चंदन-मंजूची प्रेमकहाणी

काही माणसं एकमेकांसाठीच जन्माला आलेली असतात, पण ती एकत्र राहू शकत नाहीत असा काहीसा दैवदुर्विलास असतो. 

|| कुलवंतसिंग कोहली

काही माणसं एकमेकांसाठीच जन्माला आलेली असतात, पण ती एकत्र राहू शकत नाहीत असा काहीसा दैवदुर्विलास असतो.  कमाल अमरोही आणि मीनाकुमारी यांचं असंच झालं. ते एकमेकांसाठीच जन्माला आलेले होते, पण..

काही माणसं ही एकमेकांसाठी जन्माला आलेली असतात, पण ती एकत्र राहू शकत नाहीत असा काहीसा दैवदुर्विलास असतो. मीनाकुमारी आणि कमाल अमरोहींचं असंच झालं. ते एकमेकांसाठी जन्माला आलेले होते; पण फार काळ एकत्र राहू शकले नाहीत. दोघंही अत्यंत संवेदनशील होते. अप्रतिम लेखक होते. दोघांनीही हिंदी चित्रपटांतच नव्हे, तर भारतीय चित्रपटांत आपली नाममुद्रा उमटविली होती. दोघंही माणूस म्हणून श्रेष्ठ होते. दोघेही परस्परांचा आदर करत होते. पण..

..पण कुठंतरी काहीतरी बिघडलं होतं. या दोघांनी फारसं एकत्र न राहूनही इतिहास घडवला होता, हेच त्यांच्या नात्यातलं सौंदर्य होतं. नियती असं का करते, हे कधीच कळत नाही. तिचे हिशेबच निराळे!

माझं या दोघांबरोबर घट्ट  नातं जमलं होतं. कमालसाहेब व मीनाजींच्या स्वभावातली दिलदारी याला कारणीभूत आहे. मला अजूनही कमालसाहेबांबरोबर झालेली ती पहिली भेट आठवते. सरदार चंदुलाल शहा यांनी आझाद मदानात फिल्म इंडस्ट्रीसंबंधी एक ऐतिहासिक प्रदर्शन भरवलं होतं. तिथे कमालसाहेबांच्या ‘पाकिजा’चा सेट लागला होता. भव्य सेट होता तो. हजारो रसिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात फक्त आमचंच रेस्टॉरंट होतं. त्यामुळे सर्व कलाकार, रसिक आमच्या इथंच यायचे. तेव्हा कमालसाहेबांची ओळख झाली. चार-पाच मित्रांच्या घोळक्यात ते राजासारखे वावरत होते आणि मजेत प्रदर्शन एन्जॉय करत होते. पण त्यावेळी फक्त ओळख झाली. मत्री नंतर झाली.

मात्र, या पहिल्याच भेटीत लक्षात आलं, की हा माणूस काही वेगळाच आहे. टिपिकल फिल्मी नाही. तरीही फिल्मसाठी सर्वस्व झोकून देऊन काही करत राहणारा आहे. माझ्या पापाजींना त्यांच्याबद्दल प्रेम होतं. कारण ‘जेलर’, ‘पुकार’, ‘महल’सारख्या चित्रपटांचं लेखन त्यांनी केलं होतं. परंतु ते आमच्याकडे जेवायला येत नसत. कारण आमच्याकडचं मटण हे ‘झटका’ असे, ‘हलाल’नसे. आणि कमालजींना ते आवडत नसे. एकदा ते पापाजींना म्हणालेही, ‘‘तुम्ही झटका मटण देता म्हणून मी येत नाही.’’ तर पापाजींनी लगेच प्रत्युत्तर केलं, ‘‘मी पंजाबी आहे कमालजी. मी असंच मटण देणार.’’ खदखदून हसत कमालजींनी त्यांना दाद दिली.

