मतमोजणी केंद्राबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ठरावीक परिसरात विजयी मिरवणुकांना बंदी असली तरी ही बंदी मतमोजणी केंद्राच्या परिसरात कायम ठेवण्याच्या दिशेने पोलिसांनाही उपाययोजना सुरू केली आहे. अशा रीतीने विजयी मिरवणुकांवर बंदी घालणे पोलिसांना शक्य नसले तरी शक्यतो मतदान केंद्राच्या परिसरात विजयी मिरवणूक न काढण्याची विनंती सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पोलिसांमार्फत केली जाणार आहे. विजयी उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघात संबंधित सक्षम यंत्रणांची परवानगी घेऊन विजयी मिरवणूक काढण्यास हरकत नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.याबाबत मुंबई पोलिसांचे प्रवक्ते व उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी म्हटले आहे की, विजयी मिरवणुकांना बंदी नाही. मात्र मतमोजणी केंद्र परिसरात विजयी मिरवणूक काढली जाऊ नये यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. विजयी मिरवणूक काढण्यासाठी सक्षम यंत्रणेची परवानगी संबंधित उमेदवाराला घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.