सिर्फ नामही काफी है।

‘‘हे आमच्या ‘मदर इंडिया’चे हिरो.’’ मी त्यांना खाली वाकून व पायाला हात लावून नमस्कार केला.

कुलवंतसिंग कोहली ksk@pritamhotels.com

त्यांच्या स्वभावाविषयी जेवढय़ा वदंता उठल्या असतील, तेवढय़ा क्वचितच कोणाविषयी निर्माण झाल्या असतील. काही खऱ्या असतील,  काही खोटय़ा. फिल्मी दुनियेत खऱ्या-खोटय़ाचे जे हिशेब असतात, ते पाहणाऱ्याच्या नजरेत असतात; वास्तवात कधीच नसतात. वावडय़ांना येथे तोटा नाही. उलट, ‘त्या जितक्या जास्त, तितका कलाकार लोकप्रिय’ असा काहीसा उफराटा व्यवहार असतो या दुनियेचा. ‘बदनाम हुए, लेकीन नाम तो हुआ..’ असं म्हणत समाधान मानणारे खूप! पण जानी राजकुमार असे नव्हते. त्यांचा खाक्या वेगळा.. हिशेब वेगळा. ‘अपनी धून में रहता हूँ’ अशी त्यांची वृत्ती होती. त्यांचा खर्जातला आवाज एकदा का कानावर पडला की थेटरातला प्रेक्षक कसा उसळत असे, हे मी अनेकदा पाहिलंय. त्यांचे संवाद पाठ असलेले प्रेक्षक पडद्यावरच्या राजकुमारजींच्या सोबत ते संवाद म्हणत असत. गंमत सांगू? मीही ते संवाद मोठय़ानं म्हणत असे.

माझी व त्यांची पहिली भेट घडवली ती सुनील दत्तसाहेब आणि रजिंदरने.. ‘मदर इंडिया’च्या सेटवर. दत्तसाहेब, रजिंदर आणि आमचे अगदी घरगुती संबंध. मेहबूबसाहेबांचंही प्रीतममध्ये येणं-जाणं असायचं. मी माझ्या कुटुंबाला घेऊन ‘मदर इंडिया’च्या सेटवर गेलो होतो. आधी फोन करून कळवलं होतं. याचं कारण- ज्या चित्रपटात तगडी स्टार कास्ट असते, त्या चित्रपटाच्या सेटवर तुम्हाला लगेच प्रवेश मिळत नाही. त्यात माझे संबंध येत ते कलाकारांशी, निर्मात्यांशी. सर्वसामान्य कर्मचारी मला कसा ओळखणार? आम्ही सेटवर पोचलो तर दत्तसाहेब, राजेंद्रकुमार यांनी उठून आमचं स्वागत केलं. त्यांनी माझ्या छोटय़ा मुलाला जवळ घेतलं. मेहबूबसाहेब आले. त्यांना परीपोना केला. हे सारं बाजूला बसून राजकुमार बघत होते. आमचा व त्यांचा काही परिचय नव्हता. पण मी त्यांचे काही चित्रपट पाहिले होते. त्यांच्या प्रभावशाली, दमदार व्यक्तिमत्त्वानं मी भारावून गेलो होतो. त्यांचा पडद्यावरचा वावर पडदा व्यापून टाकणारा होता. रजिंदर मला म्हणाला, ‘‘हे आमच्या ‘मदर इंडिया’चे हिरो.’’ मी त्यांना खाली वाकून व पायाला हात लावून नमस्कार केला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली. रजिंदरला म्हणाले, ‘‘हा माणूस संस्कारशील आहे.’’ जेव्हा त्यांना कळलं, की मी प्रीतम हॉटेलच्या मालकांचा मुलगा आहे, त्यामुळे तर ते अधिकच खूश झाले. बऱ्याचदा ‘मदर इंडिया’च्या सेटवर आमचं जेवण जायचं. मला म्हणाले, ‘‘अरे जानी, आप तो अन्नदाता हो। आओ, बठो हमारे पास.’’ त्यांनी माझ्या पाठीवर जोरदार थाप मारली. ती इतकी जोरदार होती, की माझ्यासारखा धट्टाकट्टा पंजाबी माणूससुद्धा कळवळला.