मीनाजी मला पहिल्यांदा भेटल्या त्या धर्मेद्रबरोबर. त्यांचं व धरमचं खास नातं होतं. धरम त्यांना घेऊन ‘प्रीतम’मध्ये यायचा. दोघंही एका ठरावीक टेबलवर बसून जेवायचे, मद्य घ्यायचे व निघून जायचे. मीनाजी खूप कमी बोलत असत. त्यांचं व माझं वय सारखंच होतं. धरम माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. आमची झकास मत्री होती. दिल खोल के दोस्ती करणारा जाट आहे धरम! त्यानं त्यावेळी नुकताच एक चित्रपट साइन केला होता आणि नवी फियाट कार विकत घेतली होती. त्या रात्री प्रीतममध्ये मद्य प्यायल्यावर तो व मीनाजी जायला निघाले असता मी म्हणालो, ‘‘धरम, आज टॅक्सी घेऊन जा. नवी गाडी आहे, त्यात काही घडायला नको.’’ धरम म्हणाला, ‘‘छोडो यार. मी आत्ता खंडाळ्याला गाडी घेऊन जाईन. चलो मीना.’’ मीनाजी शांत होत्या. मी त्यांना रस्त्यापर्यंत  सोडायला गेलो. धरमनं जोशात गाडी काढली, पहिला गिअर टाकला आणि कार हातातून निसटली आणि समोरच्या दुभाजकावर जाऊन आपटली. कसला आवाज झाला म्हणून मी बघायला वळलो.. तर हा अपघात! मी धावत गेलो. सुदैवानं दोघांनाही काही झालं नव्हतं. ओरखडाही आला नव्हता. धरम मीनाजींकडे थोडासा घाबरून पाहत होता. पण मीनाजी शांत होत्या. त्यांचं ते धर्य बघून मी चाट पडलो. मी वरमलेल्या धरमला म्हणालो, ‘‘आता तरी टॅक्सीनं जाशील का?’’

‘पाकिजा’च्या काळात कमालसाहेबांशी माझी खरी दोस्ती झाली. ते माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते. पण वय विसरून आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. ते मनातल्या अनेक गोष्टी मला सांगत. कमालसाहेब अतिशय देखणे होते. चित्रपटाच्या नायकासारखे! ते अमरोह्यचे. त्यांचं मूळ नाव होतं- सय्यद आमीर हैदर कमाल नकवी. त्यांचे सर्वात मोठे बंधू त्यांच्यापेक्षा अठरा वर्षांनी, तर बहीण नऊ वर्षांनी मोठी होती. सय्यद लेखन करत होता. त्यातच रमत होता. मोठय़ा बहिणीच्या लग्नात सय्यद तरुण झाला होता. त्याच्या अवतीभवती काही सुंदर मुली होत्या. सय्यदने त्यांच्यावर प्रभाव पाडायला म्हणून अशी एक गोष्ट केली, की जी मोठय़ा भावाला अजिबात आवडली नाही. त्याने सय्यदला बोलावलं व विचारलं, ‘‘हे काय?’’ सय्यदनं कानावर हात ठेवले. तेव्हा भावानं- ‘‘तू काय केलंस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. खोटं बोलू नकोस. खानदानाला बट्टा लावू नकोस,’’ असं म्हणत सैय्यदला एक जोराची थप्पड लगावली. त्या थपडेनं सय्यद खाली पडला. अंगाला धूळ लागली. त्या रात्री बहिणीचं लग्नघर सोडून तो पळून गेला ते घराण्याचं व गावाचं नाव रोशन करून परत येईन, असा निश्चय करूनच!

