पंकज भोसले pankaj.bhosle@expressindia.com

इंटरनॅशनल बुकरहा अनुवादित पुस्तकांसाठीचा पुरस्कार मिळाल्यावर गीतांजली श्री यांची रेत समाधिही मूळ हिंदी कादंबरी धडाधडा खपतेय! पण हिंदी वाचक काही बुकरसाठी वाट पाहत बसला नव्हता.. मराठीतले साहित्यप्रेमीजसे ताज्या साहित्याच्या वाचनात कच्चे असतात, तसा तर हिंदीतला वाचकवर्ग अजिबातच नाही. साहित्यव्यवहार जिथं नव्या लेखकांनी बहरतो, तिथलं अव्वल साहित्य जगभरही जाण्याची शक्यता वाढणारच..

Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
maharashtra interim budget 2024 maharashtra sees rise in fiscal and revenue deficit
Maharashtra Interim Budget 2024 : वित्तीय तूट एक लाख कोटींवर, कर्जाचा बोजा आठ लाख कोटी
Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?
Halve the price of high priced garlic
लसूण स्वस्त; ग्राहकांना दिलासा, परराज्यातील लसणाचा हंगाम सुरू

दक्षिण मुंबईच्या पार टोकाला काळबादेवी, धोबीतलाव, मरीन लाईन्स यांच्या नजीक ‘दादी संतूक लेन’ हा उपनगरी थाटाचा अनुभव देणारा परिसर आहे. मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांचा भरणा अधिक असल्याने या रस्त्यावरील भाजीमंडई ओलांडताना अजब रंगसंगतींच्या दृश्यमालिकांना पार करीत तुरळक उच्चमध्यमवर्गीय घरांच्या खुणांचा शोध लागू शकतो. या रस्त्यावरच देशभरात प्रसिद्ध होणारी यच्चयावत हिंदी साहित्यिक मासिके, पुस्तके मुंबईतल्या वाचकांना उपलब्ध करून देणारे ‘परिदृश्य प्रकाशन’ हे दुकान आणि त्याचे पुरातन काळातील वाटावे असे गोडाऊन आहे. हिंदीतील अभिजात लेखकांपासून करोनोत्तर काळात धडाधड प्रकाशित होणाऱ्या नव्या लेखकांची-कवींची सगळी पुस्तके एका छताखाली मिळणारे हे मुंबईतील परिपूर्ण हिंदी पुस्तकालय आहे. हिंदी चित्रसृष्टीतील तारांकितांपासून ते मुंबईत वेगवेगळय़ा भाषेत हिंदी साहित्य अनुवादित करणाऱ्या भाषांतरकारांपासून हिंदी कथासाहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाना या रस्त्यावरून पायधूळ झाडण्यावाचून गत्यंतर नसते. करोनोत्तर काळात पुस्तके उपनगरांपर्यंत पाठविण्याची यंत्रणा त्यांनी अधिक अद्ययावत केली असली, तरी आर्थिक स्तराचा अजब विरोधाभास असलेल्या रस्त्यावरून एकदा जाणाऱ्याला पुस्तकांसाठी इथली वारीच अधिक मोहवते.

दोन-तीन महिन्यांपूर्वी गीतांजली श्री यांची हिंदी कादंबरी ‘रेत समाधि’चा इंग्रजी अनुवाद इंटरनॅशनल बुकरच्या परिघात दीर्घ यादीद्वारे आला. इंग्रजी अनुवाद मिळविण्याचे मुंबईकरांकडे ऑफलाइन व ऑनलाइन असे अनंत पर्याय होते. मूळ हिंदी कादंबरीसाठी मात्र पुस्तकप्रेमींचे विविध भाषिक जथ्थे ‘ परिदृश्य प्रकाशना’त धडकत होते..

