|| दत्तप्रसाद दाभोळकर

पर्यावरणाचा विनाश हा आज सार्वत्रिक चिंतेचा विषय बनला आहे. ‘विकास की पर्यावरणरक्षण?’ यांच्यातली लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. परंतु या दोहोंचा समतोल सांभाळूनही विकास शक्य आहे. मात्र, त्यासाठी गरज आहे ती राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची आणि सामान्यांमध्ये विज्ञान साक्षरतेचा प्रसार करण्याची!

फार जुनी गोष्ट नाही. शंभरएक वर्षांपूर्वी जगभर सर्वत्र सर्व धर्मातील माणसे कोणतीही नवी वा चाकोरीबाहेरची गोष्ट करताना अस्वस्थ होऊन विचार करत. विचार असा : आपण जे करतोय त्यामुळे आपला धर्म तर बुडणार नाही ना? त्याने देव रागावेल का? आपल्या धर्मग्रंथांनी याला परवानगी दिली आहे का?

जगभर सर्वत्र माणसे अशी का वागत होती याचे नेमके कारण विवेकानंदांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले, ‘विज्ञान कितीही श्रेष्ठ, कितीही बरोबर असले तरी ते माणसाचे शाश्वत अस्तित्व नाकारते. विज्ञान त्याला एवढेच सांगते, की जन्माला येण्यापूर्वी तू माती किंवा मातीतून बनलेले एक रसायन होतास आणि मृत्यूनंतर माती बनून तू कायमचा नाहीसा होणार आहेस. हे खरे की खोटे, हा मुद्दा वेगळा. पण ९९ टक्के माणसे हे स्वीकारू शकत नाही. अशा वेळी त्यांच्या अशाश्वत जीवनात त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून जगभरात वेगवेगळे धर्म उभे राहिले. सर्व धर्म माणसाला अगदी ठामपणे सांगतात, की तू जन्माला येण्यापूर्वीही अस्तित्वात होतास आणि मृत्यूनंतरही अनादि काळ तुझे अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे माणूस धर्माज्ञा मानतो. त्या मोडत नाही. तो धर्माने सांगितलेली नीतितत्त्वे पाळण्याचा प्रयत्न करतो. हे खरे तर तसे चांगलेच आहे. समाजासाठी आणि त्याच्यासाठीही!

पण यात एक घोटाळा होतो. धर्मातील मूलभूत तत्त्वे तो समजावून घेत नाही. तो धर्मग्रंथात काय सांगितले आहे तेवढेच वाचतो. तो एक गोष्ट विसरतो, की धर्म हे धर्मग्रंथांवर अवलंबून नाहीत, तर धर्मग्रंथ धर्मावर अवलंबून आहेत. म्हणजे धर्मातील मूलभूत तत्त्वे लोकांना समजावून देण्यासाठी धर्मग्रंथ एका विशिष्ट कालखंडात निर्माण झाले. ते काळाच्या एका चौकटीत बंदिस्त झाले आहेत. काळाची ती चौकट बदलली की त्यांना बदलावे लागेल. किंवा ते तसे बदलले नाहीत, तर धर्मग्रंथांना विसरून माणसांनी धर्मातील मूलभूत तत्त्वे समजावून घेऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे.

अगदी वेगळ्या संदर्भात हे सारे आज नीटपणे समजावून घेण्याची गरज आहे. आज जगभर ‘पर्यावरण’ हा नवा युगधर्म आहे. आपण अमुक असे वागलो, आपण अमुक प्रकल्प राबवला तर पर्यावरणाचे काय होईल, म्हणून जगभरातील माणसे अस्वस्थ होतात. आपल्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून माणसाला धर्म हवा असतो. आज ‘शाश्वत विकासासाठी’ पर्यावरणरक्षण गरजेचे आहे असे आपण म्हणतो. खरी अडचण अशी, की धर्मग्रंथांनी नेमके काय सांगितलंय, हे फारसे किंवा अजिबात समजावून न घेता जनसमूह गोंधळलेल्या मन:स्थितीत राहिले. त्याचा फायदा घेऊन मतलबी, बेरकी माणसे स्वत:च्या फायद्यासाठी या जनसमुदायाला हवी तशी खेळवत राहिली. मानवाचे कल्याण करायला निर्माण झालेल्या सर्वच धर्माच्या नावावर माणसांची भयावह पिळवणूक करण्यात आली. माणसांना आपापसात लढवून प्रचंड नरसंहार करण्यात आला. मानवी समाजाचे अपरंपार नुकसान करण्यात आले. आज पर्यावरण या नव्या युगधर्माच्या नावाखाली असे काही होऊ शकेल का? होते आहे का?

