तेलंगण  नंतर विदर्भाच्या मुद्दय़ावर पुन्हा एकदा जांबुवंतराव धोटे यांच्यासह अनेक विदर्भवादी नेते सक्रिय झाले आहेत. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी २३ फेब्रुवारीला ते एकत्र येणार आहेत. स्वतंत्र विदर्भासाठी विविध जिल्ह्य़ांत जनमत घेतले जात असून त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भाची चळवळ थंड  झाली आहे. त्याला गती देण्यासाठी जांबुवंतराव धोटे आणि वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखालील पिढी सक्रिय झाली असून नव्या पिढीतील आशीष देशमुख यानिमित्ताने तरुण रक्ताला नेतृत्व देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. वामनराव चटप यांची विदर्भ राज्य संग्राम समिती पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. याशिवाय, विदर्भ संयुक्त कृती समिती, शेतकरी संघटनेसह भाजप, रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर समोर येऊ लागले आहे. विदर्भवादी नेते अहमद कादर, भोला बढेल हे कार्यकर्ते सक्रिय झाले असून त्यांनी बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले.