लोकसभा निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. पराभवाचे विश्लेषण करण्याकरिता पक्षाची बैठक बोलाविण्याची मागणी पुढे आली आहे. दुसरीकडे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात शनिवारी चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करण्याकरिता तात्काळ चिंतन बैठक बोलाविण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या पातळीवर चर्चा झाली पाहिजे व कोणत्या दुरुस्त्या करता येतील याचा आढावा घेतला गेला पाहिजे, असे मत गाडगीळ यांनी व्यक्त केले.
पराभवामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात नाराजी वाढत चालली आहे. पक्षाचे आमदार व पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील नाराजीचा फटका पक्षाला महाराष्ट्रातही बसला असला तरी राज्यात पक्षाच्या आमदारांची कामेच होत नाहीत, असा नाराजीचा सूर आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून आमदारांची मते जाणून घ्यावीत, अशी मागणी आमदाराकंडून केली जात आहे.
मुलाच्या पराभवाबरोबरच पक्षाच्या वाईट कामगिरीबद्दल राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राणे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. मात्र राणे आणि ठाकरे हे दोघेही मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्नात आहेत.
काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीचे चार उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे जास्त उमेदवार निवडून येणे हे काँग्रेसला फारच लागले आहे. मात्र राष्ट्रवादीचे विजयी झालेल्या चारही उमेदवारांच्या विरोधात भाजपचे उमेदवार िरगणात नव्हते याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधतात. सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महायुतीतील मित्र पक्षांचे उमेदवार होते. याचा राष्ट्रवादीला फायदा झाल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून केला जात आहे. दरम्यान, येत्या २० मे रोजी काँग्रेसच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अशोक चव्हाण यांनी लाज राखली
काँग्रेसचा राज्यात पार धुव्वा उडाला असताना नांदेडमध्ये अशोक चव्हाण तर शेजारील हिंगोलीत राजीव सातव हे दोघेच राज्यातून निवडून आले. चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांत मिळालेल्या आघाडीमुळेच सातव हे १६०० मतांनी विजयी झाले. चव्हाण यांच्या उमेदवारीस मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला होता. पण त्याच चव्हाण यांनी पक्षाची लाज राखली. ‘आदर्श’ घोटाळ्यातून ते बाहेर पडल्यास राज्य काँग्रेसचे नेतृत्व अशोकरावांकडेच सोपविले जाऊ शकते.
माझ्या भवितव्याचा निर्णय पक्ष घेईल – मुख्यमंत्री
काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राज्य काँग्रेसमधून मोठय़ा प्रमाणावर नाराजीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भविष्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वीकारली, आता जो काही निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात मोहिम अधिक तीव्र होऊ नये, अशी खबरदारी घेतली आहे.