कुलवंतसिंग कोहली  ksk@pritamhotels.com

‘‘कुलवंत, एक छान गायक आलाय. मी त्याला हेमंतदांकडे ऐकलाय.’’

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

‘‘क्या कहूँ कुलवंतजी, बस ऐसेही मुंबई चला आया, न जेब में फुटी कौडी थी, ना हाथ पर कोई लकीर.’’

‘‘अरे, तू म्हणतोस त्याला गायला दे; इथं आधी मलाच माझे वांदे झालेले दिसतात न् तू हे सांग!’’

‘‘काहीच हातात नव्हतं. होते नव्हते तेवढे पैसे कधीच उडाले. घरमालकानं हाकलून दिलं. मग, बसलो लोकल ट्रेनमध्ये. ती जाऊन थांबली तिथं उतरलो. गोरेगाव स्टेशन होतं. लोकलच्या बाहेर आलो. समोर बाकडं दिसलं, तिथंच झोपलो.’’

‘‘तो छान गातो. हेमंतदांचं बरंचसं काम तोच सांभाळतो. मला शक्य होईल तर मी त्याला माझा सिनेमा देईन.’’

‘‘सकाळी उठलो तो एका पोलिसानं कुशीत खुपसलेल्या काठीच्या धक्क्यानं. उठलो धडपडत, निघालो तिथून. समोरच्या लोकलमध्ये चढलो. उतरलो चर्चगेटला. रस्ता फुटेल तसा निघालो.’’

‘‘देणार! कुलवंत, मी त्याला सिनेमा देणार! तू शब्द टाकलास ना आज माझ्याकडे, उद्या मी नक्की शब्द पाळणार!’’

‘‘चालत चालत निघालो. तर समोर एक मार्केट. कोणीतरी सांगितलं, हे मूळजी जेठा मार्केट! खिशात काही नव्हतं, मनात गाणं आणि पोटात भूक. जर जगायचं तर आज काहीतरी करायला हवं.’’

‘‘रवीशंकर शर्मा, मी माझा नवा सिनेमा सुरू करतोय.. ‘वचन’ नावाचा. तू संगीत देशील का?’’

‘‘माझ्या खिशात टेस्टर होता. समोर एक इलेक्ट्रिकल्सचं दुकान होतं. मी त्याला म्हणालो, मला काहीही काम द्या. मला पंखे दुरुस्त करता येतात, विजेच्या माळा जोडता येतात. हां, हा पंखा साफ करतो.. चालेल आठ आणे द्या. पण द्या.’’

‘‘हां देवेंद्रजी, मैं म्युझिक जरूर करुंगा ‘वचन’ का. सिर्फ हेमंतदा को पुछना पडेगा.’’

– मेरे हमराज, मेरे दोस्त रवीजी, जब भी कभी आपकी याद आयी, बस् हाच संवादांचा कोलाज माझ्या मनात चालू होतो. कहाँ थे आप और कहा पहुँचे! वाटतं, आता कुठूनतरी आमच्या ‘प्रीतम’मध्ये याल आणि सांगाल, ‘‘कुलवंतजी, हे गाणं ऐका. मजा येईल.’’ मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो, ‘‘रवीजी, मला संगीतातलं काही कळत नाही.’’ परंतु तुम्ही ते कधीच ऐकलं नाही. मला नव्या नव्या चाली ऐकवतच राहिलात. वर हसून सांगत राहिलात, ‘‘म्हणून तर तुम्हाला नवी गाणी ऐकवतो कुलवंतजी! तुम्हाला गाणं आवडलं, म्हणजे सगळ्यांना नक्की आवडेल!’’

