13 July 2020

News Flash

विधानसभेसाठी भाजपला अधिक जागा हव्यात?

देशभरात उसळलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेत मुंबईसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्याने भाजपने विधानसभा काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.

| May 18, 2014 02:29 am

देशभरात उसळलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेत मुंबईसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्याने भाजपने विधानसभा काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाल्याने विधानसभेसाठी ११७ हून अधिक जागा लढविण्याची आणि शिवसेनेबरोबरच्या जागा वाटपात काही जागा बदलून घेण्यासाठी पावले टाकली जाणार आहेत. मोदींच्या लाटेत शिवसेनेचाही फायदा झाल्याने भाजपला न दुखावता शिवसेनेकडून अधिक जागा मिळतील, अशी शक्यता भाजपच्या गोटात वर्तविली जात आहे.
भाजप-शिवसेना युतीला आता २५ वर्षे उलटून गेली असून त्यावेळच्या दोन्ही पक्षांच्या ताकदीनुसार जागावाटप करण्यात आले होते. पण इतक्या वर्षांनंतर दोन्ही पक्षांच्या ताकदीमध्ये फरक पडला असून भाजपने ते लोकसभा निवडणुकीत दाखवूनही दिले आहे. महायुतीला सुमारे ५१ टक्के मते मिळाली असून त्यापैकी भाजपला २७.५७ तर शिवसेनेला २०.८२ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे जनाधार कोणत्या पक्षाकडे किती आहे, हे दिसून येत आहे. त्या आधारावर जागावाटप करण्यात यावे, अशी भूमिका भाजप आता घेणार आहे. महायुतीच्या मतांपैकी ५५ ते ६० टक्के मते भाजपला असल्याने विधानसभेसाठी जागावाटपाचे गणित उलटे करण्याचा किंवा किमान १५० जागांचा भाजपचा आग्रह राहणार आहे.
लोकसभेसाठी भाजप अधिक जागा तर विधानसभेसाठी शिवसेनेला अधिक जागा हे सूत्र त्यावेळी ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठरविले होते. महाजन यांच्यानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची कायम युती टिकविण्याची भूमिका होती. केंद्रात भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळाले असले आणि शिवसेनेच्या पाठिंब्याची आवश्यकता नसली तरी रालोआतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊनच काम करण्याची भूमिका मोदींनी घेतली आहे. त्यामुळेच सेनेला न दुखावण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.
अधिक जागा लढविण्यापेक्षा जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची भाजपची भूमिका आहे. विधानसभेसाठी कोणी किती जागा लढवायच्या आणि अदलाबदल करायची, याचा योग्य तो निर्णय शिवसेनेशी बोलणी करून घेतला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानसभेसाठी नेतृत्व कोणाचे?
ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात कोणाच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवायची, याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच घेतला जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील, अशी घोषणा दीड वर्षांपूर्वी झाली होती. पण आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणुकीसाठी सर्वाधिकार दिले, तरी नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांनाही निवडणुकांमध्ये देखरेख ठेवण्याचे काम देऊन मुंडे यांच्यावर नियंत्रण ठेवले जाण्याचीही शक्यता आहे.
मुंडे गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात असून त्यांना राज्य आणि येथील प्रश्नांची व राजकारणीय समीकरणांची चांगली माहिती आहे. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मुंडे यांना महाराष्ट्रात सर्वाधिकार दिले होते. पण आता पक्षातील परिस्थितीही बदलली आहे. मुंडे यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाचीही जबाबदारी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यांना चार-पाच महिने राज्यातच ठाण मांडून बसावे लागेल आणि राज्यभरात दौरे करावे लागतील. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण होईल. विधानसभा काबीज करण्याच्या दृष्टीने मुंडे यांच्यावर अधिकाधिक जबाबदारी देण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न राहील. विधानसभा कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार, असे विचारता त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून लवकरच घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पक्ष देईल, ते काम मी स्वीकारेन, असे मुंडे यांनीही नुकतेच स्पष्ट केले आहे, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांच्या मार्गदर्शनाचा लाभ महाराष्ट्रातील निवडणुकांसाठीही घेतला जाईल, असे सूचक वक्तव्य  फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2014 2:29 am

Web Title: bjp demands more seats in mh assembly election 2
टॅग Lok Sabha Election
Next Stories
1 मनसे हादरली!
2 भाजपचे तिनात दोन, कॉंग्रेसचे १० त एक
3 भाजप सरकार रेल्वे विद्यापीठ उभारणार!
Just Now!
X