पिच्चर

छोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक.

जुन्या ऐसपैस वाडय़ात गजबजलेलं आजोळ होतं.

छोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक. गोष्टीत-कवितेत असतो तसा मामा फार तालेवार नव्हता. जुन्या ऐसपैस वाडय़ात गजबजलेलं आजोळ होतं. काही तरी बिनसलं. एका चुलीच्या तीन चुली झाल्या. विटांची भिंत बांधून वाडय़ाची विभागणी झाली. जुन्या माळवदाच्या चिरेबंदी वाडय़ात उभ्या राहिलेल्या या भिंती उंची पोशाखावर ठिगळ लावल्यासारख्या दिसू लागल्या. चुलीवरच्या मोठय़ा भांडय़ात एकत्र उकळणारा चहा आता छोटय़ा-छोटय़ा स्वतंत्र भांडय़ात उकळू लागला. एका मोठय़ा रांजणाच्या ऐवजी तीन-तीन माठ स्वतंत्रपणे पाझरू लागले. उघडखांबी ढाळजेत बसून असणाऱ्या मायची (आजी) खोकल्याची उबळ असह्य़ व्हायची. तिला दमा होता. खोकल्याची उबळ आल्यावर तिच्या पोटातली आतडी बाहेर पडतात की काय, असं वाटायचं. आजोबा वारलेले असल्यामुळं तिचे डोक्यावरचे केस काढलेले होते. केस नसलेलं डोकं झाकण्यासाठी माय डोक्यावरचा पदर पुन:पुन्हा नीट करायची. बाकी दिवसभर घोंगडीवर बसून कोरडय़ा नजरेनं वाडय़ाकडं बघत राहायची. वाडय़ाला तीन घरात विभागणाऱ्या भिंतींना आम्ही पोरांनी कधी जुमानलं नाही. आणि त्या भिंती आमच्यासाठी नव्हत्याही. आम्ही आपले सकाळी एका मामाकडं चहा-पोळी खायचो. दुसऱ्याकडं जेवायचो तर तिसऱ्याकडं आंबे माचून खायला बसायचो. झोपायला तर पोरांसाठी लांबसडक ढाळज होतीच. आंघोळीला अंगणातला आड होता. आडाची काही वाटणी झालेली नव्हती. भरलेले पोहरे एकमेकांवर ओतून मस्ती सुरू असे.

बाहेर जाताना मोठा मामा म्हणायचा, ‘‘चल रे, यायचं का मळ्यात?’’ अशी संधी कोण सोडतंय. काळ्याकुळकुळीत डांबरी रस्त्यावर चालत जायचं. मोठा पूल लागला की खाली उतरायचं. मोठय़ा गोल विहिरीचा मळा मला फार आवडायचा. शिवाय या डांबरी रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या एसटी गाडय़ा, ट्रक दिसायचे. त्यामुळे मळ्याकडं पोरांना एकटय़ानं जायची परवानगी नव्हती. म्हणून मामानी विचारल्याबरोबर ‘आलोच’ म्हणत, गडबडीने मी चप्पल शोधायचो. पिसलेल्या पत्त्यासारख्या चपला एकमेकांत मिसळलेल्या असायच्या. त्यातून स्वत:ची चप्पल शोधून पायात घालेपर्यंत मामा वाडय़ाच्या पायऱ्या उतरून पार शिंप्याच्या दुकानापर्यंत गेलेला असे. एरवी गावाकडं चप्पल घातलीच पाहिजे असं नव्हतं. त्यामुळं चप्पल घालून भरभर चालायची सवयही नव्हती. पण बाहेरगावी पाहुण्याकडं गेल्यावर नीट कपडे घालावेत, चप्पल वापरावी, चांगलं वागावं असं आईनं बजावलेलं असे. शिवाय मळ्यात फिरताना काटे पण टोचायचे. पळत-पळत, हाका मारत मामाला गाठायचं. मामासोबत मळ्यात जायचं. वाट्टेल तसं हुंदडायचं. भूक लागल्यावर रसाळ काळसर ऊस खात विहिरीजवळ बसून राहायचं.