रवीजी, आमचे ज्येष्ठ स्नेही, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक देवेंद्र गोयल यांनी तुमच्याबद्दल प्रथम आम्हाला सांगितलं. तुम्ही तेव्हा मुंबईत स्ट्रगल करत होता. त्यांनी तुम्हाला सचिनदेव बर्मन यांच्या ‘नौजवान’मध्ये एका गीतात कोरस देताना ऐकलं. तुमच्या आवाजातला स्पार्क आणि दमदारपणा त्यांना आवडला. तुमचा आवाज सर्वांपैकी एक होता आणि तो तुमचा स्वत:चाही होता, असं ते मला म्हणाले. देवेंद्रजी माझ्यापेक्षा खूप मोठे होते. परंतु त्यांची माया होती माझ्यावर, आमच्या ‘प्रीतम’वर! दिवसाआड एक चक्कर मारायची, माझ्या पापाजींबरोबर एखादा पेग घ्यायचा आणि घरी जायचं असा त्यांचा शिरस्ता होता. सिनेसृष्टीबद्दल माझ्या मनातलं प्रेम पाहून ते नेहमी माझ्यासोबत गप्पा मारत असत. त्यामुळे दिवसभरातल्या घडामोडी ते सांगत. त्यातच ‘रवीशंकर शर्मा’ या नावाचा पहिला उल्लेख आला. तोच तुमचा पहिला परिचय. ते एक दिवस सांगत आले, ‘‘आज हेमंतजींच्या गाण्याच्या रेकॉर्डिगला गेलो होतो, तेव्हा मी रवीशंकर शर्माला रेकॉर्डिगचा बराचसा भार सांभाळताना पाहिलं. कुलवंत, या पोराला कुणीतरी संधी द्यायला हवी.’’ रवीजी, मीच तेव्हा त्यांना म्हणालो होतो, ‘‘देवेंद्रजी, दुसऱ्या कोणी तरी कशाला, तुम्ही सिनेमा बनवाल तेव्हा तुम्हीच त्यांना संधी द्या.’’ तर ते मला विषादाने म्हणाले, ‘‘मैं खुद यहाँ वहाँ भटक रहा हूँ। स्वत:ला सिद्ध करायला धडपडतोय. बघू, उद्या मला संधी मिळाली, तर मी नक्की त्याला माझ्या एका चित्रपटाचा संगीतकार करीन.’’

.. आणि देवेंद्र गोयलजींना जेव्हा स्वत:चा चित्रपट काढायची संधी मिळाली तेव्हा त्यांनी तुम्हाला गाठलं आणि तसा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला. जाण्यापूर्वी ते ‘प्रीतम’मध्ये आले व मला सांगून गेले, ‘‘मी रवीला घेऊन ‘प्रीतम’मध्ये येतोय. मला अडचण आली, तर तू त्याला पटवायला मला मदत कर.’’ ते तुम्हाला घेऊन ‘प्रीतम’मध्ये आले. माझ्यासमोरच त्यांनी तुम्हाला विचारणा केली. तर तुम्ही त्यांना म्हणालात, ‘‘मला नऊ वाद्य् वाजवता येतात, काही राग माहिती आहेत. पण मी शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. मी हेमंतजींचा साहाय्यक आहे. त्यांनी मला जगायची संधी दिलीय. मला त्यांना विचारावं लागेल.’’ मग तुम्ही हेमंतकुमारांना सांगितलंत आणि त्या उदारमनस्क सहृदय संगीतकारानं तुम्हाला स्वतंत्र काम करायला परवानगी दिली. तुम्ही हेमंतदांना न सोडता देवेंद्रजींचा ‘वचन’ केलात. ‘वचन’नं तुम्हाला खूप नाव दिलं, पसा दिला. परंतु तुम्ही हेमंतदांसमोरील आपलं धाकुटपण सांभाळलंत. हळुवारपणे तुम्ही त्यांच्यापासून अलग झालात. ज्या काळात सज्जाद हुसेन, नौशादजी, एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, ओ. पी. नय्यर, चित्रगुप्त, मदनमोहन, रोशन आपली अफलातून कामगिरी बजावत होते, त्याच काळात तुम्ही स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण करून आपलं स्थान अधोरेखित केलंत. मोठं नाव तुम्ही दक्षिणेतल्या चित्रपटांचं संगीत करून मिळवलंत. देवेंद्रजी, बी. आर. चोप्राजी अशांसारख्यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांचं संगीत तुम्ही दिलंत. ‘निकाह’सारख्या मुस्लीम पाश्र्वभूमीवरील चित्रपटाचं संगीत तुम्ही कसं देऊ शकणार, असा प्रश्न विचारल्यावर, त्याचं उत्तर बी. आर. चोप्रांनी तुम्हाला संगीतकार म्हणून नियुक्त करून दिलं. तो विश्वास तुम्ही जबरदस्त संगीत देऊन सार्थ ठरवलात. रवीजी, तुम्ही नेहमी सांगायचात की, ‘‘मी माझ्या संगीतात भारतीय वाद्यांचा सर्वाधिक वापर करतो. पाश्चात्त्य वाद्य्ो फारशी वापरत नाही, जवळ जवळ नाहीच!’’ म्हणूनच तुमच्या संगीताचा तोंडवळा भारतीय राहिला.

रवीजी, ‘वचन’नं मुंबईतील चित्रपट जगतात एका नव्या संगीतकाराचा उदय झाला. त्या चित्रपटात तर तुम्ही तिहेरी कामगिरी बजावलीत. आज सहा दशकांनंतरही रसिकांच्या मनात राहणारं ‘चंदामामा दूर के’ किंवा ‘एक पसा दे दे बाबू’सारखं गाणं तुम्ही लिहिलंत, आशा भोसलेंबरोबर एक युगुल गीत गायलात आणि संगीतही दिलंत. तुमच्याकडे कविमन होतं, म्हणूनच तुम्ही संगीत देताना गीतकाराच्या आणि ज्या पात्रांवर ते चित्रित होणार आहे त्यांच्या भावनांना समजून घेऊ शकत होता. तुमचं हे अनेकांगी व्यक्तिमत्त्व तुम्हाला सर्वापेक्षा वेगळं ठरवून गेलं. विख्यात संगीत दिग्दर्शक खय्यामजी एकदा गप्पा मारताना म्हणाले होते, ‘‘रवीजी का बड़ा साफ़ सुथरा और सादगीभरा काम। हमारे मनपसंद संगीतकार है वह।’’ एका संगीतकारानं दुसऱ्या संगीतकाराचं कौतुक करण्याचे फार कमी क्षण असतात. तो क्षण तुमच्या वाटय़ाला आला होता.

‘वचन’नंतर तुम्हाला मोठी संधी मिळाली ती पाच वर्षांनी. तुम्ही त्या काळात तसं पाहिलं तर दुय्यम दर्जाचे अनेक सिनेमे केलेत. त्यांना यश मिळालं नाही. परंतु एक दिवस दस्तुरखुद्द गुरुदत्त यांच्या ‘चौदहवीं का चाँद’ चित्रपटाला संगीत देण्याची ऑफर तुमच्याकडे आली. ती बातमी सांगताना आनंदानं फुललेला तुमचा चेहरा माझ्या लक्षात आहे. स्वत:तील स्वप्नाळू कलाकाराचा पराभव झाल्याचं शल्य मनात ठेवून गुरुदत्त जगत होता. ‘चौदहवीं का चाँद’मधलं शीर्षक गीत खूप लोकप्रिय झालं. त्याची जन्मकथा तुम्ही सांगितली होती. एका सीटिंगमधून परतताना तुम्हाला आकाशात चतुर्दशीचा चंद्रमा दिसला. तो बघून तुमच्या मनात गुरुदत्त व राज खोसलानं सांगितलेला प्रसंग जागा झाला- रूपसुंदरी वहीदा रेहमान शांतपणे निजलेली आहे आणि तिच्यावर प्रेम करणारा गुरुदत्त तिच्याकडे पाहतो आहे. त्या वेळी त्याच्या मनात कोणते विचार येतील आणि ते आपण आपल्या संगीतरचनेतून कसे मांडू शकू, याचा तुम्ही विचार करत होता. त्याबद्दल तुम्ही सांगितलंत, ‘‘मी एका गाडीतून घरी परतत होतो. आकाशात चतुर्दशीच्या चंद्राचा उदय झालेला बघून माझ्या मनात एक ओळ जागी झाली- ‘चौदहवीं का चाँद हो तुम..’! पुढची ओळ मला लिहिता येत नव्हती. मी सरळ शकील बदायुनीला फोन केला. शकील आला. मी त्याला माझ्या मनात घोळत असलेली कल्पना सांगितली. त्यानं पुढच्या क्षणी ओळ सांगितली- ‘या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो’! बस्स दस मिनट में गाना तय्यार  हो गया!’’