राजकुमारजींना मी ‘राजजी’ अशी हाक मारत असे. माझ्या आयुष्यात दोन राजजी होते. राज कपूर आणि राजकुमार. दोघेही कधी एकाच वेळी एकत्र भेटले नाहीत. त्यामुळे माझी पंचाईत झाली नाही. आमचा परिचय जरी ‘मदर इंडिया’च्या वेळी झाला असला तरीही त्यांची माझी गट्टी जमली ती ‘पाकिज़ा’पासून. याचं एक कारण होतं- आमच्यातलं वयाचं अंतर! ते माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठे होते. ‘पाकिज़ा’चे ते हिरो होते. त्या काळात ‘पाकिज़ा’च्या सेटवर मी दररोज जात असे. कमालजींनी मीनाजींसमोर त्यांना कास्ट केलं होतं याचं मुख्य कारण होतं- कमीत कमी सीन्समध्ये ते आपली छाप पाडतील. ती भूमिका एका फॉरेस्ट ऑफिसरची होती. राजजी मुळात अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारे असल्याने एकदम तंदुरुस्त होते. शिवाय ते पूर्वी मुंबई पोलिसांत सब-इन्स्पेक्टर होते. परिणामी त्यांच्या साध्या चालण्यातही अधिकारी रुबाब दिसायचा.

एकदा मजाच झाली. ‘पाकिज़ा’चं शूटिंग चालू होतं. कमालजी राजजी व मीनाजींना एक प्रसंग समजावून सांगत होते. आपल्या मनातली हळुवार प्रेमभावना राजजी व्यक्त करतात. पण ती व्यक्त करताना कमालजींना राजजींचा मीनाजींना कोणताही स्पर्श होणं अपेक्षित नव्हतं. ते म्हणाले, ‘‘राज, या प्रेमप्रसंगात तुम्ही दोघं आहात. पण तू मीनाला मिठी मारू नकोस. साधा स्पर्शही करू नकोस. तुझ्या फक्त डोळ्यांतून ते प्रेम दिसू दे. स्पर्श न करताही प्रेमाची अभिव्यक्ती करता येते हे त्यातून दाखवायचं आहे. शिवाय, तू एक फॉरेस्ट ऑफिसर आहेस आणि मीना एक गणिका आहे. पहिल्या भेटीच्या वेळी हे अंतर तर दिसलं पाहिजे आणि प्रेमातली कोवळी लवलवही दिसली पाहिजे.’’ असं सारं समजावून सांगितल्यावर ‘‘चला, आता टेक घेऊ या..’’ असं म्हणून कमालजींनी शूटिंग सुरू केलं. मी बाजूला बसून पाहत होतो.

प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी राजजींनी शॉट संपवताना मीनाजींच्या खांद्यावर डोकं ठेवलं. कमालजींनी ‘कट्’ म्हटलं. पुन्हा शॉट घ्यायला सुरुवात. शॉट संपवताना राजजींनी मीनाजींच्या खांद्यावर हात ठेवला. कमालजींनी पुन्हा ‘कट्’ म्हटलं. राजजींना तो शॉट व त्यामागची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितली. तिसऱ्यांदाही शॉट संपताना राजजींनी मीनाजींना स्पर्श केलाच. असं आणखीन तीन-चारदा घडलं. मग मात्र कमालजींचा संयम संपला. ‘‘मी तुला आंतरिक भावना व्यक्त करायला सांगतोय आणि तू नेमकं उलटं करतोयस.’’

‘‘कमालसाब, हा शॉट मी देतोय.. मी! मी राजकुमार! मी हिरो आहे. आणि मी प्रेयसीला स्पर्शही करायचा नाही, असं चालेल का? तुमचं चुकतंय. मला जसं वाटेल तसाच मी शॉट देणार. बघा, केवढी इंटिमसी मी त्यात दिलीय.’’ कमालजींनी पुन्हा एकदा त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण रामा.. शिवा.. गोिवदा! राजजींनी पुन्हा तसंच केलं. कमालजींनी पुन्हा तो ‘कट्’ केला आणि मग मात्र त्यांच्यावर ते बरसलेच. ‘‘दिग्दर्शक मी आहे की तू? तुला कळतं की मला जास्त कळतं?’’ राजजींनी मीनाजींकडेही न पाहता पाठ फिरवली आणि सेटवरून ते सरळ बाहेर पडले. ‘‘राजजी, राजजी..’’ असं मीनाकुमारीजी त्यांना हाक मारत पाठोपाठ धावल्या. पण राजजी ताडताड निघून गेले. बाहेर त्यांची शेवरलेट गाडी होती. ती स्वत:च सुरू केली आणि ते गेलेही! आमच्याकडे हरी जयसिंघानी होते, ते राजजींच्या मागोमाग त्यांच्या घरी गेले. राजजींनी त्यांना तीन तास काय काय ऐकवलं. इकडे सारा सेट खोळंबला होता. तासातासागणिक खर्चाचा आकडा वाढत होता. पण करणार काय? हरी नकारघंटा घेऊन परत आले. कमालजींनी माझ्याकडे पाहिलं. मला म्हणाले, ‘‘चूक झाली याला घेऊन! आता आठेक दिवसांचं शूटिंगही झालंय. राजच या भूमिकेला न्याय देईल असं मला वाटत होतं. कुलवंत, तू त्याच्याकडे जाऊन जरा त्याची समजूत काढ. माझं म्हणणं त्याला समजावून सांग.’’