अमरोह्यहून तो लाहोरला गेला. तिथं लेखक म्हणून बस्तान बसवण्याचा त्यानं प्रयत्न केला. या प्रयत्नांत त्याची भेट महान गायक-अभिनेता कुंदनलाल सगल यांच्याशी झाली. सगलजींनी त्याला मुंबईला जाऊन सोहराब मोदींना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांनी भेटीची वेळही ठरवून दिली. ठरलेल्या वेळी १८-१९ वर्षांचा सय्यद सोहराब मोदींकडे गेला. जरा मोठं दिसण्यासाठी त्यानं केस अस्ताव्यस्त ठेवले होते व उगाचच एक जाड काडय़ांचा चष्मा घातला होता. गेटवर द्वारपालानं त्याला अडवलं, ‘‘भेटीची वेळ ठरली आहे का?’’ खुद्द सगलसाहेबांनी या फाटक्या तरुणाची व सोहराब मोदींची भेट ठरवल्याचं ऐकून त्यानं विचित्र नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. ‘‘तू काय करतोस?’’ या प्रश्नाचं उत्तर- ‘‘लेखन करतो,’’ म्हटल्यावर द्वारपाल म्हणाला, ‘‘लगते तो नहीं हो।’’ सय्यदनं ताडकन् उत्तर दिलं, ‘‘मैं लगने की नहीं, सुनने की चीज़्‍ा हूँ।’’ अखेर सय्यद सोहराबजींसमोर पोचला. त्यांनाही एवढय़ा कोवळ्या लेखकाबद्दल आश्चर्य वाटलं. तेही म्हणाले, ‘‘लगते नहीं हो.’’ सय्यदनं तेच उत्तर दिलं- ‘‘मैं लगने की नहीं, सुनने की चीज़्‍ा हूँ।’’ मोदी चकित झाले व म्हणाले, ‘‘ठीक है। फिर कुछ सुनाओ।’’ सय्यद त्या तयारीत गेला नव्हता. त्याच्या हातात एक फाइल होती. त्यातल्या कोऱ्या पानांकडे पाहत त्यानं एक कथा ऐकवायला सुरुवात केली. १५-२० मिनिटं झाल्यावर सोहराबजींनी त्याला थांबण्याचा हात केला आणि ते न बोलता तिथून उठले व निघून गेले. सय्यदला काही कळेना, काय झालं ते. काही क्षणानंतर त्याला टाईपरायटरचा आवाज ऐकू आला. सोहराबजी परत आले. ते म्हणाले, ‘‘तुम कमाल की चीज हो। मी आजवर इतक्या जणांकडून इतक्या कथा ऐकल्या; पण तू मला कथा ऐकवताना मी अक्षरश: तो चित्रपट पाहतो आहे असं मला वाटलं. पण तू पानं उलटत नव्हतास आणि न अडखळता धाडधाड कथा सांगत होतास. तुम कमाल की चीज हो। माझ्यासाठी तू पुढचे दोन चित्रपट लिहिणार आहेस. हे त्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि हा तीन हजार रुपयांचा चेक.’’ ते पुन:पुन्हा म्हणत होते, ‘‘तुम कमाल की चीज हो।’’ सय्यद त्यांना म्हणाला, ‘‘सर, आप बार बार मुझे कमाल बोल रहे हो, तो मैं लिखने के लिये ‘कमाल अमरोही’ नाम लेता हूं, जिस में मेरे गाव का नाम शामिल है।’’ आणि अशा प्रकारे ‘कमाल अमरोही’चा जन्म झाला! थप्पड खाणारा सय्यद आता इतिहासात दफन झाला होता. एका निवांत क्षणी कमालसाहेबांनी हा किस्सा मला सांगितला होता.

कमालसाहेबांना तीन मुलं होती- रुखसार ही मुलगी व ताजदार, शानदार हे मुलगे. त्यांच्या तीन पत्नी होत्या- पहिली बिल्कीस बानू, दुसरी मेहमुदी आणि तिसरी मीनाकुमारी. ही तिन्ही मुलं मेहमुदी बेगमची. बिल्कीस बानू ही नर्गिसजींच्या आईकडे लग्नापूर्वी काम करत असे. मीनाजींची व कमालसाहेबांची गाठ पडली ती ‘तमाशा’ या चित्रपटाच्या सेटवर. अशोककुमार यांनी ती भेट घडवली होती. तोवर मीनाजींना पडद्यावर पाहून, त्यांचा अभिनय पाहून कमालसाहेब त्यांच्या प्रेमात बुडाले होते.

