकंच कशाला, स्वत:ला पण कुठलंच भान राहत नाही. हाती घेतलेल्या कामावर पूर्ण लक्ष एकाग्र झालेलं असतं, नवीन कल्पना, नवीन उत्तरं सापडतात, काम वेगानं आणि मुख्य म्हणजे चांगलं होतं आणि त्यातून एक आनंद आणि समाधान लाभतं. अर्थात आपली ही अवस्था खूप वेळ टिकत नाही आणि आपण लवकरच त्यातून बाहेर पडतो. मनाची ही अवस्था हुकमी असावी असे आपल्याला वाटते. पण दुर्दैवाने त्यावर आपले नियंत्रण नाही असेच आपल्याला वाटते. अनेक मोठे खेळाडू, कलाकार पण खेळताना, त्यांची कला सादर करताना स्वत:ला विसरायला लावणाऱ्या अशाच अलौकिक अनुभवाबद्दल बोलतात. हे नेमके काय असते.

खरं तर ही काही नव्याने शोध लागलेली संकल्पना निश्चितच नाही. पण अनेक आध्यात्मिक आणि मानसिक संकल्पनेप्रमाणे पूर्वेकडच्या जुन्या संस्कृती, धर्मामध्ये उगम पावलेली आणि आता पश्चिमेत नावारूपास आलेली ही संकल्पना म्हणजे फ्लो (Flow)! दुसऱ्या महायुद्धात युरोपमध्ये अनेक देशांचे खूप नुकसान झाले. केवळ राजकीय आणि आर्थिक व्यवस्थाच मोडकळीला आली नाही; तर अनेक माणसांची मनेही मोडून पडली. या अशा आजूबाजूच्या उमेद हरवलेल्या, निराश वातावरणात आणि घर, संसार, समाज उद्ध्वस्त झालेली आजूबाजूची माणसे बघून मिहाई चिक्सेंतमिहाई  (Mihaly Csikszentmihalyi) यांना प्रश्न पडला की खरंच जगण्यासाठी कशाची आवश्यकता असते? काय गोष्टी असतात, ज्या जगण्याला जगण्यालायक बनवतात? माणसाचं सुख, आनंद नेमका कशात असतो आणि ते कसं मिळवायचं? पसा हे उत्तर नाही, हे त्यांना लवकरच कळले आणि मग कला, अध्यात्म, धर्म, मानसशास्त्र अशा वेगवेगळ्या अंगांनी ते उत्तर शोधू लागले. पुढे मानसशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास चालूच ठेवला. अनेक कलाकार, खेळाडू, व्यावसायिक यांच्या मुलाखतीतून त्यांच्या कामातून मिळणाऱ्या आनंदाबद्दल जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यांनीच वेगवेगळ्या शब्दात पण त्यांच्या आवडीच्या कामात एकाग्र झाल्यानंतर येणारा विलक्षण आनंद आणि समाधान देणाऱ्या अनुभवाबद्दल सांगितले. मिहाईला अभ्यासातून एक गोष्ट लक्षात आली की अशाच आनंद देणाऱ्या मनाच्या अवस्थेबद्दल हजारो वर्षे जुन्या असलेल्या अनेक संस्कृतींमध्येही भाष्य केले आहे. मुलाखतीदरम्यान एका संगीतकाराने या अवस्थेचे वर्णन करताना ‘त्या अवस्थेत मी संगीत निर्माण करत नाही तर ते सहजपणे माझ्यातून वाहते, प्रवाही होते.’ असा शब्दप्रयोग केला. यावरूनच मनाच्या या अवस्थेला मिहाई यांनी फ्लो असे नाव दिले.