.. या वारकऱ्यांची संख्या ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ लघुयादीत पोहोचली तेव्हा दुपटीने वाढली. आता गंमत म्हणजे पाच-सहा दिवसांपूर्वी ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ला इंटरनॅशनल बुकर मिळाले, तेव्हा ‘रेत समाधि’च्या तब्बल सातव्या आवृत्तीच्या परिदृश्यमध्ये असलेल्या साऱ्या प्रती वाचकांनी संपविलेल्या होत्या. गुरुवारी दुपारी या पुस्तकाच्या नव्या भल्यामोठय़ा संख्येने प्रती येणार असल्याची माहिती येथील मुख्य व्यवस्थापक रमण मिश्रा यांनी दिली. २०१८ साली ‘रेत समाधि’ कादंबरीची पहिली आवृत्ती प्रख्यात राजकमल प्रकाशनाद्वारे आली. २०२१ साली ब्रिटनमधील ‘टिल्टेड अ‍ॅक्सिस प्रेस’ या प्रामुख्याने आशियाई देशांतील लेखनाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणाऱ्या प्रकाशन संस्थेने ही कादंबरी प्रकाशित केली. तोवर या पुस्तकाच्या हिंदीत तीन आवृत्त्या संपल्या होत्या (दरएक आवृत्ती २२०० प्रतींची). बुकरसाठी ही कादंबरी चर्चेत आली, तेव्हा राजकमल प्रकाशनाला या पुस्तकाच्या छपाईचा व्याप वाढवावा लागला. पुस्तकाची चौथी-पाचवी आणि सहावी आवृत्ती (मागणी अचानक वाढल्याने यात दोन वेळा छपाई- पाच हजार प्रतीची- करण्यात आली.) गेल्या चार पाच दिवसांत सातवी आवृत्तीही संपली असून, आठवी आवृत्ती छपाई होऊन लगेचच बाजारात दाखल होणार असल्याची माहिती राजकमल प्रकाशनाचे आमोद महेश्वर यांनी हा लेख लिहायला घेण्यापूर्वी दिली.

दादूजी संतूक लेनजवळील छोटय़ाशा आकाराच्या दुकानात चाललेला अफाट पुस्तकसंसार आणि देशभरातील हिंदी पुस्तकविक्री व्यवहारात गीतांजली श्री यांच्या कादंबरीने गेल्या आठवडय़ापासून केलेली घुसळण यांकडे पाहताना आपल्या मराठीत अजून पारंपरिक (पुलं, वपु, नेमाडे, देसाई ) लेण्यांना कवटाळून बसलेल्या कथनसाहित्याच्या बहुतांश वाचकांनी आणि तीच खपताहेत म्हणून साहित्य संमेलन ते पुस्तक प्रदर्शनात तेच ते वाचकांसमोर अग्रक्रमाने धरणाऱ्या प्रकाशन-वितरण यंत्रणेने साहित्याची भूमी अगतिक करून सोडल्याचे फार दु:ख वाटू लागते.

हिंदीतला बदल केव्हाचा?

हिंदी पुस्तकाला बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाल्यामुळे एका रात्रीत गीतांजली श्री हे नाव जागतिक पटलावर पोहोचले, असा माध्यमांची उच्चरवातील वृत्तफेक पाहून कुणाचा समज व्हायची शक्यता आहे. गीतांजली श्री यांच्या आधीच्या दोन्ही कादंबऱ्या आणि कित्येक कथा इंग्रजी व इतर भाषांमध्ये पोहोचल्या आहेत. फ्रेंच, जर्मन, सर्बियन आणि दक्षिण कोरियायी भाषेतही त्यांच्या पुस्तकांची भाषांतरे आधीच पोहोचली होती. तशा कित्येक भाषेंत अनुवादाद्वारे पोहोचलेल्या त्या एकमेव लेखिका नसून हिंदीतील समकालीन लेखकांची मोठीच्या मोठी फौजच तीन-चार देशी-विदेशी भाषांमध्ये पोहोचली आणि वाचली जात आहे. हा बदल प्रामुख्याने उदारीकरणानंतरचा आहे. जागतिकीकरणानंतर जगण्यात झालेल्या बदलांकडे तिरकसपणे पाहणाऱ्या लेखकांचा एक गट आणि हिंदीत साठोत्तरीची दशकोन् दशके नवकथा लिहिणाऱ्या लेखकांचा दुसरा गट नव्वदोत्तरी आणि दोन हजारोत्तरीच्या काळात वेगाने अनुवाद होऊन इंग्रजीत व इतर भाषांत पोहोचला आहे.

