पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून गेल्या पाच वर्षांत फारशी चमक दाखविण्यात अपयशी ठरलेल्या बहुजन विकास आघाडीने यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बळीराम जाधव यांना रिंगणात उतरवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. जाधव यांच्याविरोधात गेल्या निवडणुकीत जेमतेम १२ हजार मतांनी पराभूत झालेले भारतीय जनता पक्षाचे अ‍ॅड. चिंतामण वणगा यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली असली तरी जाधव यांच्यापेक्षा वणगा यांची लढत वसई-विरारचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत आहे. काँग्रेसने या मतदारसंघातून राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐन वेळेस गावितांची उमेदवारी मागे घेऊन काँग्रेस पक्षाने ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ठाणे जिल्ह्य़ातील पश्चिम पट्टय़ात ठाकूर यांची ताकद लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे बहुजन विकास आघाडीचे पारडे एकीकडे जड वाटत असले तरी काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे दुखावले गेल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचीही बऱ्यापैकी ताकद आहे. या सगळ्या परिसरात हितेंद्र ठाकूर यांची झपाटय़ाने वाढणारी ताकद लक्षात घेता सर्व पक्षांतील नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वसई, विरार, नालासोपारा, बोईसर येथील एकगठ्ठा मतांनी बहुजन विकास आघाडीचे जाधव विजयी झाले होते. काँग्रेसने सुरुवातीच्या काळात ठाकूर यांच्याशी संधान बांधण्याचा प्रयत्न करून पाहिला. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता. मात्र तसे करण्यास ठाकूर तयार नव्हते. अखेर काँग्रेसने राज्यमंत्री गावित यांना उमेदवारी दिली. याच काळात पालघर नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. गावितांच्या घरातच त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचे काय होणार, हा अंदाज तेव्हाच सगळ्यांना आला. लगेचच सूत्रे हलली आणि मुख्यमंत्र्यांनी गावितांना उमेदवारी मागे घ्यावयास लावली. बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला. वसई परिसरात आमदार विवेक पंडित यांनी अ‍ॅड. वणगा यांना जाहीर पाठिंबा दिला असून या भागातील ख्रिस्ती मते भाजपकडे वळविण्यात त्यांना यश मिळते का, याविषयी उत्सुकता आहे. पालघर तसेच विक्रमगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सहकार्यावर वणगा यांचे यश अवलंबून आहे.

वसई-विरार तसेच नालासोपारा या शहरी भागात घरोघरी पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पोहोचविणार आहे. या मतदारसंघातील बऱ्याच भागांत भेडसावणारी पाणीटंचाई कायमची हटविण्यास मी प्राधान्य देणार आहे. मोठे औद्योगिक प्रकल्प आणून त्यात स्थानिकांना रोजगार देईन. ग्रामीण भागात अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न करेन.    
बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी)

बरीच वर्षे रेंगाळलेला ठाणे जिल्हा विभाजनाचा प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेणार आहे. तसेच डहाणू-नाशिक रेल्वे सेवा सुरू करून या परिसराच्या विकासाला चालना देण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. अजूनही बऱ्याच आदिवासींना हक्काच्या वनजमिनी मिळालेल्या नाहीत. त्यांना त्या मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सिंचनाअभावी येथील जमिनी वर्षांनुवर्षे नापिकी राहिल्या. त्यामुळे जास्तीतजास्त भाग ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे.             
– चिंतामन वनगा (महायुती)