राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेला परंपरागत मतदार गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळू लागल्याने कल्याण, डोंबिवलीत मनसेचा धसका घेणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना गुरुवारी कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी संघावर सोडलेल्या वाग्बाणांमुळे अचानक स्फुरण चढले आहे. तर आनंद परांजपे अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये युतीच्या उमेदवारांना धक्का देत मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. पारंपारिक मतदार वेगळा विचार करु लागल्यामुळे डोंबिवली शहरात युतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.असतानाच गुरुवारी राहूल गांधीच्या संघविरोधी वक्तव्यामुळे या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
या मतदारसंघात मनसेने तुल्यबळ उमेदवार दिल्यास महापालिका निवडणुकीप्रमाणे कल्याण, डोंबिवली या युतीच्या बालेकिल्ल्यात मतविभाजन झाल्यास आपल्याला फायदा होईल, अशी आशा राष्ट्रवादीचे नेते बाळगून आहेत. तर संघाशी संबंधीत परंपरागत मतदार मनसेकडे वळू नये, यासाठी गेल्या काही दिवसांपासून युतीचे नेते व्युहरचना करीत असतानाच राहूल गांधी यांच्या भिंवडीतील गुरुवारच्या सभेमुळे युतीला आयता मुद्दा हाती लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तर  युती आणि मनसेच्या मतविभाजनाकडे डोळे लावून असणारे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
संघ प्रतिक्रिया..
ज्या माणसाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी काहीही माहिती नाही तो जर संघाविषयी बाष्कळ बडबड करत असेल तर काँग्रेसचे अध:पतनच जवळ आले आहे, असे समजावे, असे मत संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर चक्रदेव यांनी व्यक्त केले, तर काँग्रेस, भाजपने एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा देश विकासाचे मुद्दे समोर ठेऊन निवडणुकीला सामोरे जावे. अशी प्रतिक्रिया प्रा.उदय कर्वे यांनी दिली.
कल्याण, डोंबिवलीचा राजकीय इतिहास
२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश परांजपे यांना राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. त्यावेळी कल्याण-डोंबिवलीतील मताधिक्याच्या जोरावर परांजपे विजयी झाले होते.
परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हाच परंपरागत मतदार आनंद परांजपे यांच्यामागे उभा राहीला. मागील लोकसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या पुर्नरचनेचा आनंद परांजपे यांना फायदा झाला होता.