दुसऱ्या दिवशी तुम्ही ते गाणं त्यांना ऐकवलं आणि तुमचा पुढचा प्रवास सुरू झाला. सफलता की नयी नयी बुलंदियाँ आप हासील करते गये, रवीजी! आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्या सोबत असतो. आमच्या मुलांसाठी आम्ही ‘चल मेरे घोडे टिकऽ टिकऽ टिकऽ’ करतो.. आम्ही प्रेमात पडलो की- ‘तुम अगर साथ देने का वादा करो’ असं वचन मागतो.. तिला ‘ये परदा हटा लो’ म्हणतो.. आमचा प्रेमभंग झाला, की आमच्या मनात सुरू होतं- ‘दिल के अरमान आंसूओं में बह गये’! आमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग तुमच्यामुळे संस्मरणीय बनतो.

रवीजी, आठवतंय तुम्हाला? तुम्ही एकदा मला म्हणाला होता, ‘‘मी मुंबईत आलो तो दिल्लीतून. खिशात एक फुटकी कवडी नव्हती. पण मला गायक व्हायचं होतं. वडिलांनी दहावीनंतर मला इलेक्ट्रिशिअनचा कोर्स शिकवला, की ज्यामुळे मी या जगात थोडेफार पैसे कमावू शकेन. वडिलांनी माझं लग्न लावून दिलं, दोन मुलीही झाल्या. नंतर मी दिल्लीत ‘पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राफ’मध्ये पाच वर्षे नोकरी केली. पण गाण्याची आवड मला शांत बसू देई ना. मग एक दिवस ठरवलं, पत्नीला विश्वासात घेतलं. तिला म्हणालो, ‘मुंबईत जातो, थोडी धडपड करतो. जरा स्थिरस्थावर झालं, की तुम्हाला घेऊन जातो.’ अन् मुंबईत आलो. हिराबाग धर्मशाळेत राहिलो. त्यांचे अगदी नाममात्र भाडय़ाचे पैसेही देऊ शकलो नाही. शेवटी तिथून बाहेर पडावं लागलं. गोरेगाव, मालाडसारख्या त्या वेळी दूर वाटणाऱ्या स्टेशनांच्या बाकडय़ांवर रात्री काढल्या. त्या वेळी उत्तररात्री ग्रँट रोड स्टेशनाबाहेरच्या बेकरीत शिल्लक राहिलेले पाव वा छोटे केकचे तुकडे अगदी कमी पशांत विकत असत, ते घेऊन खायचं, स्टेशनवरच्या नळाचं पाणी प्यायचं. खिशात सकाळी खाण्यासाठी पावाचे किंवा केकचे तुकडे ठेवून द्यायचे आणि स्टेशनवर झोपून जायचं, हा माझा शिरस्ता होता. हेही दिवस गेले ते हेमंतकुमार यांच्यामुळे. त्यांनी ‘आनंदमठ’मधल्या ‘वंदे मारतम्’ या अजरामर गाण्याच्या कोरसमध्ये गाताना पाहिलं. मला बाजूला बोलावलं. माझा आवाज ऐकला, माझी कहाणी समजून घेतली व मला म्हणाले, ‘तू आजपासून माझ्याकडे येत जा. मी तुला महिन्याला शंभर रुपये देईन. तू माझी संगीताशी संबंधित पडतील ती कामे कर.’ एका जातिवंत सहृदय कलाकारालाच दुसऱ्याची कदर असते. हेमंतदांना ती होती. त्यांच्याकडे काम मिळाल्यानं मला काहीशी स्थिरता लाभली. मग मी पत्नीला व मुलींना मुंबईत आणलं. हेमंतदा मेरे माता-पिता बने यहाँ! मी त्यांच्याकडे कितीतरी चित्रपटांसाठी साहाय्यक म्हणून काम केलं. श्रेयनामावलीत कधी नाव आलं, कधी नाही आलं. ‘शर्त’, ‘सम्राट’, ‘नागीन’, ‘चंपाकली’ असे कितीतरी चित्रपट झाले. कुलवंतजी, तुम्हाला माहितीय- ‘नागीन’मधली ‘मन डोले, मेरा तन डोले’ या गाण्यात वाजलेली बीनची ती आयकॉनिक ठरलेली भन्नाट धून मी बांधलीय! हेमंतदांनी चाल तयार केल्यावर, तिच्यात भर घालताना मला ती सुचली. खरं म्हणजे ‘मेरा दिल ये पुकारे आजा’मधला एक तुकडा आहे, त्याचं सालंकृत रूप म्हणजे ती बीनची धून! कल्याणजी-आनंदजींमधल्या कल्याणजींनी ती धून वाजवलीय.’’

