अरुण जेटली वि. कॅ. अमरिंदर सिंग, अमृतसर, पंजाब
प्रथमच लोकसभेला सामोरे जाणारे ६१ वर्षीय जेटली आणि अमृतसरमधून उमेदवारीसाठी अजिबात इच्छुक नसलेले ७२ वर्षीय पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख कॅ. अमरिंदर सिंग अशी ही लढत. २००७ आणि २०१२ मधील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने अमरिंदर यांचे प्रमुखपद हिरावले गेलेले, त्यातच देशभरात असलेली काँग्रेसविरोधी लाट जेटली यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे असल्यामुळे, वरकरणी ही लढत एकतर्फी वाटू शकते, मात्र वास्तव तसे नाही. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ही लढत आहे. शिरोमणी अकाली दलाशी असलेला ‘सुखी संसार’ आणि मागील निवडणूक निकाल लक्षात घेऊनच ‘सुरक्षित मतदारसंघ’ जेटली यांना देण्यात आला, पण आता ते जिंकावेत यासाठी बादल कुटुंबीयांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. दुसरीकडे अमरिंदर यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. विजय संपादन करता आल्यास त्यांचे ‘राजकीय पुनरुज्जीवन’ निश्चित. पण  पराभव झाल्यास राजकीय कारकिर्दीस पूर्णविरामाची शक्यताच अधिक. वाढती महागाई, शेतमालाला न मिळणारे भाव, जलसंधारण, वाढलेले प्रदूषण या मुद्दय़ांवरही काँग्रेसकडे म्हणावे, असे उत्तर नाही. ग्रामीण जनमानसावर शिरोमणी अकाली दलाची मजबूत पकड आहे, तर शहरी भागात ‘नमो प्रभावा’ची भाजपाला आस आहे.