मी या व्यवसायात नवा. आमचे संबंध ‘प्रीतम’च्या पातळीवरचे. या प्रसंगात मी काय करणार? पण कमालसाहेबांसारख्या माणसानं विनंती केली तर ती पाळायला हवी. मी राजजींच्या सेक्रेटरीला फोन केला व विचारलं की, ‘‘मी राजजींना भेटायला घरी येऊ का?’’ हे हिरो लोक स्वत: कधी फोन घेत नाहीत. त्यांच्या सेक्रेटरीशी आधी बोलावं लागतं. सेक्रेटरीने राजजींना विचारलं. त्यांचा होकार आला. म्हणाले, ‘‘कधीही ये.’’ मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, ‘‘राजजी, कल जो हुआ, वो ठीक नहीं हुआ। आपने ज्यादती की। तुम्ही मोठे अभिनेते आहात आणि मीनाजीही तेवढय़ाच तोलामोलाच्या अभिनेत्री आहेत. त्या तुमच्या मागे धावत आल्या, पण तुम्ही त्यांच्याकडेही पाहिलं नाही. हे बरोबर आहे का? तुम्हीच सांगा.’’ राजजी- ‘‘कुलवंत, जानी, मी हिरो आहे. आणि मला कळतं ना, मी काय केलं की ते चांगलं दिसेल. मी हा चित्रपट घेतला हीच मोठी चूक झाली. कितीतरी वर्ष हा चित्रपट रखडतोय. पण मी तो करतोय ना! मग माझं ऐकायला काय जातं?’’

‘‘राजजी, एक सांगू? तुम्ही म्हणताय ना, की तुमची चूक झाली. कमालसाहेबही तेच म्हणताहेत, की राजकुमारजींना घेऊन चूक झाली.’’ राजकुमारजींनी माझ्याकडे चमकून बघितलं. मी त्यांच्याकडे स्थिर नजरेनं पाहत होतो. आपल्याला कमालजींसारखा तोडीस तोड भेटलाय हे त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांच्या नजरेतून जाणवलं, की ज्वालामुखी आता शांत होतोय. ‘‘राजजी, कमालसाहेबही बुजूर्ग आहेत. तुम्हीही महान आहात. तुमच्यापुढे सारे कमी पडतील. पण आपण कमालसाहेबांचा सन्मान केला पाहिजे ना! मीनाजींना मान दिला पाहिजे ना!’’ असं काहीबाही बोलत राहिलो. थोडय़ा वेळानं राजजी म्हणाले, ‘‘कुलवंत जानी, कल सुबह ग्यारह बजे हम सेटपर आते हैं। कमालसाहेबांना तयारी ठेवायला सांग.’’ मी कमालजींकडे गेलो व त्यांना सांगितलं, राजकुमारजी येत आहेत. त्यांचा विश्वास बसला नाही. पण म्हणाले, ‘‘बघ कुलवंत, राजकुमार आला नाही तर सारा खर्च वाया जाईल.’’ मी म्हणालो, ‘‘विश्वास ठेवा. येतील ते.’’ आणि खरंच, अकराच्या ठोक्याला राजकुमारजी आले. हसत हसत त्यांनी कमालजींना चरणस्पर्श केला. ‘‘चलिये, कमालसाहब, तुम्हाला जसा शॉट घ्यायचाय तसा घ्या.’’ मीनाजींना त्यांनी ‘विश’ केलं. माझ्याकडे पाहून हसले आणि बहारदार शॉट दिला. एका टेकमध्ये शॉट ओके.

