डॉ. अनुश्री वर्तक
करोनाचा कहर २०२२ च्या दरम्यान संपला, असं आपण म्हणतो. त्यानंतर काय झाले? मृतांचे आकडे उतरले, मास्क हळूहळू गळ्यातून कपाटात गेले, सॅनिटायझरच्या बाटल्याही विसरल्या गेल्या. पण एक घटक मात्र अनेकांच्या आयुष्यात अद्याप ठाण मांडून बसला. तो म्हणजे दीर्घकाळ राहणारा खोकला. राज्याच्या कोणत्याही शहरातील घरटी चारपैकी दोघे जण न संपणार्‍या खोकल्याशी झुंज देतायत. त्यांच्याकडे असलेली शस्त्रे कोणती? कफ सिरपच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाटल्या, चघळण्यासाठी जुन्या गोळ्यांत भर पडलेले ॲलोपथी आणि आयुर्वेदिक क्षेत्रातले डझनांहून अधिक पर्याय. विविध समाजमाध्यमांवरील ‘तज्ज्ञ’ सल्ल्यांच्या आचरणानुसार घरगुती काढे आणि वाटेल ते नुस्खे. तरीही ही शस्त्रे उपयोगी ठरतायतच असे नाही. उलट घसा बरा होण्याऐवजी बिघडतानाच दिसतोय.

खोकला अर्धवट गेल्याचे वाटले तरी खवखव, घशाची खरखर राहिलेलीच जाणवतेय. ‘ओपीडी’मध्ये येणारी आजी, ऑफिसमधून थकून आलेला तरुण, गृहिणी, शिक्षक, बस कंडक्टर, रिक्षाचालक या सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकू येतं. ‘‘डॉक्टर, माझा खोकला काही जात नाही?’’

करोनासाथीनंतरच्या काळात खोकला म्हणजे केवळ आजार नाही, तर तो एक अनुभव बनलाय, त्याबाबत सतत कुजबुज होते. कुणी तीन महिने खोकला कवटाळून बसतो, तर कुणाचा खोकला पूर्ण बरा व्हायला नऊ महिनेदेखील लागतात.

रमेशकाका रोज पहाटे उठतात. देवासमोर धूप पेटवतात. खिडकीबाहेर कचरा जळतोय. बांधकामाचा धूर हवेत मिसळलेला. तेवढ्यात छातीत कळ येते. खोकला सुरू होतो. मग अख्खी सकाळ खोकल्यात जाते. ‘कोविडनंतर छातीच कमकुवत झालीय.’’ ते म्हणतात.

खरं तर त्यांच्या फुप्फुसात काही मोठा आजार नाही. पण करोनाने त्यांच्या श्वसननलिका जरा जास्तच नाजूक केल्या आहेत. धूर, धूळ, थंड हवा सगळं जास्त चटकन लागायला लागलंय. सीमाताईंचा खोकला वेगळा आहे. तो रात्री येतो. झोपताना. अंधारात. छातीत जळजळ होते. घसा करपतो. पुन्हा पाणी. पुन्हा झोप. पुन्हा खोकला. त्यांना वाटतं, ‘छातीत कफ असेल.’ कफ सिरप सुरू होते. पण खोकला जात नाही.

खरं तर सीमाताईंच्या छातीत नाही, त्यांच्या पोटात आग आहे. आम्ल वर येतं. घसा जळतो आणि खोकला सुरू होतो. आधुनिक जीवनशैली, उशिरा जेवण, ताणतणाव, वजन वाढणं या सगळ्यांचा आवाज म्हणजे हा खोकला.

अमोल तरुण आहे. करोनातून वाचला. ‘‘घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं, धड धड होते झोपेतून अचानक जाग येते.’’ तो म्हणतो. सगळ्या तपासण्या नॉर्मल. डॉक्टर म्हणतात, ‘‘काही नाही.’’ पण अमोलला माहीत आहे, काहीतरी आहे. घशात बोचतंय.