हे सारे समजावे म्हणून तीस वर्षांपूर्वी- १९८८ साली भारतात काय परिस्थिती होती, ते सांगतो. नर्मदा प्रकल्प त्यावेळी ऐरणीवर आला होता. नर्मदा प्रकल्पाची शोधयात्रा करून मी ‘माते नर्मदे’ हे पुस्तक लिहीत होतो. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा फार मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होईल, हा या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तेव्हा जनमानसाच्या मनात ‘पर्यावरण’ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, हे समजावे म्हणून मी एक वेगळा प्रयोग केला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वीस- वीसच्या गटांत वकील, डॉक्टर, अभियंते, विद्यार्थी आणि व्यापारी यांना- पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे रक्षण कसे करता येईल, हे एका पानात लिहावयास सांगितले. या प्रश्नांची उत्तरे महाभयानक किंवा तुफान विनोदी स्वरूपाची दिली गेली होती. सात आंधळे आणि एक हत्ती या गोष्टीची ती विस्तारित आवृत्ती होती! ‘ओझोनचा क्षय’ हा शब्द तर एकानेही ऐकलेला नव्हता.

ते असो. आज त्या परिस्थितीत आश्वासक व सकारात्मक बदल झालेला आहे. जगभर सर्वत्र अगदी शाळकरी मुलेसुद्धा सांगतात, ‘पर्यावरणाचे रक्षण म्हणजे आपल्या परिसरातच नव्हे, तर या पृथ्वीतलावर सर्वत्र हवा स्वच्छ असावी, ती प्रदूषित नसावी. पाणी स्वच्छ, निर्मळ असावे. जगभर सर्वाना ते सर्वकाळ ‘पुरेसे’ मिळावे. अशी स्वच्छ हवा, निर्मळ व पुरेसे पाणी अनादि काळ या पृथ्वीवर सर्वत्र असावे. म्हणजे आपण आज ज्या विकास योजना कार्यान्वित करतोय किंवा ज्या सुरू आहेत, तसेच आपले आजचे जे जीवनमान व जीवनपद्धती आहे, त्यामुळे असे काही होणार नाही, याबाबत आपण जागरूक असावे.

हे सगळे अगदी बरोबर आहे. पण याची कार्यवाही करताना आपणासमोर प्रामुख्याने तीन प्रश्न येतात. पहिली गोष्ट अशी, की विकसित देशांत आज जे जीवनमान आहे, त्यामुळे पर्यावरण बिघडले आहे. त्यांना आपले जीवनमान अधिक चांगले करायचे आहे. त्यात पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये असे त्यांना वाटते. पण त्याला एक पूर्वअट असली पाहिजे. आज साऱ्या विकसनशील देशांतील बहुसंख्य लोक हे घृणास्पद परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांचे जीवनमान थोडे तरी सुधारावे म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प त्यांनी हाती घेणे अनिवार्य आहे. त्यांनी ते तसे हातात घेऊ नयेत असे वाटत असेल, तर त्याला एक पूर्वअट हवी. आजवर जगभर जी समृद्धीची साधने निर्माण झाली आहेत, त्यांचे समन्यायी वाटप झाले पाहिजे. नाहीतर नवे प्रकल्प पर्यावरणाच्या नावाखाली होणार नाहीत. म्हणजे आम्ही विकसित देशातील लोक आणि विकसनशील देशांतील तुमच्या- माझ्यासारखे अभिजन मजेत, चनीत जगत राहणार. आणि वंचित समाज मात्र कायम आहे तसाच घृणास्पद अवस्थेत राहणार! हा प्रश्न कळीचा आहे. पण हे अवघड जागेचे दुखणे आहे. त्यावर कुणी काही बोलणार नाही, कुणी काही करणार नाही. सशक्त जनआंदोलने हा त्यावरचा उपाय आहे. पण तशा खुणा इथे, तिथे जगभर कुठेच दिसत नाहीत.