मराठी वाचकांना न झेपलेल्या किरण नगरकर, मकरंद साठे, सचिन कुंडलकरपासून आजच्या आघाडीच्या लेखकांतील गणेश मतकरी, अवधूत डोंगरे यांच्या कथा-कादंबऱ्यांचे इंग्रजीत अनुवाद झाल्याची उदाहरणे आपण हा मुद्दा खोडायला पुढे आणू शकू. पण दोन हातांची बोटेही मोजून संपणार नाहीत, इतकीच आपली दोन दशकांतील उदाहरण प्रगती असल्याचे आजच्या हिंदी साहित्यातील अनुवादांची संख्या पाहिल्यावर लक्षात येईल. तुम्हाला प्रेमचंद यांच्या कथा इंग्रजीत उत्तम अनुवादाद्वारे वाचायला मिळतील, मनोहर श्याम जोशी या तिकडम कादंबरीकाराची अवघड हिंदीतील ‘हरिया हरक्यूलीज की हैरानी’ ही कादंबरी ‘परप्लेक्सिटी ऑफ हरिया हरक्यूलीज’ नावाने वाचायला मिळेल. अलका सरावगी यांची गाजलेली ‘कलि-कथा व्हाया बायपास’ ही कादंबरीही अनुवादाद्वारे इंग्रजीत स्थलांतरित झालेली दिसेल. चंदन पांडे या अगदीच ताज्या लेखकाची ‘वैधानिक गल्प’ ही कादंबरी ‘लीगल फिक्शन’ नावाने इंग्रजीत सहज उपलब्ध होऊ शकेल. मराठीत वेगवेगळय़ा दशकातील इतक्या लेखकांचे अनुवादित इंग्रजी साहित्य शोधायला घेल्यास हाती निराशाच येईल.

लेखकांबरोबर वाचकही घडल्याचा परिणाम..

हिंदी वाचकांचा पट्टा उत्तरेकडील सात-आठ राज्यांचा असल्यामुळे स्वाभाविकच इथली वाचनभूक कोणत्याही एकभाषिक राज्यापेक्षा अधिक आहे. मराठीतील नवकथेच्या साहित्यप्रवाहाप्रमाणेच हिंदीत साठोत्तरीत ‘नयी कहानी’ लिहिली गेली. अनियतकालिके-लिटिल मॅगझिन घडविली गेली, बंडखोर लेखकांच्या पिढीचा उदय झाला आणि सत्तरीत रहस्यकथादी मासिक-पुस्तकांचे पेव फुटले. सत्तर-ऐंशी-नव्वदीपर्यंत हे सारे सुखाने सुरू होते. मग दूरदर्शन्नादिष्ट युगाने केलेल्या घोटाळय़ात इथल्यासारखीच तिथे मासिके बंद पडण्याचा धडाका लागला. रहस्यकथांची सद्दी संपली, पण साहित्याची गुणवत्ता ढेपाळू नये याकडे आपण जितके दुर्लक्ष केले ते हिंदीने केले नाही. मुख्य प्रवाहातील दीड दोन डझनांहून अधिक मासिकांनी बदलत्या मूल्यांवर उभारले जाणारे नव्वदोत्तरीतील नवसाहित्य, नवलेखन यांना प्रोत्साहन दिले. ग्लोबलायझेशनची फळे आणि कु-फळे भोगणाऱ्या दोन्ही प्रकारच्या कथालेखनाला उभे राहण्यासाठी खतपाणी दिले. मुंबईतील शहाड-अंबरनाथ परिसरात मराठीतील भणंग कवींसह भटकणारा गीत चतुर्वेदी हा तरुण दोन दशकांपूर्वी मध्य प्रदेशात स्थायिक झाला. दीड दशकापूर्वी त्याच्या ‘सावंत आंटी की लडकीयाँ’ या कथासंग्रहाने हिंदीत खळबळ माजवून दिली होती. बम्बईया हिंदीत शहाड-अंबरनाथ जवळच्या परिसरात घडणाऱ्या या कथांत शिव्या-ओव्यांपासून बेधडक स्त्री शरीरवर्णनांच्या माळा सापडतील. केवळ तेरा चौदा कथा लिहून आजच्या हिंदीतील आघाडीचा कवी-कथालेखक म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. आपल्या भूमीतल्या भुजंग मेश्राम या कवीची महत्ता जाणून घेण्यासाठी मराठीत एकही लेख सापडणार नाही. त्याच्यावरचा सर्वोत्तम लेख हिंदीमध्ये गीत चतुर्वेदीने लिहिला असून, त्याचा इंग्रजी अनुवादही वाचायला मिळू शकतो.