‘‘मैं मीना को मिलने के बहाने ढूँढता था। अली बक्ष- उसके वालिद- उसके इर्दगिर्द हमेशा रहते थे। पण मी तर तिच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. मी तिला ‘अनारकली’ हा माझा नवा चित्रपट देऊ केला. ती काम करायला तयार होती. दरम्यान, मीनाला महाबळेश्वरला एक अपघात झाला आणि तिला ससूनला अ‍ॅडमिट केलं गेलं..’’ कमालसाहेब सांगत होते, ‘‘मी तिला पुण्याला भेटायला गेलो. सोबत गुलदस्ता होता. ती एक औषध घेत नव्हती. मी जरा दटावल्यावर तिनं ते औषध घेतलं. बस्स.. सिलसिला सुरू झाला. मग मी तिला भेटायला रोज संध्याकाळी मुंबईहून पुण्याला जाऊ लागलो.’’ मी कमालसाहेबांना म्हणालो, ‘‘काहीही सांगू नका. मुंबईहून रोज पुण्याला जाणं काही खाऊ आहे का? आणि तुमची कामं सोडून तुम्ही जात होता? माझा विश्वास नाही बसत.’’

‘‘कुलवंत, तू प्रेम केलंस का कधी? तुला हे नाही कळणार. ये तेरे बस की बात नहीं. बस तूने अपनी दुनिया से दुसरी दुनिया नहीं देखी है! तर.. हळूहळू मी माझं प्रेम व्यक्त केलं. तिनं ते स्वीकारलं. आम्ही गुपचूप लग्न केलं. मीनाला मी ‘दायरा’ ऑफर केला होता. आमच्या प्रेमाची चाहूल अली बक्ष यांना लागली होती. त्यांनी ‘दायरा’ घ्यायला विरोध केला. मीनानं तेव्हा मेहबूब खानसाहेबांचा ‘अमर’ स्वीकारला होता. तिला ‘दायरा’त काम केल्यावाचून राहवेना. तिनं ‘अमर’ सोडला. तो नंतर मधुबालानं केला. ती अली बक्षना न सांगताच ‘अमर’ सोडून थेट ‘दायरा’च्या सेटवर आली..’’ असं म्हणून त्यांनी सुस्कारा सोडला.. ‘‘तिनं ‘दायरा’ केला, पण आमच्या नात्यात दरार कशी येत गेली, ते कळलंच नाही.’’

मीनाजी मला गप्पा मारताना म्हणाल्या होत्या- ‘‘लग्न करताना चंदननं (त्या कमालसाहेबांना प्रेमानं ‘चंदन’ म्हणत.) मला अट घातली होती की, मला तीन मुलं आधीच आहेत, त्यामुळे आपल्याला मूल होता कामा नये. प्रेमाच्या नव्या नव्हाळीत मी ‘हो’ म्हणून बसले खरी; पण मला आई व्हायचं होतं. पण कमालसाहेबांची इच्छा नसताना ते शक्य नव्हतं. मला या सगळ्याचा अस ताण येऊ लागला. त्यात आईकडचं कुटुंबही माझ्यावर अवलंबून होतं. माझी झोप उडाली. मी रात्र रात्र जागू लागले. चंदन जवळ नसताना मी तो जिथं असेल तिथं फोन करून त्याच्याशी बोलू लागले. आमच्यात सारं काही ठीक नव्हतं. तरीही कॅमेऱ्यासमोर गेले की मी वेगळी बनायचे. ती प्रकाशमय झगमगीत आभासी दुनिया मला वास्तवातल्या अंधारापासून दूर न्यायची. पण रात्रीचा अंधार दूर कसा होणार? मी खूप वाचायचे. मग डोळे दुखायचे. तरीही वाचायचे. झोपेच्या गोळ्यांचा फारसा उपयोग व्हायचा नाही. एकदा झोपेची तक्रार घेऊन मी डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी मला रोज रात्री ब्रँडीचा एक पेग घ्यायला सांगितलं. पहिले दोन महिने मी एकच पेग घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागले. झोप लागायचीच असं नाही, पण बरं वाटायचं. फिर धीरे धीरे दारू की गलत लत मुझे लग गयी। जो मुझे अब छोडती ही नहीं।’’

मीनाजी आणि कमालसाहेबांत अनबन सुरू होती. पण त्यांचं परस्परांवर अतिशय प्रेमही होतं. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ असं काहीसं विचित्र नातं होतं त्यांचं. याच काळात एका पुरस्कार वितरण सोहोळ्याला मीनाजी व कमालसाहेब एकत्र गेले होते. मात्र, तिथं जाण्यापूर्वी त्यांच्यात काही खटका उडाला होता. तरीही नेहमीसारखा मुखवटा परिधान करून दोघेही कार्यक्रमाला गेले. मीनाजींना पुरस्कार मिळाला. ती ट्रॉफी घेऊन त्या व्यासपीठावरून सरळ घरी निघून गेल्या. परंतु त्यांची पर्स त्या तिथंच विसरल्या. कमालजींनी ती पर्स बघितली, पण उचलली नाही. कार्यक्रम संपल्यावर ते निघून गेले. मुमताजनं ती पर्स बघितली व दुसऱ्या दिवशी मीनाजींना घरी नेऊन दिली. मीनाजींनी तिला धन्यवाद दिले. तेव्हा त्यांनी कमालसाहेबांना विचारलं, ‘चंदन, तुम्ही शेजारी पर्स राहिलेली पाहिली नव्हती का?’’

‘‘हां मंजू (ते मीनाजींना ‘मंजू’ म्हणत.), पाहिली होती.’’

‘‘मग ती का घरी आणली नाहीत? ’’

‘‘आज तू विसरलेली पर्स आणायला सांगशील.. उद्या विसरलेली चप्पल आणायला सांगशील! मी असलं काही करणार नाही.’’

दोघांत विकोपाचं भांडण झालं. कमालसाहेबांनी त्यांच्यावर हात उगारला. त्या दिवशी पती-पत्नी म्हणून त्यांचं नातं मनातनं संपलं. मीनाजी सांगत होत्या, ‘‘एका शुटिंगच्या वेळी चंदनच्या एका मित्राबरोबर माझं वाजलं. मला लाळघोटेपणा आवडत नाही. मी चंदनला फोन करून सेटवर येऊन जायला सांगितलं. पण का कोण जाणे, चंदन आला नाही. मला राग आला. माझा नवरा माझी बाजू घ्यायला येत नाही.. असं का? हे नातंच संपवून टाकू. मी थेट मेहमूदच्या (प्रसिद्ध विनोदी अभिनेते) घरी गेले.’’

याबद्दल कमालसाहेबांचं म्हणणं असं की- ‘‘मी दुसऱ्या दिवशी मेहमूदच्या घरी गेलो व मंजूला म्हणालो, ‘चल, झालं तेवढं पुरं झालं. आपण घरी जाऊ या आपल्या.’ तिनं मी काल न येण्याचं कारण विचारलं. मी तिला सांगितलं, ‘मी आलो असतो तर शब्दानं शब्द वाढला असता आणि आणखी काहीतरी विपरीत घडलं असतं. मी आज त्याला नक्की खडसावेन, त्याच्याशी संबंध तोडेन. पण तू घरी चल.’ मीना आली नाही. मी तिला म्हणालो, ‘हे बघ, मी तुला आज घ्यायला आलोय. उद्या येणार नाही.’ लेकीन मीना मेरे साथ आयी नहीं। फिर कभी मेरे साथ हमारे घर में उसने कदम रखा नहीं।’’ बाकी हकीकत पुढील आठवडय़ात..

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kamal amrohi meena kumari

ताज्या बातम्या