राजकुमारजींना फारसे मित्र नव्हते. पण तरीही अवतीभवती काही जण असायचेच. त्यांच्या गोतावळ्यात ते बसत असत. त्यांच्या घरी कोणीही जात नसे. जुहूला ‘जानकी कुटीर’च्या जवळ त्यांचा छोटासा बंगला होता. त्यांच्या घरात चित्रपट क्षेत्रातील लोकांना प्रवेश नव्हता. पण मला ते आवर्जून बोलावत. त्यांचा संपूर्ण दिवस आखीवरेखीव असे. ते संध्याकाळी सहा वाजता काम थांबवत. घरी जाऊन शांतपणे त्यांच्या घराच्या गच्चीत त्यांच्या आवडत्या ‘समिथग स्पेशल’ या मद्याचे घुटके घेत बसत. त्यावेळी ते मला बोलावत असत. मला शक्य असेल तेव्हा मी जाई व त्यांच्यासोबत एखादं थंड पेय पीत बसे व गप्पा मारत असे. त्यांच्याकडे अनेकदा जाऊनही मी त्यांच्या पत्नीला कधीही भेटलो नव्हतो वा पाहिलंही नव्हतं. त्यांना पहिला मुलगा झाला तेव्हा त्यांनी फक्त मित्रांना एक छोटीशी पार्टी दिली. त्या पार्टीला मी माझ्या पत्नीसह गेलो होतो. त्यावेळी मी त्यांच्या पत्नीला- गायत्रीदेवींना पहिल्यांदा भेटलो. त्या अत्यंत देखण्या होत्या. राजजींना मी नंतर विचारलं, ‘‘राजजी, तुम्ही कधीही गायत्रीदेवींना घेऊन पाटर्य़ाना जात नाही. असं का? त्या बोअर होत असतील घरात.’’ राजजी उत्तरले, ‘‘कुलवंत, चित्रपट हे माझं कामाचं ठिकाण आहे. कामाच्या ठिकाणी कोणी आपल्या पत्नीला किंवा मुलांना घेऊन जातं का? मी ही इंडस्ट्री जाणतो. या चकाचौंधपासून त्यांनी दूर राहणंच योग्य आहे.’’ राजजींची भूमिका मला पटली. मग, ‘समिथग स्पेशल’चे घुटके घेत ते म्हणाले, ‘‘कुलवंत, गायत्री ही मला विमानात भेटली. ती एअर होस्टेस होती. मला आवडली. मी तिला मागणी घातली. आमचं प्रेम जुळलं आणि आता संसार नीट सुरू आहे. माझ्या घरी कोणीही फिल्मी माणसं येता कामा नयेत, याची मी काळजी घेतो.’’ आणि खरंच तसं होतं. त्यांच्या घराला पुढच्या बाजूला दोन दरवाजे होते. त्यांच्याकडे दरवाजावरची बेल दाबल्यावर घरातला एखादा कर्मचारी येई, आतला दरवाजा उघडे. ‘‘कोण हवंय?’’ ‘‘साब है?’’ ‘‘नाही, ते घरात नाहीत.’’ ‘‘मेमसाब है?’’ ‘‘नहीं, वो भी बाहर गयी है..’’ असलं उत्तर त्यांना मिळे. राजजी शिस्तबद्ध होते. दर रविवारी ते गोल्फ खेळायला जात. रेस वगैरेचा शौक त्यांना नव्हता. ते तसे घरेलू होते. बायको, मुलांत रमत असत. ते व्यावहारिक होते. इतर नटांसारखं त्यांचं नव्हतं. त्यांनी पशांची व्यवस्थित गुंतवणूक केली होती. त्यांच्याशी बोलत असताना जाणवायचं, की त्यांना स्टॉक मार्केटची छान माहिती आहे.

राजकुमारजींबरोबरच्या गप्पांतून एक समृद्ध व्यक्तिमत्त्व आपल्याशी बोलतंय हे जाणवायचं. त्यांचं खरं नाव- कुलभूषण पंडित. त्यांचा जन्म एकात्म भारतातल्या बलुचिस्तानमधला. पंडित घराण्यातले असल्याने त्यांच्यावर संस्कृत, हिंदी वाङ्मयाचे उत्तम संस्कार होते. इंग्रजी वाङ्मयही त्यांना माहिती होतं. ते सेटवर वेळ वाया घालवत नसत. शांतपणे वाचत बसत. चकाटय़ा पिटत बसण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. उंचेपुरे  राजकुमारजी म्हणत, ‘‘मी बलुची आहे आणि पंडितही!’’

राजजींच्या स्वभावाचा एक किस्सा आहे. ‘पाकिज़ा’ मुंबईत रिलीज झाला. नंतर त्याचा प्रीमिअर शो दिल्लीत होता. मिश्रा म्हणून एक डिस्ट्रिब्युटर होते. शो झाल्यावर त्यांनी आम्हाला पार्टी दिली. कमालसाहेब, मीनाजी, राजकुमारजी, माझे भागीदार- धीरू, जीत व मी एवढेच होतो. मिश्रांनी ‘रॉयल सॅल्यूट’ ही महागडी व्हिस्की पार्टीत ठेवली होती. याखेरीज त्याने रॉयल सॅल्यूटच्या एका पॅकेटमध्ये दोन-दोन बाटल्या घालून ते पॅकेट गुपचूप आमच्या गाडय़ांमध्ये ठेवलं. आम्ही अशोका हॉटेलमध्ये परतलो. राजकुमारजींची गाडी पुढे. त्यांच्या मागे कमालजी व मीनाजी. त्यांच्या मागे आम्ही. उतरताना राजजींचा चढलेला आवाज ऐकला. मी पुढे गेलो, तर राजजी ड्रायव्हरला विचारत होते, ‘‘तुला या बाटल्या कोणी दिल्या?’’ ‘‘साब, त्या मिश्रांच्या माणसाने आणून दिल्या.’’ ‘‘कौन मिश्रा? हम नहीं जानते.’’ माझ्याकडे वळून राजजींनी विचारणा केली, ‘‘कुलवंत जानी, ये कौन है भाई, खुद को क्या समझता है? डिस्ट्रिब्युटर है तो क्या उसने हिरो को खरीद रखा है क्या? मला तू एक दहा रुपयांचं पेन दे, पण माझ्या हातात दे. मी आनंदानं घेईन. पण हे काय, चोरासारखं माझ्या गाडीत व्हिस्कीच्या बाटल्या पाठवतो हा?’’ ड्रायव्हरला ते पुढे म्हणाले, ‘‘माझ्याबरोबर वर चल. कमालजी, कुलवंत, आप भी चलिये।’’ आम्ही निमूट त्यांच्यामागे गेलो. राजजींनी त्यांच्याजवळच्या ‘समिथग स्पेशल’च्या दोन बाटल्या काढल्या व मिश्रांनी दिलेल्या पॅकेटमध्ये त्या ठेवल्या. ड्रायव्हरला ते म्हणाले, ‘‘या घेऊन मिश्राकडे जा. त्याला म्हणावं, राजकुमारनं हे रिटर्न गिफ्ट पाठवलंय. जर त्यानं हे पॅकेट घ्यायला नकार दिला, तर तू या बाटल्या सरळ त्याच्यासमोर तिथंच फोडून टाक. कळलं?’’ तो बिचारा ड्रायव्हर गेला. पण मिश्राजींना राजकुमारजींच्या स्वभावाची कल्पना असल्यानं त्यांनी ते पॅकेट ठेवून घेतलं व नंतर दुसऱ्या दिवशी राजजींना ते प्रत्यक्षच भेटले.

मात्र, राजजी आपले मत्रीचे संबंध नीट जपून ठेवत असत. त्यांच्यासाठी ते काहीही करत. माझी पन्नाशी उलटली आणि काही दिवसांनी मला हृदयविकाराचा झटका आला. (१९८५) त्यावेळी आपल्याकडे फारशा सुविधा नव्हत्या. म्हणून अमेरिकेतून उपचार घेऊन आलो. विश्रांती घेत पडलो होतो घरात. आणि जिन्यातूनच जोरदार आवाज आला- ‘‘जानी, कुलवंत, तू कैसे बीमार पड गया रे? हम हमेशा बोलते थे, की इंडस्ट्री में दो लोग ही हट्टेकट्टे है। पहले हम और दुसरे तुम।’’ राजकुमारना हृदयविकाराचं कळलं तेव्हा ते थेट आमच्या घरी तीन जिने चढून आले. सोबत त्यांचा सेक्रेटरी मिहदर आला होता. कळ मला आली, पण ते कळवळले होते. नंतर तीन-चारदा तरी ते घरी आले- फक्त माझी विचारपूस करायला.

त्यांचा स्वभाव हे त्यांनी स्वत:भोवती निर्माण केलेलं एक आवरण होतं. दुनियेपासून स्वत:ला अलिप्त ठेवायला त्यांनी निर्माण केलेली ती एक स्वयंनिर्मित सुरक्षा यंत्रणा होती. मोती कसा स्वत:ला टणक शिंपल्याच्या आत दडवून ठेवतो, तशी!

शब्दांकन : नीतिन आरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ये है मुंबई मेरी जान! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about bollywood actor raaj kumar