राष्ट्रीय कर्तव्य म्हणून निवडणुकीच्या कामासाठी रुजू होण्याचे आदेश देऊनही गैरहजर राहिलेल्या ८५ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या अधिकारी – कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून आयोगाने पुढील कारवाईही सुरू केली आहे.विधानसभेच्या कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी, वरळी, माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा आणि धारावी या १० मतदारसंघात (लोकसभेच्या दोन मतदारसंघातील परिसर) निवडणुकीच्या कामासाठी हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ८५ जण तीन पत्रे पाठवूनही कामासाठी रुजू झालेले नाहीत.

अशोक चव्हाणांविरुद्ध ‘आप’ची तक्रार
मुंबई: नांदेड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मतदारांना आमिष दाखवून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. प्रत्येक महिलेला १ लाख रुपये कर्ज देण्यात येईल, अशा जाहिरातीचे प्रचारफलक चव्हाण यांनी नांदेडच्या शिवाजीनगर भागात लावले आहेत. यातून, पक्षाच्या जाहीरनाम्याच्या अथवा धोरणाच्या नावावर काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतिमा मतदारांचा ‘मसिहा’ अशी दाखवल्याचा आरोप केला.

सरकारचे नक्षलवाद्यांना आवाहन  ;  निवडणुकीवरील बहिष्कार मागे घ्या!
नवी दिल्ली  : नक्षलवाद्यांनी ‘शांतता चर्चे’ची तयारी दाखवली असली तरी, केंद्र सरकारने या संदर्भात सावधगिरीचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. ‘‘नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा आणि शस्त्रास्त्रे खाली टाकू, असे आश्वासन द्यावे, तरच त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल,’’ अशी भूमिका सरकारने घेतली आहे.नक्षलवाद्यांनी हिंसाचाराची भूमिका मागे घ्यावी. २००४पासून नक्षलवाद्यांनी ४८०० सर्वसामान्य नागरिकांची हत्या केली. त्यापैकी बहुतेक आदिवासी होते. या नागरिकांची सार्वजनिक माफी मागता येईल, असे वातावरण नक्षलवाद्यांनी निर्माण करणे गरजेचे आहे, असे गृह मंत्रालयाने सोमवारी सांगितले. एका संकेतस्थळाला नुकतीच नक्षलवाद्यांच्या एका प्रवक्त्याने मुलाखत दिली होती, त्यात त्याने केंद्र सरकारशी शांतता चर्चा करण्यास आमचा विरोध नसल्याचे सांगितले होते.

हीना गावित यांच्या उमेदवारीवर हरकत; उद्या सुनावणी
नंदुरबार: नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या अर्जावर सोमवारी दोन हरकती प्राप्त झाल्या असून त्यांची सुनावणी नऊ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हीना यांची वैद्यकीय सेवा ‘ऑफीस ऑफ प्रॉफीट’ अंतर्गत येत असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी हरकतीव्दारे करण्यात आली आहे. या अर्जासह हीना यांच्या मातोश्री ‘एबी फार्म’वरील पर्यायी उमेदवार असल्याने हरकत घेण्यात आली आहे.

मतदार ओळखपत्रांच्या यादीतून शिधापत्रिका वगळली
मुंबई : मतदारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेल्या ओळखपत्रांच्या यादीतून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिधापत्रिकांसह सहा ओळखपत्रे वगळली आहेत. मतदार छायाचित्र ओळखपत्र उपलब्ध नसले तरी आता मतदानासाठी ११ प्रकारची छायाचित्र ओळखपत्रे ग्राह्य़ धरली जाणार आहेत. त्यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले. याआधी १६ ओळखपत्रे ग्राह्य़ धरली जात होती
ग्राह्य़ छायाचित्र ओळखपत्रे
पासपोर्ट, वाहन परवाना, केंद्र शासन/राज्यशासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक/टपाल खात्याचे पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, आर.जी.आय. ने एन.पी.आर. अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाकडून देण्यात आलेले स्वास्थ विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले सेवानिवृत्तीचे कागदपत्र, निवडणूक विभागाने दिलेली प्रमाणित छायाचित्र मतदारचिठ्ठी

अरुण जेटली यांची संपत्ती ११३ कोटींची
अमृतसर : भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची संपत्ती ११३ कोटींची आहे. नवी दिल्ली आणि गुजरातमध्ये शाही निवासस्थान असलेल्या जेटली यांच्याकडे महागडय़ा कार आहेत. त्याशिवाय सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी ७५ कोटी ७० लाखांची जंगम मालमत्ता जेटली यांच्या नावावर आहे. जेटली यांच्याकडे एक कोटी ३५ लाखांची रोख रक्कम तर त्यांच्या पत्नीकडे साडेसात लाखांची रोख रक्कम आहे. जेटली यांच्या बँक खात्यांमध्ये १८ कोटी रुपये असून, १०.३७ कोटींचे कर्ज आहे.

बिहारमधील काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलामध्ये धुसफुस सुरू
सासाराम : बिहारमधील काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलामध्ये धुसफुस सुरू असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेसच्या उमेदवार आणि लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांचा प्रचार केला. दोन धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीमुळे जातीयवादी शक्तींना सत्तेवर येण्यापासून रोखता येणे शक्य होईल, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.सासाराम येथे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रचार केल्यानंतर तीनच दिवसांनी लालूप्रसाद यांनी मीराकुमार यांच्यासाठी प्रचार केला.

ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगत संघर्ष
जंबलपूर (पश्चिम बंगाल) अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोग यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.जिल्हाधिकारी आणि पाच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या आपल्या सरकारला विचारल्याशिवाय केल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग भाजप आणि काँग्रेसच्या हातातील बाहुले असल्याची टीका त्यांनी केली आहे. एकाही अधिकाऱ्याची बदली होऊ देणार नाही असा पवित्राही ममतांनी घेतला आहे. हा विरोधकांचा कट आहे अशी टीका त्यांनी केली.