मुंबईत हक्काची जागा असूनही काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे अडचणीत आलेल्या उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार प्रिया दत्त सोमवारी पदयात्रेतील ढिसाळपणामुळे प्रचंड वैतागल्या आणि अखेरीस थेट रिक्षा पकडून ताडकन निघून गेल्या. राज्यातील काँग्रेसला हमखास यश मिळण्याची खात्री असलेल्या उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांच्या प्रचारात काँग्रेस नेत्यांनी अडथळे उभे केल्याने चांगलाच वाद झाला आणि त्याची खमंग चर्चाही झाली. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सोमवार सकाळपासून मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात प्रिया दत्त यांच्या पदयात्रा आखण्यात आल्या होत्या.
दुपारी पावणेबाराच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील खेरनगर-बेहरामपाडा भागात नियोजनाअभावी पदयात्रा दिशाहीन झाली. त्याच गल्ल्यांमध्ये पुन्हा फेऱ्या होऊ लागल्याने प्रिया दत्त वैतागल्या. स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे नेमके कुठे जायचे आहे याची कसलीही माहिती नसल्याचे पाहून प्रिया दत्त वैतागल्या. गोंधळ संपत नाही हे पाहताच कोणालाही न सांगता त्यांनी सुरक्षा रक्षक व सहायकासह थेट रिक्षा पकडून तिथून निघून गेल्या.