ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर देशभर निर्माण झालेले भ्रष्टाचारविरोधी वातावरण हे केवळ माध्यमनिर्मित चित्र आहे काय, असा प्रश्न शिवसेनेचे माजी मंत्री आणि ‘अभिनेते’ बबन घोलप यांना झालेल्या शिक्षेनंतर निर्माण झाला आहे.
बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या या प्रकरणात प्रारंभी आपल्या बाजूने निकाल लागल्यानंतर घोलप यांनी जाहिराती करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले, अशी शेखी मिरवली होती. आता घोलप यांचा हाच ‘डायलॉग’ त्यांचे विरोधक वापरत आहेत. मात्र या सर्व प्रकरणाचा स्थानिक पातळीवर घोलप यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. एवढेच नव्हे, तर उलट नाशिक रोड-देवळाली विधानसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये बंद पाळण्यात येऊन घोलपांविषयी सहानुभूतीच व्यक्त करण्यात आली.  
नाशिक रोड-देवळाली मतदारसंघ राखीव असल्याने ग्रामीण भागातील जातीय समीकरणांनी कायम घोलपांची साथ केली आहे. ३० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत घोलप यांनी भव्यदिव्य असे कोणतेही विकास काम केलेले आढळणार नाही. परंतु ग्रामीण जनतेला जे हवे तेच ते देत गेले. परिणामी भ्रष्ट असूनही घोलपांबद्दल सहानुभूती दिसते. यातून भ्रष्टाचारविरोधाची ऐशीतैशी होत असली, तरी त्याची तमा कोणासही नाही, असे येथील सध्याचे चित्र आहे.