राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेल्या प्रयोगानुसार रविवारी पक्षाचे १३०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार मतदानाने ठरविणार आहेत.
उमेदवार ठरविण्यासाठीच एवढी टोकाची लढाई अपेक्षित असल्याने ही पद्धत स्वीकारू नये, अशी काँग्रेस नेत्यांचीच भावना होती. पण राहुल गांधी या योजनेवर ठाम राहिले. त्यानुसार, राज्यातील वर्धा आणि लातूर मतदारसंघांतील काँग्रेसचे उमेदवार मतदान पद्धतीने निवडले जाणार आहेत. यापैकी वर्धा मतदारसंघात रविवारी मतदान होणार आहे. लातूर मतदारसंघात पुढील गुरुवारी मतदान होईल. विद्यमान खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे आणि काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस या दोन नेत्यांच्या मुलांमध्ये उमेदवारीसाठी लढत होणार आहे.  एकूण १३०३ मतदारांमधून उमेदवार निवडला जाणार आहे. आपल्या मुलासाठी खासदार दत्ता मेघे यांनी सारी ताकद पणाला लावली आहे. तर चारुलता टोकस यांच्याकरिता राज्यमंत्री रणजित कांबळे आणि आमदार वीरेंद्र जगताप हे सूत्रे हलवित आहेत.   वर्धा मतदारसंघात पराभूत होणारा उमेदवार निवडणुकीत अधिकृत उमेदवाराला फटके लावण्यासाठीच जोर लावेल, अशी चिन्हे आहेत.