वास्तुविशारद महिलेवर पाळत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचे गुजरातमधील प्रकरण उघडकीस आणणारे पत्रकार आशीष खेतान यांना आम आदमी पक्षाने नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या चौथ्या यादीत ६१ जणांना उमेदवारी दिली आहे.
गुजरातमधील एका युवतीवर पाळत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे प्रकरण (स्नूप गेट) गुलाल डॉट कॉमच्या आशीष खेतान यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय व तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अप्रत्यक्षपणे संशय घेण्यात आला होता. खेतान यांना उमेदवारी देण्याच्या व त्यांनी दिलेल्या वृत्ताचा काडीचाही संबंध नाही, असा खुलासा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
स्नूप गेटप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. हा आयोग अद्याप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे खेतान यांना उमेदवारी देऊन आम आदमी पक्षाने मोदींना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.
‘आप’च्या चौथ्या यादीत दिल्लीतून ३, कर्नाटकमधून १३, तर उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ३८ जणांना उमेदवारी दिली आहे.
‘आधार’ संकल्पनेचे प्रवर्तक नंदन निलकेणी (काँग्रेस), भाजपचे सरचिटणीस अनंतकुमार यांच्या विरोधात बंगळुरू दक्षिणमधून ‘आप’ने नीना नायक यांना मैदानात उतरवले आहे.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात ‘आप’ने श्रीधर कल्लहल्ला यांना उमेदवारी दिली आहे. धार्मिक हिंसाचाराने पोळून निघालेल्या मुझफ्फरनगरमधून मोहम्मद यामीन ‘आप’कडून उमेदवार असतील.

केजरीवाल यांनी दलितांचा अवमान केला ; भाजपचा आरोप
नवी दिल्ली :अनुसूचित जाती व जमाती यांना घटनेनुसार देण्यात येत असलेल्या आरक्षणाबद्दल अपशब्द काढणारे ‘आम आदमी पक्षा’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दलितांचा अवमान केला आहे, असा आरोप भाजप नेते उदित राज यांनी केला. अरविंद केजरीवाल यांना मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र कुणाला दुखवण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे दलितांचा अवमान झाला आहे, असे उदित राज म्हणाले.