यवतमाळ मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र आणि नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. उमेदवारी नाकारल्याने गडचिरोलीचे खासदार मारोतराव कोवासे यांनी नापसंती व्यक्त केली असून, नांदेडचे खासदार भास्करराव खतगावकर यांनी आपल्याला का डावलण्यात येत आहे, असा सवाल पक्षाच्या नेत्यांकडे व्यक्त केला आहे.
राज्यातील सात मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेडमध्ये आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी अशोक चव्हाण यांची मागणी असली तरी ‘आदर्श’ घोटाळा लक्षात घेता त्यांना उमेदवारी देई नये, असा पक्षात युक्तिवाद आहे. या संदर्भात राहुल गांधी यांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल. यवतमाळमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मुलाला उमेदवारी मिळणार नसल्यास स्वत: ठाकरे उमेदवारीकरिता प्रयत्नशील आहेत. मात्र प्रदेशाध्यक्षांनी शक्यतो निवडणूक लढवू नये, असा पक्षात मतप्रवाह आहे. पुणे मतदारसंघातून अभय छाजेड यांना उमेदवारी देण्याची शिफारस सुरेश कलमाडी यांनी पक्षाकडे केली आहे. औरंगाबादमधून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी लढावे, असा प्रस्ताव असला तरी दर्डा लढण्यास इच्छूक नाहीत.
गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्याने खासदार मारोतराव कोवासे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन तीव्र नापसंती व्यक्त केली. आपण काम करणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्याचे समजते. नांदेड मतदारसंघातून आपली उमेदवारी नाकारली जाणार या चर्चेने खासदार भास्करराव खतगावकर-पाटील यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन आपल्यावर अन्याय का करण्यात येत असल्याची विचारणा केल्याचे सांगण्यात आले.

उमेदवारी नाकारल्याने खासदार मारोतराव कोवासे यांनी नापसंती व्यक्त केली असून, भास्करराव खतगावकर यांनी आपल्याला का डावलण्यात येत आहे, असा सवाल नेत्यांकडे केला आहे.