प्रकृती साथ देत नसल्याने आपल्या पुत्राला उमेदवारी द्यावी, अशी विनंती सभापती शिवाजीराव देशमुख यांनी पक्षाकडे केली होती. पण सभापतीपदाकरिता वाद नको म्हणून पक्षाने पुन्हा शिवाजीरावांनाच उमेदवारी दिली. अणुकरारावरील मतदानात काँग्रेसच्या बाजूने मतदान केलेले भाजपचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी देऊन बंजारा समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा भाजपतर्फे विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर या दोघांची नावे विधान परिषदेसाठी निश्चित करण्यात आली.
शिवाजीराव देशमुख आणि जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत. यापैकी छाजेड यांना उमेदवारी नाकारण्यात आली. सभापती देशमुख यांच्यासह हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने निवडून आलेले हरिभाऊ राठोड यांनी २००८ मध्ये अणुकराराच्या मुद्दय़ावर काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. पक्षादेश झुगारण्यासाठी त्यांनी ‘किंमत’ वसूल केल्याचा आरोप तेव्हा भाजपनेच केला होता. २००९ मध्ये यवतमाळमधून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती, पण ते पराभूत झाले होते. विदर्भ आणि मराठवाडय़ातील बंजारा समाजाच्या मतांवर डोळा ठेवून काँग्रेसने राठोड यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या जागेसाठी नंदुरबार-धुळे पट्टय़ातील चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी देताना मराठा, रजपूत ओ.बी.सी आणि बंजारा असे जातीचे समीकरण पक्षाने साधले आहे. गणेश पाटील यांच्या उमेदवारीसाठी माणिकराव ठाकरे यांनी जोर लावला होता, पण पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. सांगली, नंदुरबार आणि यवतमाळ या काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांत उमेदवारी देऊन पक्षाने गटबाजी वाढणार नाही याचीही खबरदारी घेतली.
भाजतर्फे तावडे, फुंडकर
भाजपने रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत विधान परिषदेसाठीच्या आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली नव्हती. विनोद तावडे यांच्यासह पांडुरंग फुंडकर यांनाही उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर भाजपने या चर्चेला पूर्णविराम देत रात्री उशिरा दोघांची नावे घोषित केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 3:38 am