उरलेले दोन मुद्दे जरा वेगळे आहेत. विकसनशील देशांना आणि अगदी विकसित देशांतील नागरिकांनाही फसवण्यासाठी लगेच किंवा कधीच तपासता येणार नाहीत अशा वैज्ञानिक अंधश्रद्धा पसरवल्या जाऊ शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यातून वारेमाप पसे मिळवता येतात. एक उदाहरण देतो.. १९८५ च्या सुमारास ‘ओझोनचा क्षय’ हा शब्द जगभर चलनात आला. जगभरच्या जनसामान्यांना हे सर्वच नवीन होते. पृथ्वीवर १५ ते ५० किलोमीटर अंतरावर जो भाग आहे, त्याला आपण म्हणतो- पृथ्वीवरचे दुसरे आवरण! या विभागात ओझोन या स्थिर रासायनिक वायूचे अतिविरळ असे आवरण आहे. पृथ्वीवर येणारे प्रकाशकिरण ‘तानापिहिनिपाजा’ या घटकांनी बनलेले आहेत, हे आपणास माहीत आहे. यांतील सर्वात कमी लांबी असलेला रंग आहे- जांभळा. पण जांभळ्या रंगाच्या लहरींपेक्षाही कमी लांबी असलेल्या काही लहरी असतात. त्या पृथ्वीवर आल्या तर पृथ्वीवरचे तापमान वाढेल, काही विशिष्ट रोग पसरतील. पण या दुसऱ्या आवरणातील ओझोन वायू त्यांना अडवतो व संपवून टाकतो.

येथवर सगळे ठीक आहे. जगभर सर्वत्र डय़ुपॉन्ट कंपनीने बनवलेला फ्रिऑन हा वायू शीतगृहांत आणि सौंदर्यप्रसाधनांतील फवाऱ्यांमध्ये वापरला जातो. हा वायू निरुपद्रवी आणि स्थिर आहे असे १९८५ च्या सुमारास सांगण्यात आले. त्यामुळे पृथ्वीवर निर्माण करून वातावरणात सोडलेला हा स्थिर वायू प्रवास करत सरळ या दुसऱ्या आवरणात जातो. पृथ्वीवर निरुपद्रवी असलेला हा वायू या दुसऱ्या आवरणात मात्र आतंकवादी बनतो. आपल्याकडे संजीवनी मंत्र असल्याप्रमाणे स्वत: नष्ट न होता तो ओझोन वायूचा नायनाट करत सुटला. या वायूवर लगेचच बंदी घातली नाही तर पृथ्वीचे तापमान झपाटय़ाने वाढेल, अनेक रोगराई पसरतील.. या साऱ्या सांगण्यात एक ग्यानबाची मेख असू शकत होती. त्या वर्षी फ्रिऑन या वायूची निर्मिती करणाऱ्या डय़ुपॉन्ट कंपनीच्या पेटन्टचा कालावधी संपणार होता. आजवर डय़ुपॉन्ट कंपनी जगभर अव्वाच्या सवाकिमतीत फ्रिऑन विकत होती. पण डय़ुपॉन्ट कंपनीच्या फ्रिऑनचा पेटन्ट कालावधी संपणार असल्याने आता जगभरात कुणीही कुठेही बनवून अगदी स्वस्त किमतीत फ्रिऑन विकू शकणार होते. परंतु हा वायू ओझोनचा नाश करत असल्याने आता तो कुणालाच बनवता येणार नव्हता.

