शरद पवार कृषिमंत्री असतानाच देशातील शेतीचा विकास झाला किंवा शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळाले, असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने केला जात असला तरी यूपीए सरकारच्या काळात शेती क्षेत्रातील विकासाचे  श्रेय काँग्रेसने जाहीरनाम्यात स्वत:कडे घेतले आहे.
कृषी खाते गेली दहा वर्षे शरद पवार यांच्याकडे असून, कृषी क्षेत्रातील विकासाबद्दल पवार यांना श्रेय दिले जाते. पवार यांनीच शेती विकासावर भर दिला तसेच शेतीमालाचे दर वाढवून दिले, असा दावा राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येतो. कृषी क्षेत्रातील विकासाचा दर इथपासून शेतीमालाचे उत्पादन वाढणे याचे सारे श्रेय पवार यांना दिले जाते. कृषी क्षेत्रातील विकासाबद्दल अलीकडेच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कृषिमंत्री शरद पवार यांना श्रेय दिले होते.
काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात यूपीए-१ आणि २ या काळात झालेल्या कृषी क्षेत्रातील विकासाचे सारे श्रेय काँग्रेस पक्षाला घेण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने राबविलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेमुळे कृषी क्षेत्राचा विकासाचा दर चार टक्क्यांवर गेला. कृषी क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला. २००४-०५ ते २०१३-१४ या दहा वर्षांंमध्ये शेती उत्पादनाच्या किमान आधारभूत किमतीत काँग्रेसमुळे वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांच्यामुळेच किमान आधारभूत किमतीत वाढ झाल्याचा दावा करून याचे सारे श्रेय पवारांना देण्यात येते. कृषी क्षेत्रात झालेल्या साऱ्या बदलांचे श्रेय काँग्रेसने घेतले आहे.
मच्छीमार वर्गाला आपलेसे करण्यासाठी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील उमेदवार गुरुदास कामत यांच्या पुढाकाराने राहुल गांधी यांनी वर्सोवा येथील मच्छीमार वसाहतीस भेट देऊन मच्छीमारांचे प्रश्न समजावून घेतले होते. मच्छीमार विभाग हा कृषी खात्यांतर्गत येत असल्याने मच्छीमारांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. यामुळे स्वतंत्र खाते निर्माण करण्याची मागणी राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली होती. यानुसार मच्छीमारांसाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.  कृषी क्षेत्रात सारी प्रगती ही शरद पवार यांच्यामुळेच झाली, हे देशातील जनता चांगलीच जाणते. पंतप्रधानांनी याचे सारे श्रेय पवार यांनाच दिले होते, याकडे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.