पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी नांदेडला जाहीर सभेत बोलताना ‘बहेन से कोई छीन लेता है..?’ अशा शब्दांत माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्यावरील अन्यायावर भाष्य केले होते. आता खतगावकरांनी आपली नाराजी उघड केल्याने खासदार अशोक चव्हाण यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ‘‘आता बाण सुटला आहे’’ अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. या पाश्र्वभूमीवर खतगावकर यांनी वेगळा पर्याय वा मार्ग नक्की केला असावा, असा अर्थ लावला जात आहे. गेले काही दिवस त्यांच्या निकट असलेल्या कार्यकर्त्यांने भास्करराव भाजपमध्ये जाऊ शकतात, असेही सूचित केले.
लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसतर्फे खतगावकर यांच्याऐवजी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. त्या वेळी मोदी यांनी चव्हाण यांच्यावर हल्ला चढविताना ‘त्यांनी तर बहिणीच्या यजमानांची उमेदवारी हिसकावून घेतली,’ अशी टीका केली होती. चव्हाण खासदार झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांत आलेल्या एकंदर अनुभवातून त्यांनी आपल्या मनातील खदखद नुकतीच उघड केली. खतगावकर यांनी चव्हाण व त्यांच्या कंपूबद्दलची नाराजी, त्यामागची कारणे उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. खतगावकर यांच्या नाराजीनंतर चव्हाण मुंबईला गेले, त्या वेळी ही नाराजी त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी खतगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दूतही पाठविला, पण खतगावकरांनी चर्चेचे ‘कवाड’ बंद ठेवले! या संदर्भात थेट खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ‘थोडे थांबा,’ एवढेच भाष्य त्यांनी केले.