भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव व छायाचित्र वापरून काही मतदारसंघांत प्रचार केला जात असल्याने भाजपने मनसेचे नाव न घेता मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.
मोदी यांची प्रतिमा व छायाचित्रे याचा वापर करून काही राजकीय पक्ष व व्यक्ती भाजपशी जवळीक असल्याचे मतदारांना सांगत आहेत. त्यांची दिशाभूल करून आपल्याला मत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी तक्रार भाजपने आयुक्तांकडे केली आहे. मुंबई दौऱ्यावर असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत, टी. एन. मल्होत्रा, एच. एस. ब्रह्मा आणि राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गद्रे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यामध्ये भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय, अतुल भातखळकर, आशीष शेलार व सुमन घैसास यांचा समावेश होता.  मतदारांची फसवणूक करणे, हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती भाजपने आयोगाकडे केली आहे.