भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेस माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आधार घेत असल्याने काँग्रेसला नैराश्याने ग्रासल्याचे सिद्ध होत असल्याची टीका भाजपने केली आहे. वाजपेयी यांच्यावर टीका करण्यात काँग्रेसच आघाडीवर होता, त्यामुळे सत्तारूढ पक्षाकडून करण्यात येणारी टीका अयोग्य असल्याचे भाजपने म्हटले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव समोर दिसत असल्यानेच त्या पक्षाकडून आता वाजपेयींच्या नावाचा वापर केला जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. वाजपेयी हे महान नेते असल्याचा उल्लेख काँग्रेसने त्यांच्या संकेतस्थळावर केला आहे. मात्र हाच काँग्रेस पक्ष एकेकाळी वाजपेयी यांच्यावर टीका करण्यात आघाडीवर होता, असेही भाजपने म्हटले आहे.
गुजरात दंगलींच्या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवावे, अशी वाजपेयी यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याची भावना होती, तेच मोदी आता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कसे होऊ शकतात, असे काँग्रेसने मोदींवर टीका करताना म्हटले आहे. भाजप आता वाजपेयी यांच्यासारख्या नेत्याच्या विचारांपासून दूर चालला आहे, आता भाजपला राजधर्म काय याचे स्मरण करून देणारा कोणी नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे. भाजपला मोदी यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाल्याने तो पक्ष वाजपेयींच्या विचारांपासून दूर चालला आहे, असे नमूद करताना काँग्रेसने वाजपेयी यांच्या पुतणीचे उदाहरण दिले आहे. वाजपेयी यांच्या पुतणीने पक्षाचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये वाजपेयी यांच्या बरोबरीचा एकही नेता नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे.