गतवेळच्या तुलनेत राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये सरासरी आठ ते १५ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. फक्त लोकसभा निवडणुकीसाठी म्हणून  ३० वर्षांंनंतर मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.७५ टक्के मतदान राज्यात झाले होते. १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तेव्हा टक्केवारी ६० टक्के होती. महायुतीचे ३५च्या आसपास उमेदवार निवडून येतील, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईतील सहाही मतदारसंघात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर मुंबई (५१.६७ टक्के), उत्तर पश्चिम (५०.०६ टक्के), ईशान्य (५३ टक्के) तर उत्तर-मध्य मतदारसंघात ४९.४ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली.  पुणे आणि नागपूरमध्येही सरासरी १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.