कधी संध्याकाळच्या वेळी लहान मामा पोचम्मा देवीच्या दर्शनाला निघालेला असे. तो सोबत देवळात घेऊन जायचा. तिथं दर्शनापेक्षा रेवडय़ा, फुटाणे, चिक्कीचं आकर्षण होतं. या देवीची दरवर्षी मोठी यात्रा असे. दूरदूरच्या गावाहून लोक बैलगाडय़ांतून यायचे. आकाशपाळणा, खेळणी, पुंग्या, पिपाण्या, मिठाई याबरोबरच एक टुरिंग टॉकीज आलेली असे. चारी बाजूंनी कापडी पडदे. वरती मोकळं आभाळ. खाली बसायला वाळू. एका पत्र्याच्या खोलीत मोठमोठी यंत्रं ठेवलेली. त्या जादूई खोलीतल्या खिडकीतून समोरच्या मोठय़ा पडद्यावर प्रकाश सोडला जायचा म्हणे. त्या प्रकाशात पडद्यावर चित्रं पळायची म्हणे. साधारणपणे चाळिसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. हा चित्रांचा ‘पिच्चर’ पाहायला लोकांची प्रचंड गर्दी होत असे. ही टॉकीज मी दिवसाउजेडी खूपदा पाहिलेली होती. पण ‘पिच्चर’ रात्रीच दाखवायचे. दिवसभर मस्ती करून रात्री आठच्या आधीच ढाराढूर झोपणाऱ्या पोरांना ‘पिच्चर’ला कसं नेणार आणि कोण नेणार. या प्रश्नांमुळे मोठा पेच निर्माण झालेला होता. त्यामुळं अधून-मधून त्या टुरिंग टॉकीजचं दिवसाउजेडी दर्शन घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तिथं एक रंगीत पोस्टर लावलेलं असे. पोस्टर पुन:पुन्हा पाहणं, यंत्राच्या खोलीवर लावलेल्या लाउडस्पीकरची गाणी ऐकणं यावरच समाधान मानावं लागायचं. यात्रेनंतरही बरेच दिवस ही टुरिंग टॉकीज सुरू असे. त्या दिवशीही देवळातून मी मामाबरोबर बाहेर आलो. पटांगणात टुरिंग टॉकीजचा पडदा संध्याकाळच्या उतरत्या उन्हात चमकत होता. कुठल्याही परिस्थितीत एकदा ‘पिच्चर’ पाहायचा होताच. सोबत असलेला सर्वात लहान असणारा मामा जरासा भोळसट आणि प्रेमळ होता. म्हणजे जमीन मऊ होती. खोदून पाहायला हरकत नव्हती. बारवेचं दर्शन घेताना मी बोललो, ‘‘मामा, मला एकदा ‘पिच्चर’ पाहायचाय.’’ मामाने चमकून माझ्याकडं पाहिलं. रेवडय़ा, फुटाणे, बत्ताशे, पुंगी, रंगीत चष्मा किंवा आकाशपाळणा यासाठी हट्ट करणं ठीक होतं, पण पोरा-सोरांनी ‘पिच्चर’ पाहणं म्हणजे जरा जास्तच झालं. मामा ‘बरं, बरं’ म्हणाला. अंधारून येत होतं. म्हणून लगबगीने आम्ही घरी पोहोचलो.

