राजस्थानमधून काँग्रेसने क्रि केटपटून मोहम्मद अझरुद्दीन याला दिलेल्या उमेदवारीबाबत काही मुस्लीम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. अझरुद्दीनचा राजस्थानशी काहीही संबंध नसताना त्याला उमेदवारी देणे योग्य नसल्याचे मत या संघटनांनी व्यक्त केले आहे.
इंडिया जमैतुल कुरेश (राजस्थान) आणि पिंक सिटी हाज अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी आमदार मकबूक मंदेलिया यांनी अझरुद्दीनच्या उमेदवारीला आक्षेप घेतला.
काँग्रेसने अझरुद्दीनला सवाईमाधवपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र हा निर्णय योग्य नसल्याचे मकबूक मंदेलिया यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्षाने अझरुद्दीनच्या उमेदवारीबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असेही ते म्हणाले.
अझरुद्दीन हा स्थानिक नेता नाही. यापूर्वी त्याने उत्तर प्रदेशमधील मोरादाबादमधून निवडणूक लढवली आहे आणि आता तो मतदारसंघ बदलत आहे. त्यामुळे अझरुद्दीनला राजस्थानमधून तिकीट का दिले, याचा पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.