आणि इकडे फ्रिऑनचा पर्याय असलेला डय़ुपॉन्टचा दुसरा वायू तयारच होता. तो वायू आता डय़ुपॉन्ट सांगेल त्या किमतीत जगभर सर्वाना विकत घ्यावा लागणार होता. फ्रिऑन पर्यावरणाला घातक आहे, हे तो वीस वष्रे वापरात ठेवून मगच सांगण्यात आले. फ्रिऑन वातावरणाला घातक आहे, हे जगभर ओरडून सांगण्याकरता भलीमोठी मोहीम ज्या गरसरकारी संस्थांनी उभारली होती, त्यांना डय़ुपॉन्टने प्रचंड पसे दिले होते!

आणखी वीस वर्षांनी फ्रिऑनचा पर्याय असलेला हा नवा पदार्थ पर्यावरणास भयंकर हानीकारक आहे म्हणून सांगितले जाईल का? ते असो. आमचा प्रश्न वेगळाच होता. जगभर जो फ्रिऑन निर्माण होतो, त्यातील ९७ टक्के हिस्सा अमेरिका, युरोप आणि रशिया वापरत होते. फक्त तीन टक्के हिस्सा भारत आणि चीन एकत्रितपणे वापरत होते. मग आणखी काही काळ स्वत:च बनवून तो वापरण्याची परवानगी भारत व चीनला हवी की नको?

पर्यावरणाच्या संदर्भातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- पर्यावरणाचे रक्षण करावयाचे तर देशात ‘विज्ञान साक्षरता’ हवी. आज भारतात ती फारशी कुठेच नाही. एक उदाहरण देतो. रस्त्यावर सर्वत्र प्लॅस्टिकचा कचरा, वाऱ्यावर उडणाऱ्या प्लास्टिकच्या घाण पिशव्या आणि त्या गटारात अडकून गटारे बंद होणे व त्यातील घाण पाणी रस्त्यावर येणे हे चक्र सुरूच आहे. त्यातून प्लास्टिक हे लोखंड, काच, कागद यांच्याप्रमाणे वातावरणात विघटित होत नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे मग प्लॅस्टिकवर बंदी घालणे!

आता विज्ञान समजावून घेऊन जरा शांतपणे यावर विचार करू या. मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रधान सचिवांनी प्लास्टिक बंदीच्या कागदपत्रावर सही केली. गंमत म्हणजे त्यांनी सही करायला जे पेन वापरले असेल, तेही प्लास्टिकचेच होते! आपण आज प्लास्टिक युगात जगतो आहोत. पंखा, खुर्ची, फ्रिज, टीव्ही असा सर्वत्र प्लास्टिकचा वापर अपरिहार्यच आहे. ते राहू देत. पण आपण आज जे कपडे घालतो, तेही टेरिलिन, नायलॉन हे कृत्रिम रासायनिक धाग्यांनी बनलेले आहेत. हे धागे प्लास्टिक आहेत आणि तेही वातावरणात विघटित होत नाहीत. मात्र, हे कृत्रिम धागे माणसाने निर्माण केले नसते तर शेतीचे फार मोठे क्षेत्र कापूस लागवडीसाठी गेले असते. त्यातून अन्नधान्याचा तुटवडा पडला असता. आणि कापड रेशनवर द्यावे लागले असते. आणि तरीही फार मोठा जनसमुदाय अर्धनग्न राहिला असता.

ते असो. कोणतेही प्लास्टिक- अगदी कृत्रिम धागेसुद्धा वातावरणात विघटित होत नाहीत, हे खरे. लोखंड, काच, कागद हे वातावरणात विघटित होतात, हेही खरेच. पण लोखंड, काच, कागद आपण वातावरणात विघटित होण्यासाठी ठेवत नाही. आपण ते वेगवेगळे गोळा करतो आणि रासायनिक प्रक्रियेतून ते पुन्हा नव्याने बनवतो. रासायनिक प्रक्रियेने लोखंड, कागद वा काच नव्याने बनवणे जेवढे कठीण आणि खर्चाचे आहे, त्यापेक्षा सर्व प्रकारचे प्लास्टिक नव्याने बनवणे सोपे व कमी खर्चाचे आहे.