माझा ‘पिच्चर’चा प्रस्ताव मामाने साफ धुडकावून लावलेला नव्हता. त्यामुळं ‘पिच्चर’ची आशा सोडलेली नव्हती. ‘बघू या, बरं, बरं’ या शब्दात ठोस कृती किंवा आश्वासन नसलं तरी ठाम नकारही नसतो. त्यामुळं कल्पना कधी तरी वास्तवात उतरेल या भरोशावर दिवस जात असतात. जात होते. गावाकडं परतण्याची वेळ जवळ येत होती. तशात मामाने एक दिवस ‘पिच्चर’ला जाण्याचा प्रस्ताव मांडला. पण त्यासाठी मामाची एक पूर्वअट होती. मी दुपारी निमूटपणे झोपलं पाहिजे. ही त्याची अटही बरोबर होती. म्हणजे एवढय़ा प्रयासानं ‘पिच्चर’ला जायचं आणि तिथं जाऊन झोपी गेलो तर वाईटच. वरती पुन्हा एका ठोळ्या मुलाला कडेवर घेऊन यावं लागणार होतं. हे सर्व कळालं म्हणून नव्हे, पण ‘पिच्चर’साठी काय पण, म्हणून मी दुपारी ढाळजेत चक्क झोपलो. एरवी दुपारी झोपायची फार सवय नव्हती. पण ‘पिच्चर’साठी झोपही लागली. झोपेतून उठून तयार झालो. मामा आणि मी दोघे जणच ‘पिच्चर’ला जाणार होतो. बाकीच्यांना ठेंगा होता. माझा जास्तीचा लाड यापेक्षाही आर्थिक  कारण असण्याची अधिक शक्यता होती. कारण या लहान्या मामाला नोकरी नव्हती. छोटी-मोठी कामं करायचा. शिवाय वाडय़ात खूप माणसं असतात. त्यामुळं कुणाचं कुणावर फारसं लक्ष नसतं. मी तर तिन्ही घरचा पाहुणा होतो. म्हणून या गुप्त योजनेला फार अडसर नव्हता. बिनबोभाटपणे अंधाराच्या साक्षीनं टॉकीजवर येऊन पोहोचलो. एरवी गुंडाळून ठेवलेले पडदे, पसरलेली वाळू, मोठा पडदा, मोकाट फिरणारी कुत्री, रवंथ करणाऱ्या गाई, अशी एकू ण ओसाड दिसणारी टॉकीज रात्री मात्र नव्या नवरीसारखी नटली होती. लाइटच्या झगमगाटात लाउडस्पीकरवर गाणी वाजत होती. गुंडाळलेले पडदे सोडल्यामुळं टॉकीजला गोदामासारखा आकार आलेला होता. बल्बच्या प्रकाशात पोस्टरवरचे भावपूर्ण चेहरे अधिकच उठावदार दिसत होते. छोटय़ा मडक्यातला विस्तव फुंकत खारीमुरीवाला उभा होता. टॉकीजभोवती बैलगाडय़ा सोडलेल्या. अंधारात बैलांचे डोळे चमकत होते. खेडय़ापाडय़ांतून आलेले लोक, पांढऱ्या टोप्या, फेटे गर्दीत उठून दिसत होते. मामानी स्टुलावर बसलेल्या माणसाला काढलेली तिकिटं दिली आणि एकदाचे आम्ही आत घुसलो. आतसुद्धा मामाच्या वाडय़ासारखीच विभागणी झालेली होती. आमचं पन्नास पैशाचं तिकीट असल्यामुळं आम्ही पडद्याच्या जवळ आणि वाळूवर होतो. आमच्या मागे लाकडी कठडा होता. त्यामागचे लोक बेंचावर बसलेले. सगळ्यात मागे काही खुच्र्या होत्या. या खुच्र्याची पायं एकमेकांना दोरीनं बांधलेली होती. सुरुवातीला पडद्याजवळ बसायला मिळणार म्हणून आनंद झाला. पण तिथं लोक येतच गेले. गर्दी वाढतच गेली. खाली वाळूत बसल्यामुळं हालचालही करता येईना. त्यात भर म्हणजे अनेकांनी बिडय़ा पेटवल्या. आमच्या वाळूच्या क्लासमध्ये नुस्ते धुराचे लोट प्रकाशात दिसत होते. त्या धुरामुळं मला ठसकाही लागला. पण या जादूई अनुभवाला सामोरं जाताना कशाचीच पर्वा नव्हती. आज ‘पिच्चर’ पाहायचा होता. एवढय़ा गडबडीत मामा बोलला, ‘‘झोपू नको बरं’’  या वातावरणामुळं मीही उत्साहात होतो. ‘रात्रभरही झोपणार नाही’ असा जास्तीचा शब्द मी मामाला दिला. आता लाउडस्पीकरवरची गाणी थांबली. वायरला लोंबकळणारे पिवळट प्रकाशाचे बल्ब बंद झाले. निर्जीव पडदा जिवंत झाला. प्रकाशमान पडद्यातून आकृत्या जिवंत होऊ लागल्या. याआधी मी डब्यातला चित्र सरकणारा ‘पिच्चर’ पाहिलेला होता. पडद्यावर सरकारी योजनेचं काही तरी आधी दाखवलं. मनात म्हटलं, ‘पहिला डाव देवाला!’ मधेच क्षणभर ‘पिच्चर’ बंद पडून पुन्हा सुरू झाला. बंद पडला की ‘२, ३, ४’ असे इंग्रजी आकडे यायचे. मला वाटलं कितीदा बंद पडला ते मोजत असतील. अर्थात हे महत्त्वाचं नव्हतं. प्रकाशमान जिवंत पडद्यासमोर मी बसलेलो होतो. हेच खरं होतं.