‘फ्लो’ म्हणजे मनाची खूप एकाग्र अशी अवस्था. ‘इनअटेंशनल ब्लाइंडनेस’मध्ये आपण बघितले की मेंदूला खूप सारे संदेश येत असतात, पण तो काही ठरावीक संदेशच स्वीकारू शकतो. फ्लोमध्ये आपली एकाग्रता इतकी जास्त असते की इतर कोणताच विचार आपल्या मनात येऊ शकत नाही. हाती असलेल्या कामासंबंधीची माहिती, ज्ञान, विचार, भावना, शारीरिक हालचाली आणि मिळवलेले कौशल्य सगळ्या एकत्रित योग्यरीत्या येऊन आपली कार्यक्षमता प्रचंड प्रमाणात वाढवतात. एखादा खेळाडू जेव्हा खेळताना मनाच्या या अवस्थेत जातो, तेव्हा त्याचा सर्वोत्तम खेळ होण्याची शक्यता खूप मोठय़ा प्रमाणात वाढते – विचार, भावना, शारीरिक हालचाली आणि अशा अनेक गोष्टी अगदी सहजपणे हाताळल्या जातात. यालाच अनेकदा ‘झोन’मधे असणे असेदेखील म्हणतात. ज्यात आपल्याही नकळत योग्य गोष्टी आपल्याकडून घडतात. पण हे होतं कसं? अर्थात एकाग्रता हा यातील खूप मोठा घटक आहे. पण त्याचबरोबर इतर काही गोष्टीही जसे की ते आवडीचं काम असणे, नक्की त्यात काय करायचं आहे याची स्पष्टता असणे, ते काम करू शकू याचा आत्मविश्वास असणे इत्यादी गोष्टी आपल्याला या मनोवस्थेत घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात.

यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे- आपले त्या कामातील कौशल्य आणि त्या कामाने आपल्यासमोर उभे केलेले आव्हान यांचे प्रमाण. जर आपले कौशल्य कमी असेल आणि कामातील आव्हान मोठे- तर आपण ते काम करू शकणार नाही आणि बऱ्याच वेळेला निराश होऊन ते काम करणे सोडून देण्याची शक्यता असते. जर कौशल्य जास्त असेल आणि काम त्यामाने खूपच सोपे असेल तर त्या कामात कंटाळा निर्माण होतो आणि मन अजूनच भरकटते. पण जेव्हा कौशल्य आणि त्याला साजेसे आव्हान असेल- खरं तर कौशल्यापेक्षा थोडं मोठंच- तेव्हाच समतोल साधला जातो आणि समोरच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपले मन फ्लो अवस्थेत जाण्याची शक्यता वाढते. थोडक्यात काय, तर लक्ष एकाग्र करून मेंदूला त्याच्या क्षमतांपेक्षा थोडे जास्त पण आवाक्यातले काम दिले की मेंदू पूर्णपणे त्यात गुंतला जातो, आपली कार्यक्षमता वाढते आणि ते काम करण्यातला आनंद, समाधान आपल्याला अनुभवता येतो. यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही मनाची आणि शरीराची निष्क्रिय अवस्था नसून अतिसक्रिय, एकाग्र आणि कार्यक्षम अशी अवस्था आहे, त्यामुळे ती काम करण्यातूनच येते.

आपण एखाद्या विषयाची माहिती मिळवतो, ज्ञान प्राप्त करतो, त्याला आवश्यक असणारे कौशल्य मिळवण्यासाठी खूप सरावही करतो, पण शेवटी काम करताना या साऱ्या गोष्टी सहजपणे आपल्यातून व्यक्त होणे, प्रवाही होणे गरजेचे असते. पण या प्रवाहाला रोखणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपली एकाग्रता. आपण किती वेळेस एका कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. आज मल्टी-टास्किंग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. जेवताना टीव्ही बघणे, काम करताना नवीन आलेले ईमेल्स किंवा समाजमाध्यमांवरचे अपडेट्स बघणे, कोणाशी बोलताना मोबाइल बघणे, अभ्यास करताना गाणे ऐकणे अशी आपण अनेक कामे एकाच वेळी करायचा प्रयत्न करतो. असे लक्ष विचलित करणाऱ्या आणि अनावश्यक कामात मन गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टी जर आपण दूर ठेवू शकलो आणि हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकलो तर आपल्या पण मनातील कार्यक्षमतेचा आणि आनंदाचा हा प्रवाह मोकळा होऊन वाहू लागेल.

parag2211@gmail.com