शीतलताई खोकल्याच्या औषधांसाठी मेडिकलमध्ये जातात. एक ॲण्टिबायोटिक. एक कफ सिरप. एक आयुर्वेदिक काढा. कोणी म्हणतं, ‘हे औषध सर्वात परिणामकारक’, कुणी ‘हे सर्वात ताकदीचे.’ त्यांच्या सेवनानं खोकला काही काळासाठी दडपतो. पण पूर्णपणे जात नाही. कारण खोकला हा शत्रू नाही. तो संदेशवाहक आहे. तो सांगतोय, ‘शरीराचं काहीतरी बिनसलंय.’ पण आपण त्या संदेशालाच गप्प करतो. स्वत:हून घेतलेली औषधं म्हणजे अनेकदा त्या संदेशावर तात्पुरता उपाय. पण मूळ कारण तसंच राहू दिलं तर ते काही दिवसांनी डोकं वर काढणारच. पुन्हा खोकला. पुन्हा बदललेली औषधं.

करोनानंतरच्या काळात खोकला म्हणजे काय? फुप्फुसांची नाजूकता, पोटातील आम्ल, मनातील भीती, औषधांचा गोंधळ यांचा एकत्रित आवाज. आपण खोकल्याकडे कसं पाहतो, हेही महत्त्वाचं. आपण त्याला शत्रू समजतो. पण तो अनेकदा शरीराचा संवाद असतो. ‘माझं ऐका.’ असं तो सांगत असतो.

शहरांमध्ये वाढलेलं प्रदूषण, सततचा ताण, अपुरी झोप, चुकीची आहारपद्धती, या सगळ्यांनी करोनानंतरच्या काळात खोकल्याला खतपाणी घातलं. ग्रामीण भागातही धूर, चुली, कचरा जाळणं, औषधांची सहज उपलब्धता हे सगळं खोकल्याला दीर्घकाळ टिकवून ठेवतंय. आता तुम्ही म्हणाल, या गोष्टी पूर्वीदेखील होत्याच की नाही? तेव्हा दोन गोळ्या आणि एक लाल पातळ औषध यांचा मारा आणि छानशा झोपेनंतर सर्दी-खोकला झटपट मोकळा होत असे की नाही? मग आत्ता या गोष्टी निष्प्रभ का ठरतायत?

खोकला म्हणजे केवळ वैद्यकीय लक्षण नाही. तो सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा आरसा आहे. तो सांगतो की आपण कसे जगतो, कसे खातो, कसे झोपतो आणि सतत निरुपयोगी काळजी किती करतो. करोनाची लाट ओसरली असली, तरी तिचे दीर्घकालीन परिणाम अजूनही आपल्या आजूबाजूला दिसतायत. विशेषत: खोकला, घशात अडथळा , छातीत जडपणा, ॲसिडिटी आणि चिंता या सगळ्यांचा एकमेकांशी गुंता बनून गेलाय. त्या गुंत्यांमुळे खोकल्याचा पारंपरिक मुक्काम आता लांबलेला दिसतो.

कफ सिरप (डेक्स्ट्रोमेथॉर्फन, कोडीन) आणि स्टेरॉइड्स इनहेलर्स यांचा वापर नको तितका वाढलाय. केमिस्टकडून मागचंपुढचं न पाहता दहा दहा वर्षे गर्भनिरोधक गोळ्या घेऊन गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर झालेल्या बायका आणि स्टेरॉइडसचा फवारा घेऊन घशात ‘फंगल इन्फेक्शन’ झालेले महाभाग यात फरक तो कोणता? डॉक्टरांकडून नियमित अंतराळाने प्रि्क्रिरप्शन तपासून घेणं म्हणजे आपल्याला कमीपणा वाटू लागलाय.

काढे, चूर्ण, गोळ्या, इतर पॅथींची औषधे यांविषयी न बोललेलंच बरे. जिथे कॅन्सरसारख्या गंभीर आजारातही लोक रानोमाळ भटकतात. काढे चूर्ण पुड्या, गोमूत्र शिंपडून लिव्हर खराब झालं की मग खर्‍या डिग्य्रा असणार्‍या डॉक्टरकडे येतात. सरळसोट ॲलोपॅथिक उपचारांनी बरा होणारा कर्करोग यथेच्छ गुंतागुंतीचा झाल्यावरही बरे करण्याची हमी मागत सेकंड- थर्ड -फोर्थ ओपिनिअन घेत फिरतात. तिथे सामान्य खोकल्याची काय गत?

