‘आदर्श’ घोटाळ्यानंतरही काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देतानाच मराठवाडय़ातील जागा जिंकण्याची जबाबदारी सोपविल्याने, ताकद दाखवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
मराठवाडय़ातील लोकसभेच्या आठपैकी पाच जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्या आहेत. यापैकी नांदेड, लातूर आणि हिंगोली या तीन जागा निवडून आणण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. नांदेडमध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याचा चव्हाण यांचा प्रयत्न आहे. गेल्या आठवडय़ात नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मात्र अशोक चव्हाण यांना निवडून येण्यात अडचण येणार नाही, असे चित्र आहे.
नांदेडलगत असलेल्या हिंगोली मतदारसंघात राहुल गांधी यांचे निकटवर्तीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव हे निवडणूक लढवीत आहेत. सातव यांच्या रूपाने अशोक चव्हाण यांना मराठवाडय़ात पक्षांतर्गत आव्हान उभे राहू शकते. मात्र सातव यांच्याकडे पाठ फिरविणे अशोक चव्हाण यांना झेपणारे नाही. यातूनच सातव यांच्यासाठी अशोक चव्हाण यांना मेहनत घ्यावी लागत आहे.
नांदेड आणि लातूर वादामुळे अशोक चव्हाण हे विलासराव देशमुख यांच्या लातूरमध्ये फारसे लक्ष घालत नव्हते. विलासरावांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत लातूरचा गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे. यासाठीच अशोक चव्हाण यांनी लातूरमध्ये लक्ष घातले. औरंगाबाद आणि जालना या दोन जागा काँग्रेसतर्फे लढविण्यात येत असल्या, तरी या दोन्ही मतदारसंघांबाबत काँग्रेसला फारशी आशा नाही. परिणामी उर्वरित तीन जागा निवडून आणून मराठवाडय़ाचे नेते म्हणून आपली प्रतिमा तयार करण्याचा अशोकरावांचा प्रयत्न आहे.  अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. तथापि, त्यांच्या मतदारसंघात अशोकरावांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री नांदेडचा दौरा करणार आहेत.
गुजरातमधील भाजपचे दहा उमेदवार पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन
गुजरातमधील २६ पैकी दहा मतदारसंघांमध्ये भाजपने पूर्वाश्रमीच्या काँग्रेसजनांना उमेदवारी दिली असून, मोदी यांच्या भाजपला गुजरातमध्ये उमेदवार सापडू शकले नाहीत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. वलसाड, पाटन, खेडा, कच्छ, पोरबंदर, जामनगर, सुरेंद्रनगर, छोटा उदयपूर आण बारडोली या दहा मतदारसंघांमध्ये भाजपने जुन्या काँग्रेसजनांना उमेदवारी दिली असून, अहमदाबाद पूर्व मतदारसंघात चित्रपट अभिनेत्याला उमेदवारी दिली. यावरूनच गुजरातमधील सर्व जागा जिंकण्याची भाषा करणाऱ्या भाजपला पक्षात पात्र उमेदवार सापडले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली.