लोकसभा निवडणुकीला एक महिना उरला असतानाच भाजपमध्ये वाराणसीच्या जागेवरून घासाघिस सुरू झाला आहे. सध्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, मात्र या जागेवर पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना उमेदवारी देण्यात येणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांकडून देण्यात आल्याने जोशी भलतेच नाराज झाले आहेत. या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आटापिटा सुरू केला असून, नवी दिल्लीत शनिवारी झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याशी यावरून वादही घातला. दुसरीकडे मोदी यांना उमेदवारी मिळावी यासाठी वाराणसीच्या जनतेने स्वाक्षरी मोहीम हाती घेतल्याने ही जागा मोदींना मिळणार की जोशींना, यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
वाराणसी या मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना उमेदवारी मिळणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे देत आहेत. या बातम्यांवरून नाराज झालेल्या राजनाथ सिंह यांनी थेट राजनाथ सिंह यांनाच प्रश्न विचारले. ‘‘वाराणसीमध्ये मोदी यांना उमेदवारी देणार अशा बातम्या प्रसारमाध्यमे कशाच्या आधारे दाखवत आहेत? उमेदवारीबाबत काही निर्णय झाला आहे काय? हो किंवा नाही याबाबत स्पष्ट सांगा,’’ असे सवालच जोशी यांनी राजनाथ यांना विचारले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाराणसीच्या उमेदवारीवरून ‘गरमागरम’ चर्चा झाल्याचे समजत़े
मुरली मनोहर जोशी यांचा पक्षाध्यक्षांशी वाद
वाराणसीमध्ये मात्र मोदींनाच मागणी
वाराणसीमधील भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी करीत यासाठी स्वाक्षरी मोहीमही हाती घेतली आह़े  या मोहिमेला त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. तब्बल पाच लाख रहिवाशांनी यात स्वाक्षऱ्या केल्या असून, याद्वारे आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना मोदी यांनाच उमेदवारी देण्यास भाग पाडू, असे स्थानिक भाजप नेत्याने सांगितले.