प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन हा भौतिक शास्त्राचा नियम असताना, अमुक औषधाला साइड इफेक्ट्स नाहीत हे कसं शक्य आहे? इथे आपलं बुद्धिप्रामाण्य वगैरे निकामी होऊन आपण नव्वदीच्या दशकात टीव्हीवर रामायण सुरू आहे म्हणून एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाला ओवळणार्‍या अशास्त्रीय जमातीचे प्रतिनिधी असल्याचं पटवून देतो.

समाजमाध्यमांवरचे नुस्खे…

करोनामुळे वैद्यकीय शास्त्रावरच्या विश्वासार्हतेला तडे गेले. नाक्यावरच्या फॅमिली डॉक्टरपासून जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रमुखांपर्यंत सर्वांच्या कोलांटउड्या आपण पाहिल्या. हे दुर्दैवी आहेच पण त्यामुळे समाजाने आधुनिक वैद्यकशास्त्राची कास सोडून देणे त्याहून दुर्दैवी. विज्ञानाला तात्कालिक मर्यादा असणं हे साहजिक आहे त्यामुळे निराश होऊन लाखो लोक भलत्याच पंथाला लागले. ते म्हणजे समाजमाध्यमांवरच्या उपायांना गंभीर घेणे. खोकल्यापुरते बोलायचे झाले तर खोकला हा आजार नाही, ते लक्षण आहे. पण आपण लक्षणावर औषध देतो आणि कारण शोधत नाही.

‘माझा खोकला का जात नाही?’ हा बहुतांशांना पडलेला प्रश्न केवळ छातीचा नाही. तो शरीर, पचनसंस्था, आणि मन यांचा मिळून बनलेला आहे. करोनासाथ गेली. पण त्याची सावली अद्याप आहे. खोकला म्हणजे केवळ संसर्ग नव्हे, तर करोनानंतरच्या काळातील जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या औषधोपचारांचं प्रतिबिंब आहे, हे मान्य करायला हवं.

काय करायला हवं?

योग्य तपासणी

  • एक्स-रे / सीटी छाती
  • स्पायरोमेट्री (फुप्फुसाची क्षमता)
  • ॅएफऊ साठी इतिहास आणि गरज असल्यास गॅस्ट्रो सल्ला

जीवनशैली बदल

  • उशिरा जेवण टाळा
  • झोपताना डोकं थोडं उंच
  • तिखट पदार्थ, चहा-कॉफी कमी
  • धूळ-धूर टाळा
  • मास्क अजूनही फायदेशीर

मनासाठी काळजी

  • स्ट्रेस मॅनेजमेंट
  • श्वसनाचे व्यायाम
  • योग, प्राणायाम
  • गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध नको

  • अँटिबायोटिक्स स्वत:हून नाही
  • कफ सिरप नियमित नाही
  • आयुर्वेदिक औषधंही डॉक्टरांना सांगूनच

नक्की काय होतेय?

पोस्ट-कोविड क्रॉनिक ब्राँकायटिस

कोविड हा केवळ व्हायरल ताप नव्हता – तो श्वसनमार्गावर खोल परिणाम करणारा आजार होता. अनेक रुग्णांमध्ये कोविडनंतर फुप्फुसांच्या आतील नलिकांमध्ये जळजळ, सूज आणि चिकट स्राव वाढलेले दिसतात. यालाच पोस्ट-कोविड क्रॉनिक ब्राँकायटिससारखी स्थिती म्हणता येईल.

तो का वाढतोय?

कोविडमुळे फुप्फुसांच्या श्लेष्मल पटलावर कायमस्वरूपी ताण आला.
प्रदूषण (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या शहरांत सर्वाधिक.)
धूर, धूळ, कचरा जाळणे, अगरबत्ती, धूप, स्वयंपाकातील धूर.
आधीपासून असलेला अस्थमा, ॲलर्जी किंवा अतिधूम्रपानाचा इतिहास.

याची लक्षणे कोणती?

