महाराष्ट्रात सर्वच मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडी व महायुती यांच्यात इरेची झुंज आहे. परंतु दोन-चार जागांचा फरक पडेल, त्यापेक्षा फार मोठी उलथापालथ होईल, अशी परिस्थिती नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बारीक नजरेतून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 राज्य शासन या संस्थेचा प्रशासन हा कणा आहे. हा कणा म्हणजे मंत्रालयापासून गावपातळीपर्यंत पसरलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग. त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय व्यवहाराशी संबंध येत असतो. निवडणुकीच्या कामात सध्या मोठय़ा प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी वर्ग गुंतला आहे. प्रशासनातील अधिकारी वर्गाची राजकीय उलथापालथीवर कायम बारीक नजर असते. या निवडणुकीवरही त्यांनी लक्ष ठेवले आहे.
अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार राज्यात या वेळी काँग्रेस आघाडी व महायुती यांच्यात अटीतटीची लढाई आहे. परंतु २००९ पेक्षा फारसे वेगळे निकाल लागतील, असे त्यांना वाटत नाही. सुरुवातीला काँग्रेस आघाडी पिछाडीवर होती, परंतु आता त्यांच्या-त्यांच्या बालेकिल्ल्यात परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले जाते.
अर्थात, अधिकाऱ्यांमधील अनौपचारिक चर्चेतून असे अंदाज मांडले जातात. त्याला काहीही अधिकृत आधार नाही. कदाचित निकाल वेगळेही लागू शकतील, असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले.