स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गीता वाचलेली नाही. त्यातला सर्वाना प्रेमाने बरोबर घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी कधी बघितला नाही. जे नेते भ्रष्टाचारावर बोलतात, त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री जेलमध्ये गेल्यावर तो प्रश्न जाणवत नाही. लोकपालसह भ्रष्टाचारा विरोधातील ६ विधेयकांना राहुल गांधींची विधेयके म्हणून भाजपने बाजूला केले. त्यांनीच विरोध केला. ते बंदिस्त मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेसची राज्यातील प्रचाराची पहिली सभा येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘राज्याचा गड राखूच’
महाराष्ट्राचा गड शाबूत ठेवू, काँग्रेसच्या विचारांना येथे धोका पोहोचू देणार नाही, अशी ग्वाही या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज्यात २६ पैकी १७ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता, याची आवर्जून आठवण करून दिली़   राज्यात केलेल्या कामांचा लेखाजोखा या वेळी मुख्यमंत्र्यांनी मांडला.
आचारसंहितेचा फटका
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला काही प्रमाणात फटका बसला. राहुल गांधी हे बुधवारी रात्री आधीच्या कार्यक्रमानुसार राजभवनमध्ये मुक्काम करणार होते. पण आचारसंहिता लागू झाल्याने त्यांनी राजभवनमध्ये राहण्याचे टाळले. त्याऐवजी ‘सह्याद्री’ या शासकीय अतिथीगृहात त्यांनी मुक्काम केला. राहुल गांधी यांना विशेष सुरक्षा पथकाची (एस.पी.जी.) सुरक्षा असल्याने त्यांना आचारसंहितेच्या काळातही शासकीय अतिथीगृहात राहण्याची मुभा आहे. याशिवाय उद्या सकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधण्याचे ठिकाणही बदलावे लागले.
घोषणाबाजी!
नेता फक्त भाषणासाठीच असतो, असे आपल्या देशातील वातावरण झाले आहे. नेत्यांनी ऐकून घ्यायचे असते. अहंकार बाजूला ठेवायचे असतात. गरीब व महिलांचे ऐकून घ्यायचे असेल तर थोडे वाकावे लागते, असे राहुल सांगत होते, त्याच वेळी सभेत समोरच्या बाजूला बसलेल्या काही तरुणांनी ‘मराठा आरक्षण मिळावे’ यासाठी घोषणाबाजी केली. काहींनी बॅनरही दाखविले.