  • सकाळी अधिक खोकला
  • चिकट कफ
  • छातीत जडपणा
  • थोड्या श्रमांत दम लागणे
  • थंड हवा, एसी, पंख्याने

खोकला वाढणे

अनेक रुग्ण म्हणतात, ‘‘डॉक्टर, कोविड झाल्यापासून छाती कधीच मोकळी वाटत नाही.’’ हे केवळ मानसिक नसून, प्रत्यक्षात फुप्फुसांची संवेदनशीलता वाढल्याचा परिणाम आहे.

पोस्ट-कोविड ॅएफऊ आणि ॲसिडिटी

करोनानंतर एक मोठा पण कमी ओळखला जाणारा प्रश्न म्हणजे ॅएफऊ ( ॅं२३१ः- ए२ःस्र्ँंॠीं’ फीऋ’४७ ऊ्र२ीं२ी) – म्हणजे पोटातील आम्ल ( ंू्रि) घशाकडे परत येणे.

करोना आणि ॅएफऊ यांचा संबंध कसा, तर करोनामध्ये दिलेली स्टेरॉइड्स, वेदनाशामक औषधे, ॲण्टिबायोटिक्स, बराच काळ आळसात घालविणार्‍यांचे प्रमाण या काळात वाढले. वजनवाढ आणि ताणतणावाने पचनसंस्थेवर फार वाईट परिणाम या दोन-अडीच वर्षांत झाला.

लक्षणे

  • कोरडा खोकला, विशेषत: रात्री
  • झोपताना खोकला वाढणे
  • घशात जळजळ
  • छातीत जळजळ
  • पोटातून आंबट पाणी तोंडात येणे.
  • आवाज बसणे

हा खोकला अनेकदा फुप्फुसाचा नसतो, तर पोट-घसा यांच्यातील विसंवादाने होतो. पण रुग्णांना सतत ‘कफ आहे.’ असं वाटत राहतं, आणि खोकल्याच्या सिरपचा मारा होतो. पण त्यामुळे मूळ कारण सुटत नाही.

पोस्ट-कोविड ॲन्झायटी आणि ‘घशात गोळा’

कोविडने केवळ शरीरावर नाही, तर मनावरही खोल परिणाम केला. मृत्यूची भीती, आयसीयूमधले अनुभव – हे सगळं अनेक लोकांच्या मनात खोलवर बसलं आहे. यामुळे अनेकदा ‘घशात काहीतरी अडकले आहे’ अशी भावना होते.

लक्षणे

  • काहीही गिळताना अडथळा
  • खोकल्याची सतत उबळ
  • ताण वाढला की लक्षणे वाढणे

अनेक वेळा रुग्ण म्हणतात, ‘डॉक्टर, काहीतरी अडकले आहे असं वाटतं, पण सीटी स्कॅन नॉर्मल आहे.’

हा खोकला शारीरिक आणि मानसिक प्रश्नांमुळे येतो. ताणतणावामुळे घशाच्या स्नायूंमध्ये ताठरपणा येतो आणि मेंदू त्या संवेदनेला अधिक महत्त्व देतो.

पोस्ट-कोविड स्व-औषधोपचार

कोविडनंतर एक अपायकारक ट्रेंड वाढला आहे- तो म्हणजे सर्दी-खोकल्यावर वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे. करोनामध्ये ‘ऑनलाइन कन्सलटेशन’ अथवा ‘टेलिमेडिसिन’ ही गरज होती. व्हॉट्सॲपवरती फिरणारी प्रि्क्रिरप्शन्स आठवा. तेव्हा नाइलाज म्हणून आता सोय म्हणून ‘सेल्फ मेडिकेशन’चा सोपा मार्ग वापरणारे आहेतच. किरकोळ ‘व्हायरल इन्फेक्शन’साठी अँटिबायोटिक्सची मुळीच गरज नसते. एकेकाळी ऑगमेंटिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी अँटिबायोटिक्सपुढे भले भले रोग-जंतू लोटांगण घालत असत. पण चुकीच्या आणि अतिरेकी वापराने आता साध्या साध्या संसर्गासाठीदेखील ब्रह्मास्त्र समजली जाणारी औषधे वापरली जातायत.

(लेखिका दिल्लीत ब्रेस्ट कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहेत.)