वरुणा व अस्सी नद्या गंगेला जाऊन मिळतात. अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेले पुरातन शहर वाराणसी! वरुणा व अस्सीच्या नावावरून वाराणसी. तशी ओळख बनारस, काशी इत्यादी.. ज्ञान, परंपरा, संस्कृतीचा सुंदर मिलाफ. धर्माची पाळेमुळे घट्ट रुजल्याने स्वाभाविकच वर्णवर्चस्वाची लढाई गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यंदाची लोकसभा निवडणूक त्याला अपवाद नाही. वाराणसी म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला. नरेंद्र मोदींमुळे वाराणसीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. महापौर, आमदार व खासदार भाजपचा असतानादेखील वाराणसीची अवस्था आजही देशभरातल्या सामान्य शहराची असते तशीच आहे. वाराणसीने आपल्याला बोलावल्याचा दावा मोदी करतात. परंतु भाजपचाच वरचष्मा असतानादेखील वाराणसी मतदारसंघाचा विकास का झाला नाही, हा प्रश्न ना मतदारांना पडतो ना प्रसारमाध्यमांना!
शहरापासून दूरवर असलेल्या विमानतळावरून बाहेर पडताच समोर मोदींचे भव्य पोस्टर लक्ष वेधून घेते. विमानतळावर फारशी गर्दी नसते. दिल्लीहून एकटेच वाराणसीत दाखल झालेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते आलेले असतात. ना घोषणाबाजी-ना हारतुरे. मोदींची ‘थ्री’डी विकासप्रतिमा जनमानसात भक्कम करण्यासाठी मुंडा यांच्यासारखे हजारो कार्यकर्त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात तळ ठोकला आहे.
वाराणसी शहराच्या मुख्य सीमेवरून प्रचार करताना हमखास गाडी अडकली जाणार. वाहनाची, सामानाची तपासणी. सोबत किती कॅश आणली आहे, असं सहजच वाहनचालक मनोज दुबे विचारतो. कारण, काही दिवसांपूर्वी वाराणसीत एका वाहनातून सहा लाख रुपयांची रोकड सापडली. तेव्हापासून नेताजींनी वाराणसीच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
वारणासीचे पोलीस आयुक्त म्हणे समाजवादी पक्षाचे बडे नेते प्रा. रामगोपाल यादव यांचे जावई! त्यामुळे प्रशासन अत्यंत आक्रमक झाले आहे. हिंदुबहुल भागात गळ्यात भगवा शेला अडकवून प्रचार केला जातो. ही प्रचाराची शैली हिंदू मतदारांना नक्की भावणार. कुणालाही विचारले तरी ‘अब की बार..’ हेच उत्तर. केजरीवाल यांच्यासाठी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमधून आम आदमी पक्षाचे स्वयंसेवक वाराणसीत दाखल झालेत. दिल्लीच्या तुलनेत काहीसे असंघटित वाटतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीत समूहात दिसणारा आम आदमी वाराणसीत एकेकटा वाटतो. प्रत्येक उमेदवाराच्या जातीचा उल्लेख होत असताना, अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांची  जिरवली, अशी चर्चाही कानावर पडते. परंतु त्यांनी वाराणसीत यायला नको होते, असा रागाचा सूरही ऐकू येतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची जितकी चर्चा झाली; तितकीच वाराणसीमुळे लोकसभा निवडणुकीतदेखील पुन्हा होत आहे.

जातीय समीकरणे महत्त्वाची
जातीय समीकरणांची खरी उकल वाराणसीत आल्यावर होऊ शकते. म्हणजे, नरेंद्र मोदी हे हिंदू उमेदवार आहेत. परंतु, त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे काँग्रेसचे अजय राय भूमिहार, अरविंद केजरीवाल बनिया, समाजवादी पक्षाचे कैलास चौरसिया हे पानवाले तर बहुजन समाज पक्षाचे विजय प्रकाश जायस्वाल इतर मागासवर्गीय! त्यामुळे वाराणसीतील निवडणूक  धर्माऐवजी जातीवर लढवली जाते.

मोदी विरुद्ध केजरीवाल सामना
मायावती, मुलायम सिंह यादव यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. अजय राय यांनी ‘कौमी एकता’च्या मुख्तार अन्सारींशी हातमिळवणी केल्याने भूमिहार मतदार नाराज झालाय म्हणे. कारण, अजय राय यांच्या भावाच्या हत्येचा आरोप अन्सारींवर होता. भावाच्या खुन्याशी हातमिळवणी केली, असा ‘बूथनिहाय’ प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे खरी लढत नरेंद्र मोदी विरुद्ध केजरीवाल अशी होईल.