एकीकडे निवडणुकांतील उमेदवारांचा ‘अनधिकृत’ खर्च कोटींची उड्डाणे घेत असताना खिशात एक दमडी नसल्याचा दावा करत काही उमेदवार राज्यातील रणधुमाळीत उतरले आहेत. खिशात रुपया नाही, घर नाही, सोने-नाणे नाही, गुंतवणूक नाही असे शपथपत्र देत महाराष्ट्रातील सुमारे १९ अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
उमेदवारांना आपल्या प्रचारावर यथायोग्य खर्च करता यावा यासाठी निवडणूक आयोगाने ७० लाख रुपयांची मर्यादा घालून दिली आहे, मात्र महाराष्ट्रात १९ ‘बिन’दमडीचे उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचाराचा खर्च किती असेल, हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. नागपूरमधील शशिकला अहमद राजेश साधनकर, चंदा मानवतकर, धीरज गजभिये हे चार उमेदवार, तर मोलमजुरी करून सायकलवरून एकटय़ानेच स्वत:चा प्रचार करणारे आणि पोस्ट गॅ्रज्युएट असलेले उत्तम कांबळे हे यवतमाळातील, चंद्रपूरचे विनोद मेश्राम, अमरावतीच्या किरणताई कोकाटे, भंडारा-गोदियाचे धनंजय राजभोग व अकोल्याचे संदीप वानखेडे या विदर्भातील उमेदवारांनी आपल्याकडे फुटकी कवडी नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. याशिवाय हरिहर भागवत, वीर शेषराव चोखोबा, सुमित्रा पवार, प्रशांत ससाने, अशोक सोनवणे हे पाच उमेदवार बीडचे आहेत, मावळच्या सीमा माणिक, साताऱ्याचे डॉ. विजय पाटील, जालन्याचे विठ्ठल शेळके, औरंगाबादचे भानुदास सरोदे, जळगावचे संदीप पाटील, नाशिकचे महेश आव्हाड यांचाही अशा ‘कफल्लक’ उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. आपल्याजवळ एक रुपयाही नाही, एक ग्रॅमही सोन्या-चांदीचे अलंकार नाहीत, एक चौरस फूटही जागा नाही, राहायला घर, मोटार नाही, बँकेत कोणतीच ठेव नाही, कोणतीच विमा पॉलिसी नाही, कोणतेही शेअर्स नाही आणि कवडीचेही उत्पन्न नाही, अशी माहिती या उमेदवारांनी आपल्या शपथपत्रात दिली आहे. या उमेदवारांच्या शपथपत्रावर आक्षेप घ्यावा, असे मात्र कुणालाही वाटत नाही. लोकशाहीत फुटकी कवडी खिशात नसतानाही निवडणूक लढता येते, हे या उमेदवारांनी सिद्ध केले आहे, हे विशेष.  विशेष हे की, यातील बीडच्या सुमित्रा पवार अंगठाबहाद्दर आहेत, तर यवतमाळचे उत्तम कांबळे पोस्ट ग्रॅज्युएट व हरिहर भागवत, वीर शेषराव चोखाबा, प्रशांत ससाणे, डॉ. विजय पाटील हे पदवीधर आहेत. इतर उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते बारावी झालेले आहे.