टॉकीजमधल्या सगळ्या लोकांनी श्वास रोखून धरलाय असं वाटत होतं. एकदाचा तो क्षण आला. आणि ‘पिच्चर’ सुरू झाला. पडद्याजवळ असल्यामुळं चित्रं अंगावर येत होती. सुरुवातीला तर एक जीप अंगावर येऊन आपला चुरडा करणार असं वाटलं. पडद्याजवळ बसल्यामुळं पडद्यावरच्या माणसांच्या पायाशी आपण बसलेलो आहोत आणि या माणसांची डोकी आभाळाला लागतायत असं वाटत होतं. काहीही वाटलं तरी हा जादूई अनुभव थोरच होता. शिवाय अजून ‘पिच्चर’ न पाहिलेल्या माझ्या वर्गातील मित्रांना सांगण्यासारखी एक अनोखी घटना माझ्याजवळ होती. कथानक फारसं कळलं नाही. खरं म्हणजे कथानक कळायला मन कुठं थाऱ्यावर होतं. भारावलेली अवस्था होती. दरम्यान पडद्यावर गाणं सुरू झालं. ‘मचलती हुयी हवा की लहरे, हमारे संग संग चले, गंगा की लहरे’ अशा काही ओळी होत्या. त्या दृश्यातलं खळखळ वाहणारं गंगेचं हिरवट पाणी अजूनही माझ्यात ‘सेव्ह’ आहे. मधेच रीळ तुटायची. (हे नंतर कळलं.) मागच्या पत्र्याच्या खोलीत खाटखूट व्हायची. पुन्हा ‘पिच्चर’ सुरू व्हायचा. ‘पिच्चर’ सुरू असतानाच मी मामाला विचारलं, ‘‘पिच्चरचं नाव कायय?’’ मामा पडद्यावरची नजर न हटवता म्हणाला, ‘गंगा की लहरे’. म्हणजे मी ‘गंगा की लहरे’ नावाचा ‘पिच्चर’ पाहत होतो. शाळेतल्यासारखं मध्यंतर झालं. मामानी खारीमुरीचा एक कागदी पुडा आणून दिला. अगदी कपाळावर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात एवढं नाही, पण दूध-भात खाऊन झोपून राहावं तसं शेंगदाण्याचं अंग माफक गरम होतं. ‘पिच्चर’च्या वातावरणात शेंगदाणे नेहमीपेक्षा चवदार लागले. घर येईपर्यंत मी सारखा ‘पिच्चर’बद्दलच बोलत होतो. मामा आपला ‘हं, हं’ करीत होता. विशेष म्हणजे मी टक्क जागा होतो.

नंतर गावी गेल्यावरही या ‘पिच्चर’बद्दल बोलणं सुरूच होतं. एकदा शाळेत मोठय़ा वर्गातला एक मुलगा म्हणाला, ‘‘चांगला गुरुजींचा पोरगा आहेस. ‘पिच्चर’ ‘पिच्चर’ काय म्हणतोस? खरा शब्द ‘पिक्चर’ आहे.’’ त्याचं म्हणणं बरोबरच होतं. कारण आमच्या शाळेत प्रार्थना झाल्यावर इंग्रजीमध्ये फाडफाड प्रतिज्ञा म्हणणारा तो मुलगा होता. भोवताली सगळे जण मात्र ‘पिच्चर’ असंच म्हणत होते; नव्हे आजही ग्रामीण भागात ‘पिच्चर’ असाच उच्चार केला जातो.

पुढं अनेक चित्रपट पाहिले. आज चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीताचा सन्मान म्हणून थिएटरमध्ये आपण उभे राहतो. तेव्हा, पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी चार-चार तास तिकिटाच्या रांगेत उभं राहणं म्हणजेही चित्रपटाबद्दलचा आदर आणि आकर्षणच होतं. प्रसंगी ब्लॅकनं तिकीट घेतलं. चित्रपट पाहण्यासाठी खोटं बोललो. ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाचे सलग तीन शो पाहिले. हिरोच्या केशरचनेचे अनुकरण करीत केस कापले. पडद्यावरची पॅन्ट बघून पॅन्टची बॉटम कमी-जास्त केली. अन्न-पाण्याबरोबरच चित्रपटाची गाणी गुणगुणत मोठा झालो. विशेष म्हणजे ‘पिक्चर’ असा उच्चार करायलाही लागलो. तरीही आभाळाच्या छताखाली, वाळूत बसून पाहिलेला तो ‘पिच्चर’ मनात रुतूनच आहे.

 -dasoovaidya@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व यमक आणि गमक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The picture article of dasu vaidya

ताज्या बातम्या