हिंदीत ‘हंस’, ‘कथादेश’, ‘तद्भव’ आणि अर्धा डझन अशी मासिके आहेत, जी पाच ते सात राज्यांत हजारोंच्या संख्येने खपतात. करोनाकाळातही काही अपवाद वगळता बहुतांश मासिके सुरू होती. त्यांत आजच्या साहित्यिक वातावरणावर संपादकीय पाच ते सात कथा, कथाविचार, समीक्षा, दिवंगत साहित्यिकांना श्रद्धांजली हा पारंपरिक अनुक्रम असतो. जागतिकीकरणापूर्वीही हा असाच होता. भरपूर कथा लेखकांकडून लिहून घेणे ही संपादक आपली जबाबदारी असल्याचे मानतात आणि चांगल्या कथांचे कौतुक करायला हे संपादक सदैव सज्ज असतात. गेल्या वर्षी छापत असलेली कथा खूप भावल्यामुळे कथादेशच्या संपादकाने त्या कथेचे महत्त्व विशद करणारा प्रदीर्घ लेख लिहिला होता. वाचकांची या मासिकांमधील कथा आवडली-नावडली सांगणारी मोठ-मोठी पत्रे पाहिली की तिथली कथावाचन यंत्रणा किती सक्रिय आहे, याची प्रचीती येते. कथा छापणारी ऑफलाइन-ऑनलाइन मासिके उत्तम चालत असून, त्यांना मूळ आणि इतर भाषांतील अनुवादित चांगला मजकूर ढिगाने उपलब्ध आहे. या वर्षी आरंभीच मध्य प्रदेशमधून ‘वनमाली’ हे नवे मासिक सुरू झाले असून, चांगल्या कथासाहित्याचा पाठपुरावा करण्यासाठी हिंदीतील नव्या-जुन्या दिग्गजांचे कथन साहित्य गेल्या चार-पाच अंकांतून गाजविलेले दिसते.

वाचक पारंपरिक लेखनाला कवटाळून न बसता नव्या लेखनाचे स्वागत गेली दोन-तीन वर्षे सारख्याच जोमाने करीत असल्याचा परिणाम त्या दर्जाचे साहित्य तेथे निर्माण होण्यास उपकारक ठरला आहे.

नवे धडाडीचे हिंदी साहित्यिक..

आपण दोनेक दशके उदय प्रकाश, प्रियंवद यांच्या हिंदी कथा आपल्या दिवाळी अंकांमधून वाचतो. पण या लेखकांच्या पिढीला मागे टाकत या दशकांत काही उत्तम लेखक हिंदीमध्ये घडले आहेत. ज्यांची कथनशैली चक्रावून सोडणारी आणि खऱ्या अर्थाने ग्लोबल आहे. गीत चतुर्वेदी यांचे दोन कथासंग्रह आले आहेत. पंकज मित्र या झारखंडच्या लेखकाचा जिद्दी रेडिओ हा कथासंग्रह आवर्जून वाचावा असा. शहरी-ग्रामीण आणि सिनेमा संदर्भानी युक्त असलेली त्यांची प्रत्येक कथा खणखणीत असते. मनोजकुमार पांडेय या तरुण लेखकाच्या जीन्स आणि इतर कथांचे संग्रह, प्रवीण कुमार या लेखकाचे ‘छबीला रंगबाजका शहर’ आणि ‘वास्को द गामा की सायकिल’ (उदय प्रकाश यांच्या ‘वॉरन हेिस्टग का सांड’च्या दोन पावले पुढेच असलेली कथा) हे मूळ हिंदीतच वाचणे इष्ट. ‘हंस’ आणि ‘तद्भव’ देत असलेल्या नवनव्या लेखकांच्या कथा वाचणे आनंदाचेच असते. गीतांजली श्री यांनी आपली पहिली कथा याच ‘हंस’ मासिकातून लिहीली आणि अधूनमधून त्या तिथे उमटत असतात. बुकरच्या लघुयादीत स्थान मिळविल्यानंतर नुकतीच ‘हंस’ मासिकाने त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे.

हिंदीला पहिल्यांदाच इंटरनॅशनल बुकर मिळाल्यामुळे परदेशात इंग्रजीत तर देशातील भाषिक वाचकांत आणखी जोमाने गीतांजली श्री यांची कादंबरी हिंदीतून वाचली जाईल. मात्र गीतांजली श्री यांच्या साहित्याला जागतिक मान्यता मिळण्याइतपत आजचे हिंदी कथन साहित्य काय दर्जाचे लिहिले जात आहे, ते अजमावण्यासाठी कथेला दुय्यम मानण्याचा शिरस्ता पाळणाऱ्या मराठी वाचकांनी आपापल्या भागातील ‘दादी संतूक लेन’ शोधायची गरज आहे. कमी नाही कदाचित वाचनानंदाचा वरील उदाहरणांहून अधिक खजिना त्यातून हाती लागू शकेल.