काँग्रेस पक्षामध्ये लवकरच आपल्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे असे वृत्त सगळीकडे पसरले आहे. पण त्यात तथ्थ्य नाही. अशा बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचा खुलासा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. महत्त्वाच्या पदाची जबाबदारी लवकरच प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविली जाणार आहे, असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. तर काँग्रेस पक्ष प्रवक्त्यांनीही ‘गांधी घराण्यातील ‘तिघांनी’ही पक्षाचे नेतृत्त्व करावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या पाश्र्वभूमीवर प्रियांका यांनी हा खुलासा केला.
प्रियांका गांधी या अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतील आणि त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सरचिटणीस पद किंवा उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख पद दिले जाईल, अशी भाकिते राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होती. मात्र शुक्रवारी प्रियांका यांनी याविषयी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे खुलासा करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
संधी साधून माझ्या सक्रीय राजकारणाविषयी वावडय़ा उठविण्यात आल्या आहेत. मात्र त्यात तथ्थ्य नाही. अशा अफवा उठविणाऱ्यांनी उसंत घेतल्यास मी त्यांची ऋणी असेन, अशा उपरोधिक शब्दांत प्रियांका गांधी यांनी संबंधित वृत्त फेटाळून लावले. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते ऑस्कर फर्नाडिस आणि काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी प्रियांका यांच्याकडे पक्षातील महत्त्वाचे पद सोपविले गेल्यास आनंदच वाटेल, अशा आशयाची विधाने केली होती. तर अलाहाबाद येते प्रियांका यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल भाष्य करणारे फलक झळकले होते.
प्रियांकाच लिहीत होत्या पुस्तक
सोनिया गांधी या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. शिवाय त्यांच्यावर देशाने भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे त्या देशाचे काही देणे लागतात आणि म्हणूनच त्यांनी पुस्तक लिहिणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी आपण सोनिया यांना पुस्तकलेखनाचा सल्ला दिला होता. मात्र त्यावेळी प्रियांका आपले चरित्र लिहीत असून आपण सहलेखक म्हणून त्यात भर घालू असे त्यांनी सांगितले होते, अशी आठवण नटवर सिंग यांनी नमूद केली. गांधी  कुटुंबातले तिघेच तर पक्षातील सारे निर्णय घेतात, मग प्रियांकांचा निर्णयही त्यांना घेण्यास काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला.