लक्षवेधीलढती परेश रावल वि. हिंमतसिंह पटेल, अहमदाबाद, (पूर्व)
चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द उत्तम सुरू असतानाच राजकारणात प्रवेश करणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना भाजपकडून प्रथमच उमेदवारी देण्यात आली. गतवेळच्या निवडणुकीत उत्तम मताधिक्याने निवडून येऊनही हरीश पाठक यांना येथून उमेदवारी देण्यास भाजपने नकार दिला. त्यामुळे भाजपच्या गोटात आणि त्यातही विशेषत: कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या उमेदवारीला लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील कथित ‘मतभेदां’ची फोडणीही देण्यात आली. पाठक हे अडवाणी यांच्या विश्वासू वर्तुळातील असल्यामुळेच त्यांना उमेदवारी नाकारली गेल्याचे आरोपही केले गेले. आणि भाजपमधील अंतर्गत ‘वावटळी’मुळे ही लढत लक्षणीय ठरणार हे निश्चित झाले. अहमदाबाद हा तसा लौकिकार्थाने भाजपसाठी हक्काचा मतदारसंघ मानला जातो. मात्र काँग्रेसने मोदींची ‘मुस्लीमविरोधी नेतृत्व’ अशी प्रतिमा उभी करण्याचा केलेला प्रयत्न आणि या मतदारसंघातील मुस्लीम मतांची टक्केवारी यांच्या आधारे भाजपला धक्का देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नागरीकरणाचे जटिल होत जाणारे प्रश्न, शुद्ध पेयजल आणि वाढती बांधकामे या मुद्दय़ांवर विद्यमान खासदारांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. तर, विकासाचा दर, आर्थिक समृद्धी आणि मोदी लाट यांवर स्वार होण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.