कर्नाटकमध्ये राजकीयदृष्टय़ा शिरकाव करण्यासाठी आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी बंगळुरूत प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मीडियाला लक्ष्य केले आणि काँग्रेस व भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा जनतेला उबग आल्याचा दावा त्यांनी केला.
बंगळुरूतील रस्त्यावरून खुल्या जीपगाडीतून जाताना केजरीवाल वाटेत समर्थकांना अभिवादन करीत होते. प्रत्येक तीन कि.मी. अंतरावर थांबून ते कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधत होते. आप हाच केवळ स्वच्छ सरकारसाठी पर्याय असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. बंगळुरू दक्षिण, उत्तर, मध्य मतदारसंघात त्यांनी फेरफटका मारला. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा प्रभाव काही क्षेत्रातच आहे.
केजरीवाल यांच्या विधानांशी असहमत- सुभाष वारे
जनआंदोलनातून राजकारणामध्ये उतरू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विधानांशी मी सहमत नाही, असे ‘आप’चे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष वारे यांनी शनिवारी स्पष्ट केले.