लोकसभा निवडणुकीत युती करण्याच्या भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर आम आदमी पक्षात सकारात्मक चर्चा सुरु आहे. येत्या सोमवारी त्यावर पक्षाची अधिकृत भूमिका त्यांना कळविली जाणार आहे, अशी माहिती आपच्या निमंत्रक अंजली दमानिया यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीची काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी होती. परंतु काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आघाडीच्या वतीने स्वबळावर निवडणुका लढविण्याची आंबेडकर यांनी भूमिका घेतली होती. परंतु आता काँग्रेस व खासकरुन भाजपच्या विरोधात दमदार भूमिका घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या आम आदमी पक्षाशी समझोता करण्याचे आंबेडकर यांनी ठरविले आहे.