आपली खरी अडचण वेगळीच आहे. आपल्याकडे रस्त्यावर हिंडून कचरा गोळा करणाऱ्या स्वयंरोजगारी बाया आहेत. त्या कचऱ्यातून लोखंड, काच, कागद गोळा करतात. प्लास्टिकला हात लावत नाहीत. कारण त्यांनी दहा हजार पिशव्या गोळा केल्या तर त्यांचे वजन होते- फक्त एक किलो. म्हणजे त्यांना त्यातून मिळणार- एक रुपया! तेव्हा आपण एक नवी रचना करू या. या बायांना एकेक विभाग वाटून द्यायचा. त्यांनी त्या विभागांतला फक्त प्लास्टिकचा सगळा कचरा गोळा करायचा. रस्त्यावर व गटारांत प्लास्टिकची एकही पिशवी दिसता कामा नये. या कामासाठी या बायांना महिन्याला वीस हजार रुपये पगार देऊन त्यांचे जीवन थोडे सुस करू या. प्लास्टिकवर कर बसवून त्यांना हा पगार देऊ या. इथे एक लक्षात घ्या- सर्व प्रकारचे प्लास्टिक सोप्या रासायनिक प्रक्रियेने विघटित करून नवे उपयुक्त पदार्थ बनवता येतात. आज रत्नागिरीत दीपक गद्रे यांची ‘गद्रे मरीन प्रॉडक्टस्’ ही कंपनी आपण वापरलेले तसेच बाजारातून वापरलेल्या प्लास्टिक बॅगा सहा रुपये किलो या दराने विकत घेऊन दिवसाला आठशे लिटर जागतिक दर्जाचे डिझेल बनवते. ते त्यांना २८ रुपये लिटर या दरात पडते.

म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर समाजाच्या सर्व स्तरांत विज्ञान साक्षरता रुजवून नव्या रचना शोधाव्या लागतील. त्याचबरोबर याकरता गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची, किंवा राजकीय हस्तक्षेप थांबवून सक्षम प्रशासन देण्याची! गंगा शुद्धीकरणाबद्दल आपण अनेक दशके बोलतो आहोत. गंगेच्या परिसरातील कारखान्यांतून आणि गंगाकाठच्या गावांतून येणारे दूषित पाणी आपणच गटारातून गंगेत ओकत असतो. मग गंगा शुद्ध कशी होणार? यावर अगदी साधा उपाय म्हणजे कारखान्यातून बाहेर जाणारे पाणी कारखान्याच्या बाहेर जाण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ झाले पाहिजे. हाच नियम गंगेकाठच्या गावांतून गंगेत येणाऱ्या सांडपाण्याला लागू करायला हवा. यासाठी वापरावे लागणारे तंत्रज्ञान सोपे आणि स्वस्त आहे. परंतु त्यासाठी गरज आहे ती फक्त राजकीय हस्तक्षेप नसलेल्या सक्षम प्रशासनाची! १९८० साली मी जर्मनीत लुडिवगशाफनला गेलो होतो. त्या गावात ‘बी. ए. एस. एफ.’ या जगातील त्यावेळच्या सर्वात बलाढय़ कंपनीचे सर्व रासायनिक कारखाने एकत्रित होते. कंपनीच्या आवारासमोरून ऱ्हाइन नदी वाहत होती. आजूबाजूचा परिसर दाखवताना कंपनीचा प्रमुख मला म्हणाला, ‘आम्ही दररोज निम्मी ऱ्हाइन नदी आमच्या प्रकल्पांसाठी वापरतो. आणि आमच्या रासायनिक प्रकल्पांसाठी वापरलेले हे सर्व पाणी पूर्णपणे पहिल्याइतकेच स्वच्छ करून रोज पुन्हा ऱ्हाइन नदीत सोडतो.’

मी सांगतो आहे ती गोष्ट आहे चाळीस वर्षांपूर्वीची!

dabholkard@dataone.in