राज्यात सत्तांतर होऊन महायुतीची सत्ता येणार आहे, पण ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे जहाज बुडविले तेच आता युतीच्या जहाजात बसण्याचा धोका आहे. त्यांना रोखा, संधी देऊ नका असा रोखठोक सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला दिला आहे.
रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके, तालुकाध्यक्ष जितेंद्र शेळके, सुरेश ताके, भरत आसणे, सुनील क्षीरसागर यांच्यासह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या वेळी सरकारी विश्रामगृहावर खासदार शेट्टी वार्ताहरांशी बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत या वेळी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांची लाट काहीशी कमी झाली आहे. मात्र सत्ता युतीचीच येणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची प्रतिमा ज्यांनी बिघडवली ते आता सेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येकाला पक्षवाढ करण्याचा अधिकार आहे. पण बदनाम माणसे सत्तेसाठी उडय़ा मारीत आहेत. त्याने शिवसेना-भाजपची प्रतिमा खालावेल. ज्यांच्या विरोधात मते दिली ते आले तर जनता त्यांनाही धडा शिकवील. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देताना त्यांच्या प्रतिमा तपासणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपात यापूर्वी घटक पक्षात वाद होत असे. बारामती व बीडच्या जागेचा तिढा निर्माण होई, पण आता त्याचा निकाल आम्ही लावला. घटक पक्षच एकत्र आले आहेत. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना व स्वाभिमानी एकत्र आले आहेत. तिघांनीही एकूण ९४ जागा मागितल्या असल्या तरी व्यवहारी भूमिकेतून त्यात मागेपुढे होऊ शकत, असे त्यांनी सांगतिले.
पुणे येथे उद्या (शनिवार) क्रांतिदिनी सहकार बचाव परिषद आयोजित करण्यात आली असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, चंद्रराव तावरे, पृथ्वीराज जाचक, गुजरातच्या गणदेवी कारखान्याचे अध्यक्ष जयंतीभाई पटेल आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तोटय़ातील बंद पडलेला एकही कारखाना विकणार नाही, तो चालवायला दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. मात्र आता सरकारने विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या विरोधात निवडणुकीनंतर लढा उभारला जाईल.