रवीजी, तुमचं नशीब आमच्या ‘प्रीतम’मध्ये उघडलं हे तुम्ही कायम लक्षात ठेवलंत. तुम्ही मोठे झालात, नावलौकिक कमावलात; परंतु कधीही ‘प्रीतम’मधलं येणं-जाणं थांबवलं नाही. तुमचं उंचंपुरं व्यक्तिमत्त्व, रुंद-बळकट बांधा, अतिशय मृदू आवाजात बोलणं, दुसऱ्याला संपूर्ण सन्मान देऊन त्याच्याशी अत्यंत आदरानं वागणं हे सारं मला भारून टाकायचं. तुम्हाला कसलाही अहंकार नव्हता. चित्रपट उद्योगातील लोकांत असतो, त्याप्रमाणे ग्लॅमरस छानछौकीचा तुमचा स्वभाव नव्हता. स्वत:चं प्रवाहीपण न सोडता पाणी कसं सगळ्यांचा रंग त्यात मिसळून जाऊन धारण करतं, तसंच तुमचं होतं. सर्वाना मदत करताना तुम्ही स्वत:तला संवेदनशील कलाकार जिवंत ठेवलात. तुमची व माझी दोस्ती, खरं म्हणजे तुमच्या ‘वचन’पूर्वीच बनली होती. तुम्हाला भेटल्यावर एका दिलखुलास माणसाला भेटल्याचा आनंद आम्हाला मिळाला होता. तेव्हा नुकतीच ‘पंजाबी असोसिएशन’ सुरू झाली होती. मीही त्यात थोडंफार काम करू लागलो होतो. देवेंद्रजी गोयलना मी विनंती केली की, ‘आपण रवीजींना बसाखीच्या कार्यक्रमात मदत करायला सांगू या का? त्यांना मदतही होईल आणि आपलं कामही होईल.’ आम्ही बसाखीच्या कार्यक्रमात पंजाबातून कलाकार निवडून मुंबईत बोलावत असू आणि त्यांना संधी देत असू. हे पंजाबी कलाकार तगडे होते, परंतु मुंबईत कला सादर करताना त्यांना तयार करून घ्यावं लागत असे. गोयलजींनी माझी विनंती तुमच्यासमोर मांडली आणि तुम्ही क्षणात त्या विनंतीचा स्वीकार केलात. पंजाबी असोसिएशनची बसाखी आणि तुमचं त्या क्षणापासून एक अविभाज्य नातं जन्माला आलं. हे नातं नंतर तुमच्या निधनापर्यंत कायम राहिलं. तुमच्या पहिल्या बसाखी कार्यक्रमात तुम्ही असा काही कार्यक्रम दिलात, की सगळे तुमचे आशिक झाले. तुम्ही आमचे हिरो झालात!

रवीजी, माझ्या लक्षात आहे- प्राणसाहेब, जयराजजी आणि तुम्ही अशी तीन माणसं होता, ज्यांनी कायमच बसाखीसाठी वर्षांतले १० एप्रिल ते १४ एप्रिल हे दिवस कायम राखून ठेवलेत. या दरम्यान काहीही नवं काम आलं, तर तुम्ही ते घेत नव्हता आणि जुनी कामं त्या काळात बंद ठेवत होतात. तुम्हांसारख्यांच्या या कामगिरीमुळे पंजाबी असोसिएशनची बसाखी जगभरात रसिकमान्य झाली. आम्ही तुमच्यासमोर काही वेळा अगदी कच्चे कलाकार आणत असू. परंतु तुम्ही त्यांच्यावर न कंटाळता, त्यांना न ओरडता संस्कार करत होतात आणि त्यांना मुंबईत सादर करत होता. एकदा हिरॉईन म्हणून नाव कमावलेल्या रेखानं आमच्याजवळ इच्छा व्यक्त केली, की तिला बसाखीत गायचंय. ती गज़्‍ाल गाणार होती. तुम्ही वांद्रय़ाला घर बांधलं होतं ‘वचन’ नावाचं. त्या बंगल्यात तुमची सुंदर आणि अद्ययावत अशी म्युझिक रूम केली होती. त्या म्युझिक रूममध्ये रेखा यायची आणि तुम्ही तिच्या गाण्यावर सतत सात दिवस मेहनत करून छान बसवून घेतलंत. रेखाभी जम के गायी थी! याच म्युझिक रूममध्ये बसाखीच्या काळात जवळपास महिनाभर आमचा मुक्कामच असायचा. आमचं साऱ्यांचं येणं-जाणं, खाणं-पिणं भाभीजी आनंदानं करायच्या. काय मजेदार दिवस होते ते!

रवीजी, तुमचं-आमचं एकमेकांकडे सातत्यानं येणं-जाणं असायचं. तुम्ही पार्टीपसंद व्यक्ती नव्हतात, तरी आमच्याकडे मात्र तुम्ही कायम यायचात. पार्टीत तुम्हाला कोणीही आग्रह केला, की तुम्ही आनंदानं गाणं गाऊ लागायचात- ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनों’ किंवा ‘नीले गगन के तले’ किंवा ‘तुम ही मेरी मंदिर, तुमही मेरी पूजा’ किंवा ‘फिजा भी है जवा जवा’ किंवा ‘चुपके चुपके रातदिन’.. आज आत्ता तुमचा आवाज माझ्या कानात घुमतोय. मूळ गायकांनी अत्यंत चांगली गायलेली गाणी तुमच्या आवाजात काहीशी वेगळी आणि तितकीच सुंदर वाटायची. बरं, गातानाही तुम्हाला वाद्यांच्या साथीची गरज नसायची. पाण्याच्या ग्लासावर साध्याशा टिचक्यांनी ताल देत तुम्ही गायचात. अजूनही तो नाद कानात गुंजत राहतोय, जसा देवळाच्या गाभाऱ्यातील घंटेचा नाद कायम कानात गुंजत राहतो!

शब्दांकन : नीतिन आरेकर